Vastu Shastra: घरसजावटीला महागडी रोपं कशाला? 'ही' आठ रोपं तुमचे पैसे वाचवतील आणि घर सुशोभित करतील!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 12:44 PM2024-07-03T12:44:05+5:302024-07-03T12:50:55+5:30

Vastu TIps: वास्तू शास्त्रानुसार हिरवीगार रोपं घरात लावल्याने त्या कोनाड्याची शोभा वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जादेखील निर्माण होते. यासाठी विशिष्ट प्रजातीची रोपं आणावी लागतात. ज्यांना सूर्यप्रकाश फारसा लागत नाही आणि फार देखभालही करावी लागत नाही. अशा आठ रोपांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

घराच्या आतल्या बाजूला लावायची रोपं अतिशय महाग असतात. इच्छा असूनही ती परवडत नाहीत म्हणून टाळली जातात. यावर उपाय म्हणून एका पानातून विस्तार करणारी रोपं जाणून घेऊया. जी कमी खर्चात घरात रुजतील, वाढतील आणि शोभाही वाढवतील.

मनी प्लांट : मनी प्लांटची एक फांदी मुळासकट २१ दिवस फुलदाणीत ठेवा. त्यात पाणी भरून ठेवा. मुळाची नीट वाढ झाली की ते रोप कुंडीत लावा. त्या वेलीचा विस्तार अतिशय वेगाने होतो आणि तो जितका वाढतो तेवढा पैशांचा ओघही वाढतो असे वास्तुशास्त्र सांगते.

स्नेक प्लांट : स्नेक प्लांटचे पान मध्यावर कापून ४१ दिवस पाण्यात ठेवले तर त्या अर्धवट कापलेल्या पानातून मूळ तयार होतात. नंतर ते पान कुंडीत रुजवले असता, मातीत त्याची भरभर वाढ होते आणि त्या एका पानाचे सुंदर रोपात रूपांतर होते.

विड्याचे पान : घरात आजी-आजोबा किंवा ज्येष्ठ मंडळींना पान खाण्याची सवय असते. त्यांच्याकडून एक विड्याचे पान घेतले किंवा एखाद्या पानाच्या टपरीवरून विड्याचे पान आणले आणि त्याचे बूड काही दिवस पाण्यात बुडवून ठेवले तर त्याला कोंब फुटतात. त्या कोंबांसहित ते पान मातीत रुजवले तर त्या पानाची वेल फोफावत जाते.

रबराचे झाड : रबराची पानं देखील देठासकट पाण्यात ठेवले असता काही दिवसांनी त्याला कोंब फुटतात आणि ते मातीत रुजवल्यावर विस्तारत जातात. रबराचे झाड घरात आकर्षक दिसते.

अग्लोनेमा : अग्लोनिमा हे अतिशय कमी सूर्यप्रकाशात सुंदर रोप आहे. त्याचे एक पान स्वच्छ धुवून पाण्यात किंवा डायरेक्ट मातीत लावले असता, त्यापासून सुंदर रोप आकार घेते.

जीजी रोप: कमी पाणी आणि कमी सूर्यप्रकाशात उगवणारे हे रोप घराच्या आतल्या बाजूला लावण्यासाठी वरदानच आहे. या रोपाचेही एक पान लागवडीसाठी पुरेसे आहे. ते कापून मातीत रुजवावे. कमी कालावधीत नवे रोप तयार होते.

क्रोटॉन : परदेशी बनावट असलेली ही रोपं कमी पाणी आणि कमी सूर्यप्रकाशात वाढतात. या रोपांची पाने काही दिवस पाण्यात ठेवल्याने कोंब तयार होऊन ती पाने मातीत रुजवल्याने नवीन आकर्षक रोप तयार होते.

कॅलेंचो : आकर्षक फुलांचा गुच्छ असलेले हे रोप वाढवणं अतिशय सोपं आहे. या रोपाचं पान घेऊन दुसऱ्या कुंडीतल्या मातीत रुजवावे, तसे केल्याने काही दिवसातच नवीन रोप तयार होते, तेही स्वस्तात!