'या' तीन राशीच्या मुलांना सासू सासरे म्हणतात, 'जावई माझा भला!'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 01:43 PM2022-06-07T13:43:49+5:302022-06-07T13:47:16+5:30

सून कशी मिळेल, ती आपल्या घरात सामावून जाईल का? तिचे आपल्याशी मतभेद होतील का? अशी काळजी जशी वरपक्षाला असते, तशीच काळजी वधूपक्षालाही आपल्या होणाऱ्या जावयाबद्दल असते. जावई आपल्या लेकीला सांभाळून घेतील का? आपल्या घरी आल्यावर मानपान मागतील की मुलासारखे घरातले एक होतील? आपल्या एकुलत्या एका मुलीला नेल्यानंतर ते आपल्याकडे दुर्लक्ष करतील का? हे आणि असे अनेक प्रश्न वधू पक्षालाही सतावतात. त्यावर ज्योतिष शास्त्राने केलेला खुलासा पुढीलप्रमाणे-

मुलांपेक्षा मुली आपल्या आई-वडिलांची जास्त काळजी घेतात, असे अनेकदा म्हटले जाते. पण काही राशींची मुले आपल्या आईवडिलांचीच नाही तर सासू सासऱ्यांचीही आई वडिलांसारखी काळजी घेतात. असा जावई लाभणे दुर्मिळच. पण काही पालकांना हे सौख्य लाभते. अशा भाग्यवान लोकांचे जावई बहुतेक करून पुढील तीन राशींचे असतात.

वृषभ राशीचे लोक बुद्धिमान, मेहनती आणि भावुक असतात. ते कोणालाही दुःखी पाहू शकत नाहीत. त्यामुळेच त्यांना त्यांच्याशी संबंधित सर्व नातेसंबंध जपायला आवडतात आणि त्यांची काळजीही घेतात. ज्याप्रमाणे ते आई-वडिलांची सेवा करण्यास तत्पर असतात, त्याचप्रमाणे ते पत्नीच्या पालकांचीही काळजी घेतात. त्यामुळे सासरीदेखील त्यांना मान सन्मान मिळतो.

कर्क राशीचे पुरुष हुशार आणि सुसंस्कृत असतात. ते मोठ्यांचा आदर करतात आणि त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडतात. या गुणांमुळे ते कुटुंबाचे प्रिय ठरतात. त्यांचे आपल्या आईसारखेच सासूशी चांगले नाते जुळते. त्यामुळे त्यांना सासरीदेखील त्यांचे लाडकोड केले जातात. माहेर-सासर खुश असल्यामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि समाधानी जाते.

धनु राशीचे लोक मेहनती आणि प्रामाणिक असतात. हे लोक ज्यांच्याशी नाते जोडतात, ते शेवट्पर्यंत निभवतात. ते त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांची काळजी घेतात. हे लोक आपल्या घरी लाडके असतातच पण सासरच्यांचीही मने सहज जिंकतात. त्यांचा आनंदी स्वभाव समोरच्याला आकर्षून घेतो. असे लोक सासरी गेल्यावर माहेर असल्यासारखे बिनधास्त वावरतात आणि सासरकडूनही भरपूर प्रेम मिळवतात.