Vastu Tips: तुमच्याही दारावर गणेश प्रतिमा किंवा मूर्ति आहे का? 'हे' वास्तु नियम आधी वाचा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:30 PM 2024-07-09T12:30:07+5:30 2024-07-09T12:36:34+5:30
Vastu Shastra: घराच्या मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती, शुभ लाभ लिहिल्याने आणि स्वस्तिक काढल्याने शुभफळ प्राप्त होते. घराचा मुख्य दरवाजा महत्त्वाचा असतो. घरातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दरवाजातून आत येतात. सकारात्मक लहरींनी घरातील वातावरण आनंदित राहते, परंतु घरात नकारात्मक ऊर्जा आल्यामुळे कुटुंबातील लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात मानसिक आणि आर्थिक समस्या निर्माण होतात. गणपतीला मंगलमूर्ती असे आपण म्हणतो. त्याच्या नुसत्या दर्शनाने वातावरण मंगलमय होते. यासाठीच घराच्या प्रवेश द्वारावर गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा लावली जाते. यातही काही प्रकार असे आहेत, ज्यांचे अनुसरण केले असता अधिक लाभ होतो. ते प्रकार कोणते हे जाणून घेऊ.
गणपतीलादेखील शेंदूर प्रिय आहे. त्यामुळे गणपतीची शेंदूर चर्चित गणेश मूर्ती घराच्या प्रवेश द्वाराशी ठेवल्याने सकारात्मक लहरी अधिक वेगाने आकर्षित होतात आणि नकारात्मक लहरी दूर जातात.
तुमच्या घराच्या प्रवेश द्वारावर मूर्ती ठेवण्यास जागा नसेल तरी हरकत नाही. त्याला पर्याय म्हणून गणेशाची प्रतिमा चिकटवावी. गणेश दर्शन होणे महत्त्वाचे असते. मग ती मूर्ती असो नाहीतर प्रतिमा!
सिंहासनावर किंवा मुषकावर बसलेली मूर्ती घरात ठेवल्याने ऐश्वर्य, आरोग्य, सुख, समाधान घरात नांदते. ती पूजेची मूर्ती नसली तरी तिची स्वच्छता जरूर ठेवावी आणि शक्य झाल्यास रोज एक फुल अर्पण करावे.
गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमेप्रमाणे स्वस्तिक, ओम, श्री गणेश ही चिन्हेदेखील गणेशाचे अस्तित्व दर्शवतात. म्हणून गृह्प्रवेशाच्या वेळीसुद्धा दारावर स्वस्तिक रेखाटले जाते किंवा शुभ-लाभ, ओम, श्री गणेशाय नमः लिहून गृहप्रवेश केला जातो.