Vastu Shastra: दुसऱ्याचे घड्याळ वापरू नका; तुमच्यावर येऊ शकते वाईट 'वेळ'; वास्तू शास्त्र सांगते... By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 03:13 PM 2024-03-18T15:13:48+5:30 2024-03-18T15:24:14+5:30
Vastu Tips: मोबाईल हातात आल्यापासून घड्याळाचा वापरत तुलनेत कमी झाला आहे. पण म्हणूनच की काय, लोक वेळ पाळण्याच्या बाबतीतही ढेपाळले आहेत. वक्तशीरपणा अंगी बाणायचा असेल तर मनगटावर घड्याळ बांधून वेळेचे पालन करणेही महत्त्वाचे आहे. मात्र ही वेळ उसनी घातलेली अर्थात दुसऱ्याच्या मालकीचे घड्याळ नको, तर स्वतःच्या मालकीचे असावे. अन्यथा दुसऱ्यांच्या घड्याळाबरोबर दुसऱ्यांवर आलेली वेळ तुमच्यावरही येऊ शकते. म्हणून पुढीलप्रमाणे घ्या काळजी! डिजिटल ऐवजी काट्याचे घड्याळ वापरा सध्या डिजिटल घड्याळाचे युग असले तरी ज्योतिष शास्त्र तसेच वास्तुशास्त्र आपल्याला काट्याचे घड्याळ वापरा असे सांगतात. घड्याळाचे काटे नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात आणि चांगला काळ येण्यास मदत करतात.
घड्याळाचा रंग कोणत्या रंगाचे घड्याळ वापरायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, तरीदेखील महत्त्वाच्या कामाला जाताना सोनेरी किंवा रुपेरी घड्याळ वापरणे केव्हाही चांगले. त्यामुळे न होणारे कामही मार्गी लागते. महत्त्वाच्या कामाच्या वेळी तसेच शुभ प्रसंगी काळ्या पट्ट्याचे घड्याळ वापरणे शक्यतो टाळावे.
उशीखाली घड्याळ ठेवू नका अनेक लोकांना रात्री मनगटाचे घड्याळ उशीखाली ठेवून झोपण्याची सवय असते. पण मनगटावर घड्याळ कधीही उशीखाली ठेवू नका. यामुळे तुमच्या मनात नकारात्मक ऊर्जा येईल आणि झोपेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.
घड्याळाचे डायल घड्याळ घालताना लक्षात ठेवा की घड्याळाचा डायल खूप मोठा नसावा. मोठे डायल घड्याळ घातल्याने तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अडचणी येऊ शकतात. त्याच वेळी, खूप लहान डायल असलेले घड्याळ घालू नका. घड्याळाच्या डायलच्या आकाराबद्दल बोलायचे तर, गोल किंवा चौकोनी आकाराचा डायल अधिक शुभ मानला जातो.
बंद घड्याळ काहीही झाले तरी घरात बंद घड्याळ ठेवू नका. त्यामुळे तुमच्या भाग्याचे चक्र थांबते, प्रगती थांबते. म्हणून अडगळीच्या सामानातही नादुरुस्त घड्याळ ठेवू नये. मग ते मनगटावर बांधण्याचे घड्याळ असो नाहीतर भिंतीवर लावायचे घड्याळ, ते बंद स्थितीत असेल तर घरात ठेवू नका, वेळीच टाकून द्या. त्या बंद पडलेल्या घड्याळाबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जाही संपुष्टात येईल. (लेखातील माहिती वास्तू तसेच ज्योतिष शास्त्रावर आधारित मान्यतेनुसार दिली आहे)