तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 01:28 PM 2024-09-17T13:28:36+5:30 2024-09-17T13:46:41+5:30
४ हजार वर्षांपासून उपलब्ध असलेली आणि अगदी १० ते २० रुपयांत मिळून जाणारी तुरटी अतिशय लाभदायी, दोषनिवारक आणि भाग्योदय करणारी मानली जाते. जाणून घ्या... ज्योतिषशास्त्रात अनेक समस्या, अडचणी, अडथळे यांवर उपाय सांगितले आहेत. ज्योतिषशास्त्राचीच एक शाखा असलेल्या वास्तुशास्त्रात वास्तुदोषाबाबत काही उपाय सांगितले गेले आहेत. हे उपाय केल्याने काही प्रमाणात बदल दिसून येऊ शकतो, अशी लोकभावना असल्याचे सांगितले जाते. सर्वसामान्यपणे घरोघरी आढळणारी तुरटी ही भाग्यकारक, अनेक दोषांवर प्रभावी उपाय म्हणूनही वापरली जाऊ शकते, असे म्हटले जाते.
सर्वसामान्यपणे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो, हे आपण अगदी लहानपणापासून पाहतो. आधुनिक काळात अनेक प्युरिफायर बाजार उपलब्ध असले, तरी आजही बहुतांश ठिकाणी तुरटी गढूळ पाण्यावर रामबाण ठरत आहे. वैज्ञानिक संज्ञेनुसार, हायड्रेटेड पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट या संयुगाला मराठीमध्ये तुरटी असे म्हणतात. बॉक्साइट तसेच ॲल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते.
तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती असल्याचे पुरावे इजिप्तमध्ये आढळले. तसेच भारतीय गणितज्ज्ञ वराहमिहिर यांच्या लेखनात पाचव्या शतकात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे. तुरटीचे स्फटिक समकोन अष्टकोनाकृती असतात. भाज्या आणि फळे यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. याशिवाय तुरटी जंतुनाशक असल्यामुळे केशकर्तनालयातही प्रामुख्याने वापर केला जातो.
प्राचीन काळापासून भारतातील सौराष्ट्र प्रदेशात तुरटी तयार केली जात आहे. तुरटीत अनेक औषधीय गुण असले, तरी तंत्र शास्त्रानुसार, तुरटीचे काही उपाय आपणासाठी लाभदायक सिद्ध होऊ शकतात. तुरटीच्या या उपायांमुळे नैराश्य, नकारात्मकता यांसह अनेक समस्यांतून आपणस मुक्ती मिळू शकते, असे सांगितले गेले आहे.
छाया आणि मायावी क्रूर ग्रह मानण्यात आलेला राहु ग्रह कुंडलीत कमकुवत असेल किंवा राहु दोष आला असेल, तर तुरटीचे काही उपाय सांगितले जातात. तुरटी कापडात बांधून पुडी बनवा. राहु ग्रहाच्या शांतीसाठी गंगेच्या पाण्यात ही पुडी भिजवा आणि ही पुडी नेहमी घरातील पूजास्थानी ठेवा. राहु मंत्राने अभिषेक करून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकवावा. राहुचा प्रभाव कमी करण्यासाठी तुरटीचा उदबत्तीमध्ये धूप करावा. राहु घरातील भांड्यांवर प्रभावी ठरतो. प्रभाव नियंत्रित करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने भांडी धुवा तसेच आंघोळीच्या पाण्यात तुरटी घालून त्याने स्नान करावे, असे सांगितले जाते.
तुरटीला फिटकरी असेही संबोधले जाते. तंत्रशास्त्रानुसार, व्यापार, व्यवसाय, उद्योग, दुकान, कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल, तर एका काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकान, कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजून बांधावी. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते. निराशेचे मळभ दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होऊ लागतो. इतकेच नव्हे तर यामुळे व्यापार, व्यवसाय, उद्योगात प्रगती होताना दिसते. तुरटीच्या या उपायामुळे टप्याटप्याने आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात, असे सांगितले जाते.
ज्योतिषी आणि वास्तूतज्ज्ञ सांगतात की, वास्तुशास्त्रानुसार घरात योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला तुरटी ठेवली तर वास्तूदोष तर दूर होतात. त्याचबरोबर आर्थिक समस्यांचे निराकरण होते. तुरटी अगदी सहजपणे उपलब्ध होते. तुम्ही ती खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. अगदी ५ ते १० रुपयांमध्ये येणाऱ्या तुटरीमुळे घरातील अनेक समस्या दूर होतात.
