'या' चार राशींच्या वाट्याला येत्या काळात मंगळ 'मंगल' हो; आहेत धनवृद्धी व भाग्योदयाचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 05:06 PM2022-02-14T17:06:26+5:302022-02-14T17:11:59+5:30

ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. मंगळ लाल रंगाशी संबंधित आहे, जो अग्नि आणि क्रोध यांचा कारक आहे. मनुष्याचा स्वभावावर त्याचे भवितव्य अवलंबून असते. हा स्वभाव मंगळ ग्रहाच्या स्थानावरून निश्चित होतो. म्हणून त्याचे विशेष महत्त्व. शनिवार, २६ फेब्रुवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करेल.त्यानुसार पुढील चार राशींसाठी ग्रहमान अनुकूल असेल. डोकं शांत ठेवून काम केल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होईल आणि आपोआप धनवृद्धीचा मार्ग खुला होईल.

मार्च एन्डिंग नोकरी व्यापाराच्या दृष्टीने सगळा लेखा जोखा एकत्र करण्याचा मुहूर्त आणि नवीन आर्थिक वर्षाची नवी पर्वणी. ही संधी लाभदायक ठरणार आहे पुढील चार राशींना. ज्योतिष शास्त्र सांगते, मंगळ हा अमंगल करणारा ग्रह नसून मंगलमयी ठरणारा ग्रह आहे. त्यामुळे येत्या काळात संधीचे सोने करा आणि दीर्घकाळ लाभ मिळवा!

मेष राशीच्या दहाव्या घरात मंगळ प्रवेश करेल. दहाव्या घराला कर्मभाव म्हणतात. मंगळाचा या राशीत प्रवेश केल्याने करिअरमध्ये प्रगती होईल. यासोबतच नोकरीत बढतीचा मार्गही खुला होईल. याशिवाय धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. या राशीच्या लोकांसाठी जीवनशैलीत बदल करणे फायदेशीर ठरेल.

मंगळ वृषभ राशीच्या ९व्या घरात प्रवेश करेल. कुंडलीचे नववे घर भाग्याचे कारक स्थान आहे. अशा स्थितीत मंगळाच्या या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. संक्रमण काळात तुम्ही जे काम कराल, त्यात तुम्हाला प्रचंड यश मिळेल. व्यवसायाशी संबंधित समस्या संपतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. भाग्य तुम्हाला साथ देईल.

धनु राशीच्या दुसऱ्या घरात मंगळाचे भ्रमण होईल. धनाच्या घरामध्ये मंगळाच्या भ्रमणामुळे अचानक धनलाभाचे योग येतील. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत आर्थिक वृद्धी होईल. नवीन व्यवसायात आर्थिक प्रगती होईल.

मीन राशीच्या ११ व्या घरात मंगळाचे भ्रमण होईल. हे मूल्य उत्पन्नाचे आहे. मंगळाच्या या मार्गक्रमणात आर्थिक स्थिती मजबूत राहील. मंगळ संक्रमणाच्या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. याशिवाय व्यवसायात आर्थिक बाजू मजबूत राहील.