तेजस्वी यादवांच्या कुंडलीत ४ अद्भूत राजयोग! नितीश कुमारांनाही लाभ; २०२४ला BJPचा विजय रथ रोखणार? By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 10:45 AM 2022-08-11T10:45:56+5:30 2022-08-11T10:52:25+5:30
तेजस्वी यादवांसह नितीश कुमार यांच्या कुंडलीत एकापेक्षा एक शुभ आणि अद्भूत योग जुळून येत असून, भाजपला कडवे आव्हान देण्यात ही जोडी यशस्वी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. एकीकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी करत शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का दिला. यानंतर भाजपने शिंदे गटाला पाठिंबा देत नवे सरकार स्थापन केले. या नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पाडताना, दुसरीकडे नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपचा (BJP) करेक्ट कार्यक्रम केला आणि बिहारच्या राजकारणात मोठी उलथापलथ झाली. यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी आठव्यांदा शपथ घेतली.
भाजपशी असलेली युती तोडून नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूंच्या आरजेडीसोबत जवळीक साधली. एनडीएसोबत काडीमोड घेत नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही धक्का दिल्याचे सांगितले जाते. भाजपसोबतची युती तोडून लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादवांसोबत (Tejashwi Yadav) पुन्हा सरकार स्थापन केले.
भाजप आणि जेडीयू युती तुटल्यामुळे अनेक प्रकारचे अटकळ बांधले जात आहेत. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत अनेक गोष्टी वर्तवल्या जात आहेत. युती तुटल्याने २०२४ मध्ये भाजपसाठी सत्तेचा मार्ग कठीण होईल का? युती तोडणे भाजपला महागात पडणार? नितीश-तेजस्वी यांच्या शपथग्रहण कुंडलीचा योग काय सांगतो, ही जोडी २०२४ मध्ये भाजपचा विजय रथ रोखण्यात यशस्वी होईल का? जाणून घेऊया...
लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९८९ रोजी पाटणा येथील मकर लग्नात झाला. त्यांच्या कुंडलीत चंद्र कुंभ राशीत केमद्रुम योगात आहे. तेजस्वीच्या कुंडलीत बाराव्या स्थानी शनी आणि शुक्र मोठा राजयोग बनवत आहेत. शुक्र आणि शनीवर गुरुची दृष्टी आहे. गेल्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष बनूनही सत्तेचा आनंद मिळविण्यासाठी त्यांना २२ महिने वाट पाहावी लागली.
तेजस्वी यादवांच्या कुंडलीत सातव्या स्थानी केतू बसल्यामुळे त्यांनी परंपरेबाहेर जाऊन विवाह केला. सातव्या घरातील चंद्र कुंभ राशीत शनिच्या राशीत आहे आणि तो शनी आणि गुरु या दोघांवर दृष्टि ठेवून आहे, जो लग्नानंतर मोठ्या भाग्याचा योग आहे. नवांश कुंडलीमध्ये मिथुन राशीत आपल्या मित्र बुधाच्या केंद्रस्थानी गुरूकडून चंद्र एक शुभ गजकेसरी योग तयार करत आहे, त्यामुळे पत्नीकडून चांगले सहकार्य मिळण्याचा योग आहे. सप्टेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत बुधातील चंद्राची विमशोत्तरी दशा त्यांच्यासाठी खूप शुभ आहे.
दुसरीकडे, नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा बुधवार, १० ऑगस्ट रोजी दुपारी शपथविधी पार पडला. तेव्हा वृश्चिक राशी उदय होत होती. सहाव्या भावातील मंगळाची दृष्टी पडणे तसेच पाचव्या स्थानी गुरुची शुभ दृष्टी हे सरकारच्या स्थिरतेसाठी चांगले योग आहेत. राजसत्तेच्या दशम स्थानी लाभदायक बुध सिंह राशीत आणि दशमात सूर्य भाग्यस्थानात शुक्र ग्रहासोबत असणे आणि त्यावर मंगळ, गुरु आणि शनि यांची दृष्टी असणे हा बलवान योग बनत आहे.
महागठबंधन त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. नितीश कुमार यांच्या शपथविधी कुंडलीत चंद्र धनु राशीतील उत्तराषाढ निश्चित नक्षत्रात असून प्रीति योगाने संपन्न आहे. जे नितीश कुमारांसाठी अतिशय शुभ परिस्थिती दाखवत आहे. गुरुचे स्वतःच्या राशीत मीन राशीत चंद्रापासून चौथ्या भावात स्थान केल्याने शुभ 'गजकेसरी योग' निर्माण होत आहे.
आताच्या घडीला या वृश्चिक राशीच्या शपथग्रहण कुंडलीत १७ एप्रिल २०२३ पर्यंत सूर्यातील राहूची कठीण स्थिती आहे. कुंडलीच्या ६ व्या स्थानी राहूचे मंगळ बरोबर स्थान दर्शवित आहे की, पुढील काही महिन्यांत बिहारमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांची कायदेशीर कार्यवाही तीव्र होईल. यामुळे सरकारमधील काही नेत्यांना त्रास होईल. मे २०२३ पर्यंत या युतीला काही मोठ्या आव्हानांचाही सामना करावा लागणार आहे.
मात्र, यानंतर सूर्याच्या गुरुच्या शुभ दशेत या आघाडीचे नेते नितीश कुमार केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देताना दिसणार आहेत. ज्यामुळे २०२४ ची लोकसभा निवडणूक अत्यंत रंजक होणार आहे. नितीश कुमार यांच्या वृश्चिक राशीत मे २०२३ नंतर येणारी उच्च शुक्राची अंतरदशा त्यांची लोकप्रियता वाढवेल.
नितीश कुमार यांचा जन्म ०१ मार्च १९५१ रोजी झाला. सध्या मिथुन राशीच्या आपल्या कुंडलीत राहुची महादशा सुरू असून, गुरुच्या युतीत ‘चांडाळ’ योग तयार होत आहे. त्यामुळेच यावेळी नितीश कुमारांना हतबल होऊन भाजपशी संबंध तोडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.
नितीश कुमारांच्या कुंडलीमध्ये, केतुची अंतर्दशा सध्या मे २०२२ ते मे २०२३ या काळात राहुच्या दशेत असेल. रहस्यमय ग्रह केतु त्यांच्या कुंडलीतील मित्र ग्रह असलेल्या तिसऱ्या घरात स्थित आहे. ज्यावर गुरु, सूर्य आणि बुध यांची दृष्टी राहते, ज्यामुळे त्यांना बलवान मित्रांची साथ मिळेल.
नितीश कुमारच्या मिथुन राशीत, पंचमेश शुक्राची शुभ अंतर्दशा ३२ मे २०२३ पासून सुरू होईल आणि ३१ मे २०२६ पर्यंत राहील. शुक्र त्यांच्या कुंडलीतील दहाव्या घरात मीन राशीत मंगळासोबत आहे, ज्यावर भाग्याचा स्वामी शनीची दृष्टी आहे. राहुमधील शुक्राच्या या शुभ दशात नितीश कुमार सन २०२४ मध्ये दिल्लीतील केंद्रीय राजकारणात पंतप्रधानपदावर दावा करण्यासाठी खूप महत्त्वाकांक्षी बनण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतील. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे.