उद्धव ठाकरेंवर 'गुरू' रुसलाय, ८ जुलैपर्यंतचा काळ शिवसेनेसाठी कठीण; वाचा कुंडली काय सांगतेय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 03:26 PM2022-06-23T15:26:38+5:302022-06-23T15:33:00+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रास कोणती? महाविकास आघाडी सरकार तरणार की पडणार? शिवसेना पक्ष आणि त्यांच्या कुंडलीतील ग्रहस्थिती नेमकं काय सांगते? जाणून घ्या...

आताच्या घडीला महाराष्ट्राचे राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघत आहे. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडखोरी ही शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेनेला हे एक मोठे भगदाड मानले जात आहे. राज्यातील राजकारणातील मोठा भूकंप मानला जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठिंबा वाढत असल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूणच घडामोडी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारसाठी (CM Uddhav Thackeray) धक्का आणि धोका मानला जात आहे.

महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आलेले हे संकट गहिरे होताना दिसत आहे. ज्योतिषाशास्त्राच्या दृष्टिने आताच असे का घडले असावे. महाविकास आघाडीची स्थापना, शिवसेनेची सुरुवात आणि उद्धव ठाकरे यांची कुंडली नेमके काय सांगते? जाणून घेऊया... (uddhav thackeray janam kundali)

आपल्या राजकीय स्वभावाच्या विरोधात जाऊन, शिवसेनेने २८ नोव्हेंबर २०१९ रोजी एकेकाळचे कट्टर प्रतिस्पर्धी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह शपथ घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. यावेळी सहाव्या, सातव्या आणि आठव्या या स्थानी सर्व ग्रह होते. (Maha Vikas Aghadi Kundali)

उद्धव ठाकरे सरकारच्या मुहुर्तावर वृषभ लग्न उदय होते. मेदिनी ज्योतिषशास्त्रानुसार, सहावे स्थान राजकीय सूडाचे प्रतिनिधित्व करते, सातवे घर विरोधाचे प्रतिनिधित्व करते आणि आठवे घर राजकीय षड्यंत्राचे प्रतिनिधित्व करते.

शपथविधीच्या कुंडलीच्या सहाव्या घरात असलेले मंगळ आणि बुध यांमुळे ठाकरे सरकारला सुरुवातीलाच कोरोना महामारीला सामोरे जावे लागले आणि नंतर मोठ्या वादांना तोंड द्यावे लागले. सप्तमातील सूर्य विरोधी पक्षाकडून मोठ्या राजकीय कटाला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.

आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाच्या अर्ध्याहून अधिक आमदारांसह महाराष्ट्राबाहेर जाऊन 'महाविकास आघाडी'चे सरकारला धक्का देण्याच्या बेतात आहेत. अशा स्थितीत शिवसेना पक्षाचे अस्तित्व वाचविण्याचे आव्हान आता उद्धव ठाकरेंसमोर आहे.

शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ रोजी वृश्चिक लग्न स्थानी असताना झाली. (Shiv Sena Kundali) या पक्षाच्या कुंडलीत बुध, सूर्य, चंद्र आणि गुरूचा अप्रतिम योग वादाचे स्थान मानल्या जाणाऱ्या आठव्या घरात तयार होत आहे. या चार ग्रहांशिवाय मंगळ आणि शनि यांसारखे अग्नितत्वाचे ग्रह वृश्चिक राशीच्या शिवसेनेच्या कुंडलीतील वाणी स्थानावर दृष्टी ठेवून ​​आहेत. या योगाच्या प्रभावाने हा पक्ष आपल्या मुखपत्र सामना आणि नेत्यांच्या आक्रमक विधानांनी नेहमीच प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असतो.

योगायोगाने आताच्या घडीची स्थिती उद्धव ठाकरेंच्या शपथविधीची कुंडली आणि शिवसेनेची कुंडलीतील ४ ग्रहांचा असाच योग आठव्या स्थानी तयार झाला आहे. सध्या शिवसेनेच्या वृश्चिक लग्न कुंडलीत बुध दशेत राहुची कठीण दशा ८ जुलै २०२२ पर्यंत कठीण स्थितीत आहे. शिवसेनेच्या कुंडलीत राहु सहाव्या (विवाद) स्थानातील स्वामी मंगळासोबत सातव्या घरात अंगारक योग बनवत आहे. त्यामुळे पक्षाचे अनेक आमदार अपात्र ठरू शकतात, असे म्हटले जाते.

२७ जुलै १९६० रोजी मुंबईत जन्मलेल्या महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Kundali) यांच्या कुंडलीत लग्नस्थानी कन्या रास असून, उद्धव ठाकरे यांची रास सिंह आहे. जन्म लग्नाच्या केंद्रात गुरु आणि बुध स्वतःच्या राशीत असल्याने उद्धव ठाकरे हे स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत. गुरुच्या दशेतील केतुची कठीण दशेमुळे डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे त्यांच्या कार्यकाळात नेहमीच संकटांशी झुंज देत आहेत.

भारतातील कोरोना महामारीचा सर्वांत भीषण सामना महाराष्ट्राला करावा लागला. २०२० मध्ये सुशांत सिंग राजपूतचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर, फिल्म इंडस्ट्रीजमधील ड्रग रॅकेटवरून विरोधकांनी त्याच्या पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या गुरू ग्रहातील शुक्राची ६/८ (षडष्टक) दशा सुरू असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी पडझड सुरू आहे.

गुरू आणि शुक्राची विमशोत्तरी दशा ऑक्टोबर २०२० ते जून २०२३ पर्यंत आहे, ज्यामध्ये ३ मार्च २०२२ ते १४ जुलै २०२२ पर्यंत गुरूची दशा आहे. ही ग्रहस्थिती उद्धव ठाकरे यांच्या आरोग्यासाठी शुभ नसल्याचे सांगितेल जात आहे.

आपल्या कन्या राशीच्या कुंडलीत नवव्या घराचा स्वामी शुक्र अकराव्या (लाभदायी) भावात स्थित आहे, परंतु शत्रू राशीत कर्क असल्यामुळे बाह्य स्थानाचा स्वामी सूर्याशी युती होत आहे.

या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पक्षाचे अस्तित्व वाचवू शकतात, पण सरकारवरील संकट दूर करण्यात ते असमर्थ ठरू शकतात, त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटही येऊ शकते, असे सांगितले जात आहे.

सदर माहिती काही गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. परंतु, आगामी कालावधीत महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार पडणार की तरणार, एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होणार का, याकडे संपूर्ण देशासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.