Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 01:41 PM 2024-11-15T13:41:15+5:30 2024-11-15T13:45:59+5:30
Tripuri Purnima 2024: आज १५ नोव्हेंबर, कार्तिक पौर्णिमा(Kartik Purnima 2024), तिलाच आपण त्रिपुरी पौर्णिमा (Tripuri Purnima 2024) तसेच त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखतो. आजच्या तिथीला महादेवांनी त्रिपुरासुराचा वध केला होता, त्या त्रिपुराचे प्रतीक म्हणून ही वात महादेवासमोर लावली जाते आणि आपल्या मनातल्या दुष्ट भावनांच्या रुपी असलेल्या त्रिपुरासुराचा नायनाट होऊ दे अशी प्रार्थना केली जाते. त्रिपुरी वात म्हणजे ७५० वातींचा समूह; आजच्या दिवशी त्रिपुरी वात जाळली जाते. मनुष्य मन षड्विकारांनी ग्रासलेले असते, त्रिपुर वात जाळल्यामुळे त्या विकारांचे दमन व्हावे अशी प्रार्थना केली जाते. षडरिपू आवश्यक आहेत, पण ते मर्यादित स्वरूपात ठेवायला हवेत ही जाणीव त्रिपुरी वात जाळताना मनाला दिली जाते.
महादेवासमोर त्रिपुर वात जाळण्यामागे आणखी एक कारण म्हणजे, ज्याप्रमाणे महादेवांनी त्रिपुरासुराचा वध करून देवांच्या आयुष्यातील अंधःकार दूर केला त्याप्रमाणे आपल्याही आयुष्यातील अडी-अडचणी दूर करून महादेवांनी आपले आयुष्य प्रकाशमान करावे अशी प्रार्थना केली जाते.
त्रिपुरी पौर्णिमेला महादेवाच्या उपासनेचा दिवस समजला जातो. या दिवशी शिवपिंडीवर दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो. दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. बेल व पांढरे फुल वाहिले जाते. शिवस्तोत्र म्हटले जाते. त्रिपुरी वात पूर्ण जळली की त्याचे भस्म शिवलिंगाला आणि घरातल्या सर्वांना अंगारा म्हणून लावले जाते. या दिवशी दानालाही अधिक महत्त्व असते.
आजच्या दिवशी घर, अंगण, परिसर, मंदिर दिव्यांच्या रोषणाईने उजळून टाकतात, देव दिवाळी साजरी करतात. दीपमाळ प्रकाशित केल्या जातात, तसेच दीप दानही केले जाते. आपल्या मुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातला अंधार दूर व्हावा ही त्यामागील सद्भावना असते. दीप दानाबरोबर गरजू व्यक्तीला आवश्यक वस्तू देखील दान करता येतात. त्यामुळेही अडचणींचा अंधार दूर होण्यास मदत होऊ शकते.
पूर्वी ही वात घरातल्या स्त्रिया बनवत असत. कापूस पिंजून बारीक दोर ओढत अडीच वेढ्याची एक वात करत ७५० वातींचा समूह केला जात असे.आता ही वात बाजारात सहज विकत मिळते.