Vastu Shastra: वास्तूवर भाग्यलक्ष्मी प्रसन्न राहावी म्हणून झाडूशी संबंधित टाळा 'या' चुका! By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 01:19 PM 2024-08-17T13:19:27+5:30 2024-08-17T13:24:39+5:30
Vastu Tips: दिवाळीत लक्ष्मीपूजेला आपण केरसुणीची अर्थात झाडूची पूजा करतो. कारण आपण झाडूला लक्ष्मी स्वरूप मानतो. त्यामुळे असे म्हटले जाते, की ज्या घरात झाडूशी संबंधित वास्तू नियम पाळले जातात, त्या घरावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते. तुम्हालाही आपल्या वास्तूवर लक्ष्मीचा वरदहस्त राहावा असे वाटत असेल, तर चला जाणून घेऊया झाडूशी संबंधित वास्तुनियम! आपल्या वास्तूवर लक्ष्मी प्रसन्न नसेल तर घर चालणार तरी कसे? लक्ष्मी कृपा राहावी म्हणून आपण आजवर परंपरेने चालत आलेल्या नियमांचे पालन करतो. वास्तू शास्त्रात त्या नियमांचा सविस्तर खुलासा केलेला आढळतो. आपल्याकडून अजाणतेपणी जर काही चूक होत असतील तर त्या सुधारण्यासाठी जाणून घेऊया झाडूसंबंधीचे वास्तुनियम!
झाडूला कधीही लाथ मारू नका पुस्तकावर लाथ मारणे म्हणजे माता सरस्वतीचा अपमान मानला जातो, त्याचप्रमाणे झाडूचा अनादर करणे हा लक्ष्मीचा अपमान मानला जातो. ज्याप्रमाणे पुस्तकावर लाथ मारल्याने सरस्वती माता रुष्ट होते, त्याचप्रमाणे झाडूचा अनादर केल्याने लक्ष्मी माता रुष्ट होते. म्हणून झाडूला चुकूनही पाय लागला तर लगेच नमस्कार करून माफी मागावी.
झाडूला लक्ष्मी स्वरूप का मानतात? झाडू हे केवळ स्वच्छतेचे प्रतीक नसून ते देवी लक्ष्मीचे रूपही मानले जाते. असे मानले जाते की झाडूचा अनादर करणे म्हणजे देवी लक्ष्मीचा अनादर करण्यासारखे आहे. कारण जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी असते. ज्योतिष शास्त्रानुसार झाडूला धन आणि संपत्तीशी संबंधित शुक्र ग्रहाशी जोडले आहे. शुक्र ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. स्वच्छतेचा आणि सुखाचा निकटचा संबंध असल्यामुळे स्वच्छता करणाऱ्या झाडूचा संबंध लक्ष्मीशी जोडला आहे.
झाडू नजरेस पडू देऊ नका झाडू नेहमी घरात अशा जागेवर ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची नजर जाणार नाही. ज्याप्रमाणे आपण धन खुलेआम न ठेवता तिजोरीत ठेवतो. तसेच स्वच्छता करणारे साधन अर्थात झाडू हा दर्शनीय ठिकाणी न ठेवता स्वयंपाक घराच्या दारामागे किंवा अंगण, गॅलरीत कोपऱ्यात ठेवावा.
झाडू उभा ठेवू नका अनेकांना झाडू उभा ठेवण्याची सवय असते. त्यातही काही जण झाडण्याचा भाग खाली आणि बांधलेला भाग वरच्या दिशेने ठेवतात. त्यामुळे एक तर झाडू खराब होतो आणि आर्थिक स्थिती खालावते. तर काही जण झाडूची बांधलेली बाजू खाली आणि झाडायची बाजू वर ठेवतात, मात्र झाडू असा ठेवल्याने भांडणं होतात असे म्हटले जाते. यासाठी झाडू ठेवण्याची योग्य पद्धत म्हणजे तो जमिनीला समांतर आडवा ठेवणे.
झाडू ठेवण्याची योग्य दिशा जर तुम्हाला धन लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला झाडू ठेवा. घराची पश्चिम दिशा भाग्यलक्ष्मीशी संबंधित मानली जाते, म्हणून तुम्ही झाडू दक्षिण-पश्चिम किंवा पश्चिम दिशेलाच ठेवावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील.