त्रिपुरारी पौर्णिमा: ५ राशींवर हरिहर कृपा, धनलक्ष्मीचे शुभाशिर्वाद; पद-पैसा-समृद्धी वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 02:25 PM2024-11-14T14:25:34+5:302024-11-14T14:41:53+5:30

Tripurari Purnima 2024: त्रिपुरारी पौर्णिमेला अनेक राशींना विविध लाभ होऊ शकतात. कोणत्या राशीवर असा असेल प्रभाव? जाणून घ्या...

Tripurari Purnima 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अनेकविध योग जुळून येत आहेत. मंगळ आणि चंद्र यांचा परिवर्तन योग, धन योग जुळून येत आहे. तसेच चंद्र आणि गुरु यांचा सुनफा जुळून येत आहे. शनी स्वराशीत विराजमान असल्यामुळे शश नामक राजयोग जुळून येत आहे. हे सर्व योग शुभ परिणाम कारक असल्याचे म्हटले जाते.

कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्ती झाल्यानंतर तुलसी विवाहारंभ होतो. कार्तिकी पौर्णिमेला तुलसी विवाह समाप्ती होते. कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे म्हटले जाते.

त्रिपुरारी पौर्णिमेला महादेव आणि श्रीविष्णू यांची अपार कृपा काही राशींना लाभू शकेल. १५ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा आहे. कोणत्या राशींना त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय शुभ लाभाची ठरू शकेल? कोणत्या राशींनी काय काळजी घ्यावी? जाणून घेऊया...

मेष: यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. काही अडचणी आल्या तरी संयम सोडू नका. हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. अचाट साहस करणे टाळा. कायद्याची बंधने पाळा. अनावश्यक खर्च आणि वाद टाळा. कालांतराने अडचणी दूर होतील. जे ठरवाल, ते सिद्धीस जाईल. सब्र का फल मीठा होता हैं, हे आवर्जून ध्यानात ठेवा.

वृषभ: मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यात खूप व्यस्त राहाल. घरातील कामांसाठी वेळ काढावा लागेल. महत्त्वाची कामे ऐरणीवर येतील. मोठ्या उलाढालीत सतर्क राहावे. देवाणघेवाण करताना कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. प्रवासात सतर्क राहा. ताण कमी होईल. प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल.

मिथुन: पर्यटनाचे बेत ठरतील. मनात शंका असतील. कामात अनपेक्षित बदल होऊ शकतात. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. मित्रमंडळींचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. मनात आध्यात्मिक विचार राहतील.

कर्क: एखाद्या कामात खूप व्यस्त राहाल. दगदग, धावपळ करावी लागेल. सार्वजनिक कार्यात सावधपणे वागण्याची गरज आहे. झेपतील तेवढीच कामे करा. काही लोक बदनामी करण्याचा प्रयत्न करतील. मात्र, संयम सोडू नका. परिस्थिती आटोक्यात येईल. नवीन संधी मिळतील. नोकरीत महत्त्व सर्वाच्या लक्षात येईल. 'मौनं सर्वार्थ साधनं' हे लक्षात ठेवा.

सिंह: व्यवसायात सतत व्यस्त राहाल. काही आव्हाने पेलावी लागतील. अचाट साहस करण्याच्या भानगडीत पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. कायद्याची बंधने मोडू नका. नेहमीची कामे वेळच्या वेळी करा. भाग्याची साथ मिळेल. अडचणी दूर होतील. एकंदरीत कालावधी चांगला जाईल.

कन्या: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. प्रत्येक बाबतीत सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणाला आश्वासन देऊ नका. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. वाहन जपून चालवा. रहदारीचे नियम धाब्यावर बसवू नका. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला घ्यावा. कणखरपणा कामी येईल आणि लोक नरमतील.

तूळ: हाती पैसा येईल. आर्थिक बाजू बळकट झाल्यामुळे बचत करण्यात स्वारस्य राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. भावंडांशी सख्य राहील. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या मनात काय चालू आहे. ते समजून घ्या. आरोग्याची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. व्यवसायात भरभराट होईल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. अपेक्षित कामे होतील.

वृश्चिक: मनात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला राहील. त्या जोरावर मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवाल. कामाचा ताण राहील. वेळेचे नियोजन नीट केल्यास कामे आटोक्यात येतील. घरी पाहुणे मंडळी येतील. किरकोळ कारणावरून वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष करता कामा नये. मुलांच्या संगतीकडे लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्यावी. घड्याळाकडे लक्ष देऊन कामे करा.

धनु: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. भावंडांशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. जवळच्या प्रवासाचा योग येईल. प्रवासात सतर्क राहा. घरात किरकोळ स्वरूपाचा वाद विकोपाला जाऊ देऊ नका. गैरसमज टाळा. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. योजना लोकांना सांगत बसू नका. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. सरकारी कामे मार्गी लागतील.

मकर: आर्थिक आवक बऱ्यापैकी राहील. देवाणघेवाणीचे व्यवहार जपून करा. कुणी गुंतवणुकीचा चुकीचा सल्ला देऊ शकते. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा. व्यवसायात अंदाज चुकू शकतात. काहींना जवळच्या प्रवासाचा योग येईल. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. तुमचे पत्ते लोकांसमोर उघड करू नका. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल.

कुंभ: शुभ फळे मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. सावधपणे व्यवहार करा. वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना कागदोपत्री नोंदी नीट करा. करारातील अटी आणि शर्ती वाचून घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.

मीन: काही अडचणी असतील. कायद्याची बंधने पाळा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मनात काळजीचे विचार असतील. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. थोडे खंबीरपणे वागण्याची गरज आहे. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.