वास्तूत थोडेसे फेरबदल करूनही दूर करता येतात वास्तुदोष, कसे ते वाचा! By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 10:09 AM 2021-09-08T10:09:23+5:30 2021-09-08T10:24:16+5:30
अनेकदा घरात एकामागोमाग एक अपयशाचा, अडचणींचा, वादांचा ससेमिरा मागे लागतो. काही जण त्याला वास्तुदोष असेही नाव देतात. त्याचे स्वरूप ओळखणे हे अभ्यासकांचे काम आहे. सर्वसामान्य माणसाला ते लक्षात येतील असे नाही. म्हणून काही जाणकारांनी सुचवलेले फेरबदल आपल्या वास्तूत करून बघा, जेणेकरून फार डागडुजी न करता, असतील नसतील तेही वास्तुदोष घरातून निघून जातील. वास्तुदोष दूर करणे म्हणजे अनेकांना वाटते की वास्तुविशारद घरात तोड फोड करून नवीन रचना करायला सांगणार. या विचाराने, काही जण दुरुस्ती, सुधारणा विचारायलाही घाबरतात. परिणामी चुकीच्या गोष्टी तशाच राहतात आणि त्याच्या प्रभावामुळे वाईट परिणाम घडतात.
वास्तुदोष दूर करण्याचे नानाविध मार्ग आहेत. दर वेळी फोडा आणि राज्य करा ही ब्रिटिशांची वृत्ती वापरली जाते असे नाही. मात्र जिथे आवश्यक तिथे हा पर्याय नाईलाजाने वापरावा लागतो. जसे की दक्षिण दिशेला देव्हारा, पूर्व दिशेला बाथरूमचे दार, दाराच्या वर टांगलेले घड्याळ इ. गोष्टी वास्तूला मानवत नाहीत. परंतु पर्याय सगळीकडे असतात. प्रश्न निर्माण झाले म्हणजे उत्तर असणारच याची खात्री बाळगली पाहिजे. त्यासाठीच पुढील उपाय-
तुमच्या घराच्या छतावर अनावश्यक सामान असेल, तर कृपया ते काढून टाका. तुम्ही फ्लॅटमध्ये किंवा चाळीत राहत असाल, तर छताला जोडून असलेल्या माळ्यावर अडगळ ठेवू नका. घराच्या ईशान्य दिशेला पाण्याची टाकी ठेवा. वास्तुदोष दूर होईल.
वास्तू शास्त्रानुसार स्वयंपाकघराचे आणि बाथरूमचे दार परस्परासमोर येणे उचित नाही. परंतु तुमच्या वास्तूची रचना आधीच तशी झालेली असेल तर काळजी करू नका. मध्ये एखादा पडदा टाकलात तरी नकारात्मक ऊर्जेला आळा बसू शकेल.
वास्तूच्या अग्नेय दिशेला स्वयंपाकघर असेल तर उत्तम. तसे नसेल तर स्वयंपाक घराच्या अग्नेय दिशेला गॅस शेगडी ठेवावी. तेही शक्य नसेल, तर वास्तूच्या अग्नेय दिशेला एक छोटा बल्ब लावून घ्यावा.
घराची खिडक्या-दारे उघड बंद करताना वाजत असतील, तर त्यांना वेळीच तेलपाणी करा. दारं खिडक्यांचा कराकरा होणारा आवाज वास्तूसाठी चांगला नाही. तसेच घरातल्या दारांची आदळआपट करणेही योग्य नाही. वास्तूचा मान नेहमी ठेवावा, कारण वास्तू तथास्तु म्हणते!