पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ५ राशींना संमिश्र, गैरसमज-खर्चात वाढ; सावध राहावे, अडचणींचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:25 AM2024-07-10T10:25:35+5:302024-07-10T10:33:23+5:30

शनी आणि सूर्य या ग्रहांचा प्रतिकूल मानला गेलेला षडाष्टक योग जुळून येत आहे. कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत विराजमान असलेला सूर्य १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करत आहे. एका राशीत सूर्य सुमारे महिनाभर असतो. सूर्याच्या या संक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. त्यामुळे कर्क राशीतील सूर्य गोचराचा काळ कर्क संक्रांती म्हणून ओळखला जाणार आहे.

आताच्या घडीला नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत कुंभ राशीत आहे. सूर्याने कर्क राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्य आणि शनी यांचा षडाष्टक योग जुळून येणार आहे. काही ज्योतिषीय मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी हे पिता-पुत्र मानले गेले आहेत. त्यामुळे पिता-पुत्र आता एकमेकांपासून षडाष्टक अंतरावर असतील.

तसेच काही मान्यतांनुसार, सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू ग्रहही मानले गेले आहेत. त्यातच या दोन्ही ग्रहांचा जुळून आलेला षडाष्टक योग महत्त्वाचा मानला जात आहे. या दोन्ही ग्रहांच्या या योगाचा सर्व राशींवर प्रभाव दिसून येणार आहे. परंतु, काही राशींना आगामी काळ संमिश्र ठरणार असून, सावध राहण्याचा सल्ला दिला जात आहे. जाणून घेऊया...

कर्क: शनी आणि सूर्याचा षडाष्टक योग काहीसा संमिश्र ठरू शकतो. आजारपण येण्याची शक्यता बळावू शकते. एखाद्या गोष्टीचा अधिक ताण जाणवू शकतो. नोकरी आणि व्यवसायात परस्परविरोधी परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. मोठी गुंतवणूक करणे टाळावे. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. अधिक वादविवाद टाळावा.

सिंह: शनी आणि सूर्याचा षडाष्टक योग प्रतिकूल ठरू शकतो. एखाद्या गोष्टीचा अधिक ताण येऊ शकतो. तब्येत बिघडू शकते. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

कन्या: कामाच्या ठिकाणी सावधपणे कामे करण्याचा सल्ला दिला जातो. फालतू चर्चा आणि अनावश्यक गप्पांपासून दूर राहा. आवेगाने काहीही बोलणे टाळा, अन्यथा समोरच्या व्यक्ती दुखावली जाऊ शकते. व्यावसायिकांना काही ग्राहक किंवा व्यावसायिकांमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. गुंतवणूक करायची असेल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

धनु: गुप्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा. व्यावसायिक असाल आणि नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आता ते करू नका. कोणालाही पैसे उधार देणे टाळा.

कुंभ: कामात काही अडथळे येऊ शकतात. भावंडांसोबत गैरसमजही वाढू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसानीमुळे निराशेचा सामना करावा लागू शकतो. नोकरदारांनी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहावे, अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पर्यटन किंवा सहलीला जात असाल तर सामानाची पूर्ण काळजी घ्यावी.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.