अनेक कुटुंबामध्ये वारंवार कलह होत असतो. भांडणे वाढत जातात. अशावेळी रात्री झोपताना पलंगाखाली एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुरटीचे तुकडे टाकावेत. सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडापाशी ओतून टाकावे. असे केल्याने कुटुंबातील कलहाचे गढूळ वातावरण स्वच्छ होण्यास सुरुवात होते. कुटुंबातील सदस्यांमध्ये सौहार्दपूर्ण नाते निर्माण होते. तसेच एकमेकांमधील नातेसंबंध दृढ होण्यास यामुळे मदत मिळते. सुमारे एक महिन्यापर्यंत हा उपाय करून पाहावा, असे सांगितले जाते.
असे मानले जाते की, घराच्या दारा-खिडक्यांमधून सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. म्हणून तुरटीचे काही तुकडे तुम्ही खिडकीत किंवा दरवाज्यांच्या वरती ठेवा. जर तुम्ही तुमच्या घराच्या दारांवर आणि खिडक्यांवर तुरटी ठेवाल तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही. तुरटी काचेच्या प्लेटमध्ये ठेवणे योग्य असल्याचे म्हटले जाते. बाथरूममध्ये तुरटीने भरलेली एक वाटी ठेवावी आणि दर महिन्याला ती बदलावी. याने नकारात्मक ऊर्जा दूर राहते.
तुरटीचे पाच तुकडे घ्या आणि ते सहा निळ्या फुलांसह एका नव्या काळ्या किंवा लाल कापडात बांधून नेहमी आपल्या खिशात ठेवा. खिसाही कायम पैशांनी भरलेला राहील. तुरटी खायच्या पानात बांधून खिशात ठेवणेही चांगले मानले गेले आहे.
तंत्रशास्त्रानुसार, नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेल्यावर उत्तम यश मिळावे, यासाठी तुरटीचा उपाय लाभदायक ठरू शकतो. तुरटीचे पाच तुकडे, सहा निळ्या रंगाची फुले आणि एक कमरेला बांधायचा बेल्ट या सर्व गोष्टी नवमी तिथी असताना देवी मातेला अर्पण कराव्यात. दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला सदर बेल्ट एखाद्या कन्येला द्यावा, फुले वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत आणि तुरटीचे तुकडे आपल्याजवळ ठेवावेत. हा उपाय केल्यावर नव्या नोकरीसाठीच्या मुलाखतीला जाताना अपक्षित यश वा परिणाम साध्य होण्याच्या शक्यता वाढू शकतात, असे सांगितले जाते.
अनेक प्रयत्न करूनही कर्ज फेडण्यासाठी अपेक्षित यश मिळत नाही, अशा वेळी तंत्रशास्त्रात दिलेले तुरटीचे उपाय उपयुक्त ठरू शकतील, असे सांगितले जाते. बुधवारी तुरटीवर शेंदूर टाकावा आणि शेंदुरयुक्त तुरटी विड्याच्या पानात बांधावी. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली ते पान पुरावे. असा उपाय सलग तीन बुधवार करावा, असे तंत्रशास्त्र सांगते. यामुळे आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होऊन कर्ज फेडीचे प्रयत्न यश देऊ शकतील, असे सांगितले जाते.
तंत्रशास्त्रानुसार, तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करावी. तसेच तुरटी आणि मिठाचे पाणी एकत्र करून घराची स्वच्छता केल्यास वास्तुदोष दूर होतो, असे सांगितले जाते. यामुळे नकारात्मकता दूर होते. घरात नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संचार होतो, असे सांगितले जाते. काही जणांना वारंवार दृष्ट लागते. अशा लोकांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुरटी फिरवून दृष्ट का तुरटी फिरवताने ती प्रत्येकवेळी तळव्याला लावावी. यानंतर ती तुरटी आगीत टाकून द्यावी. असे केल्याने वाईट नजरांचा परिणाम नगण्य होतो. दृष्ट लागल्यानंतरचा प्रभाव कमी होतो, असे सांगितले जाते.
तांब्याचे भांड्यात पाणी घ्या आणि त्यात तुरटीचा तुकडा ठेवा. त्यानंतर हे पाणी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडा. या उपायाने धन संबंधी दोष दूर होतात. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुरटीचे पाणी गुपचूप शिंपडल्यास आर्थिक लाभ होतो. दररोज तुळशीला तुरटीचे पाणी अर्पण करा. या उपायाने लक्ष्मीची कृपा लाभते. तसेच घरातील वाईट शक्ती नष्ट होते.
घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी रोज सायंकाळी घरात तुरटीचे पाणी शिंपडा. यामुळे ग्रहांचा क्रोध शांत होत घरात शांतता नांदते. तुम्हाला भितीदायक स्वप्ने पडत असतीत तर एका काळ्या भांड्यात तुरटीचे पाणी भरून रात्री पलंगाखाली ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ओतावे. या उपायाने लाभ होतो. - सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. ही माहिती सामान्य गृहितकांवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.