ज्याच्या सान्निध्याचे, तो आपला जीव घेईल म्हणून माणसाला भय वाटते त्या वाघ, सिंह, नाग अशासारख्या प्राण्यांनाही आपल्या संस्कृतीने देवत्त्व दिले आहे. हे आपल्या भारतीय संस्कृतीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल आणि म्हणून अशा काही प्राण्यांनाही आपल्याकडील कुळधर्म कुलाचारांमध्ये पूजेचा मान दिलेला आहे. इतकेच काय, पण त्यांचे स्वतंत्र सणवारही शास्त्रकारांनी सांगून ठेवलेले आहेत. त्यातील नागदिवाळी हा एक होय.