स्वयंपाकघरात अजाणतेपणी ठेवलेल्या 'या' गोष्टी तुमच्या दैन्य-दुःखाला कारणीभूत ठरतात! By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 02:43 PM 2021-07-28T14:43:41+5:30 2021-07-28T14:52:39+5:30
स्वयंपाकघरची दिशा आणि त्यामध्ये ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंबाबत वास्तुशास्त्रात बरेच नियम सांगितले गेले आहेत. स्वयंपाक घराचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी येत असल्यामुळे तिथे ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंची डोळसपणे निवड झाली पाहिजे. तसेच स्वयंपाकघराची स्वच्छता राखली पाहिजे. याशिवाय काही अनावश्यक गोष्टी स्वयंपाकघरातून हद्दपार केल्या पाहिजेत. त्यामुळे घरातील दुःख दारिद्रय नष्ट होण्यास मदत होते. मळलेले पीठ रात्रभर घरात ठेवणे वास्तुशास्त्र आणि आहारशास्त्रानुसार रोज ताजे अन्नच खाल्ले पाहिजे. परंतु अनेक गृहिणी दुसऱ्या दिवशी सकाळी डब्याला उशीर नको म्हणून रात्रीच कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवून देतात. परंतु तसे करणे आरोग्य आणि वास्तूशास्त्र या दोहोंच्या दृष्टीने अयोग्य आहे. यामुळे शरीरात व पर्यायाने घरात नकारात्मक ऊर्जा येते. मळलेले पीठ रात्रभर ठेवल्याने सकाळचे काम एकवेळ सोपे होईल परंतु आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्या तर विकतचे दुखणे होईल. म्हणून शक्यतो ही सवय बदलून थोडे वेळेचे नियोजन करून ताजे अन्न खाणे सर्वार्थाने उचित होईल.
स्वयंपाकघरात औषधे ठेवणे आपण जे अन्न खातो, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अन्न आपल्या शरीरात ऊर्जा निर्मितीचे काम करते. ते सकस असेल तर अनारोग्याचे प्रश्न उद्भवणार नाहीत. परंतु एकदा आजारपण लागले, तर ते दूर होता होत नाही. यासाठी वास्तुशास्त्र सांगते, स्वयंपाकघरापासून दूर ठेवा. अन्यथा घरातला पैसा सतत उपचारांवर खर्च होतो. एकाच्या आजारपणाने घरावर अवकळा येते आणि घरालाच आजारपण येते. म्हणून हा छोटासा उपाय करून स्वयंपाक घर आणि औषधांचा परस्पर संबंध येणार नाही याची काळजी घेणे इष्ट ठरते.
स्वयंपाकघरात देवघर जागेअभावी अनेक जण स्वयंपाक घरात मिळेल त्या भिंतीवर देवघर करतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार ते अगदी चुकीचे आहे. देवघराचे वातावरण नेहमी सात्विक हवे. देवालाही आपण सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवतो. परंतु आपल्या स्वयंपाकघरात कांदा, लसूण, मांसाहार यांचा सढळ वापर होतो. अशा ठिकाणी देवाचे मंदिर उभारले, तर देवाची पूजा करताना स्वयंपाकघरातील पदार्थांच्या वासाने आपले लक्ष विचलित होईल. देवाच्या पूजेत एकाग्र होणार नाही. यासाठी घरातल्या शांत ठिकाणी देवघर असावे, अन्यथा नकारात्मक परिणाम दिसून येतात.
स्वयंपाकघरात आरसा ठेवणे स्वयंपाकघरात आरसा ठेवणे देखील अशुभ आहे. अग्नीशी किंवा ऊर्जेशी संबंधित गोष्टी, जसे की गॅस, मायक्रोवेव्ह, इंडक्शन इत्यादींचे प्रतिबिंब आरशात दिसले तर घरात कधीही न संपणारी संकटमालिका सुरू होऊ शकते असे वास्तुशास्त्र सांगते. विषाची परीक्षा टाळायची असेल, तर स्वयंपाक घरातील आरसा त्वरित काढून टाका.