Vastu Tips: तुमच्या वास्तूची भरभराट 'न' होण्यामागे 'या' गोष्टींचा तर अडथळा होत नाही ना? तपासून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 01:25 PM2024-05-29T13:25:48+5:302024-05-29T13:38:32+5:30

Vastu Shastra: आर्थिक भरभराट होण्याचे मार्ग अनेकदा घरातील आणि घराबाहेरील गोष्टीमुळे अडवले जातात. त्या गोष्टी दूर केल्या असता घरात संपन्नता येते. सुख, शांती आणि समाधान लाभते. अशा वेळी कोणत्या वस्तू ठेवाव्या आणि कोणत्या काढाव्या हे माहीत असणं गरजेचे आहे. त्यासाठी केवळ दसरा-दिवाळीला घराची झाडलोट करून उपयोग नाही, तर दर आठवड्याला नाहीतर पंधरवड्याला घरात हवे नको ते पाहिले पाहिजे.

घर-संसार म्हटल्यावर अनेक गोष्टींची जमवाजमव ओघाने आलीच. पण या वस्तू अडगळीत तर जात नाही ना, हे वरचेवर तपासून पाहणे ही आपली जबाबदारी आहे, अन्यथा घराचे घरपण हरवू शकते आणि दारिद्रय येऊ शकते. त्यासाठी पुढील वास्तू टिप्सचा वापर करा.

>> वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत. अडगळीचे सामान वेळच्या वेळी काढून टाकावे.

>> घरासमोर कचऱ्याचा डोंगर साठलेला असणे फारच अशुभ आहे. यामुळे कुटुंबाचा आर्थिक ऱ्हास होतो. आर्थिक स्थिती खालावते असे वास्तुशास्त्राच्या तज्ज्ञांचे मत आहे. कचऱ्यामुळे गंभीर आजार होण्याचाही धोका असतो. म्हणून पैसे खर्चून घरासमोरचा भाग स्वच्छ करून घ्यावा.

>> वास्तुशास्त्रानुसार घरासमोर काटेरी वनस्पती लावणे अशुभ असते. तसेच घराच्या भिंतीवर छतावर उगवलेला पिंपळ छाटून टाकला पाहिजे. घराजवळ पिंपळाच्या वृक्षाचे अस्तित्व अशुभ मानले जाते. त्यामुळे घरातील सदस्यांमधील मतभेद वाढतात.

>> वास्तुशास्त्रानुसार प्राण्यांचे कातडे, मुखवटे आणि हिंसक प्राण्यांची चित्रे घरात लावू नयेत. त्यामुळे घरात नकारात्मक लहरी येतात.

>> वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर-पूर्व भागात कचरा गोळा होऊ देऊ नका. तसेच जड यंत्र पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवू नका. कारण त्या दिशा सकारात्मक ऊर्जेचे स्रोत मानल्या जातात. तिथे या नकारात्मक वस्तू ठेवून सकारात्मक उर्जेला अडवू नका. त्या वस्तू घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात.

>> वास्तुशास्त्रानुसार घराच्या दिवाणखान्यात डोंगराचे चित्र किंवा निसर्ग चित्र लावावे. त्यामुळे घरात आल्याआल्या प्रथम दर्शनी ते चित्र पाहताच प्रसन्न वाटते.

>> घराच्या ईशान्य कोपर्‍यात मातीचे भांडे ठेवावे. किंवा मातीचा दिवा, शोभेची वस्तू, पाण्याचा माठ अशी कोणतीही मातीची वस्तू ठेवता येईल. मातीच्या वस्तूंच्या वापरामुळे घराची आर्थिक स्थिती सुधारते.