Vastu Tips For Business : व्यवसायात यश मिळवायचंय?; तर करा वास्तूचे 'हे' सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2022 04:14 PM2022-02-14T16:14:51+5:302022-02-14T16:30:44+5:30

घर, ऑफिस, दुकान इत्यादी वास्तूनुसार असल्यास चांगले आरोग्य, उत्पन्नात वाढ, यश आणि कामात प्रगती होते.

जीवनात यश मिळविण्यासाठी तुम्ही अनेक परिश्रम करता, परंतु अनेकदा काही कारणांमुळे तुम्ही यशापासून वंचित राहता. व्यक्तीचे जीवन आनंदी बनवण्यात वास्तुशास्त्राची फार महत्त्वाची भूमिका असते. घर, ऑफिस, व्यवसाय, दुकान इत्यादींसाठी वास्तूच्या नियमांबद्दल सांगण्यात आले आहे. घर, ऑफिस, दुकान इत्यादी वास्तूनुसार असल्यास चांगले आरोग्य, उत्पन्नात वाढ, यश आणि कामात प्रगती होते.

जेव्हा या ठिकाणी वास्तुदोष असतो तेव्हा त्याचा आरोग्य, उत्पन्न, व्यवसाय, नोकरी इत्यादींवरही विपरीत परिणाम होतो. जर तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल, यश येत नसेल तर तुम्ही काही वास्तू उपाय करून एकदा करून पाहू शकता. असे केल्याने यश मिळू शकते. आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी कोणते उपाय करता येतील याबद्दल जाणून घेऊया.

वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या कार्यालयात, दुकानात किंवा फॅक्टरीत पांढरा, क्रीम किंवा हलका रंग वापरू शकता. या रंगांमधून सकारात्मकता प्रवाहित होते, जे प्रगतीसाठी उपयुक्त मानले जाते.

उत्तर दिशा ही कुबेराची मानली जाते. त्यामुळे तुम्ही घर, ऑफिस, दुकान किंवा कारखान्यातील कॅश काउंटर किंवा तिजोरी उत्तर दिशेला ठेऊ शकता. यामुळे धनलाभाची शक्यता वाढते.

तुमच्या कार्यालयाचे आणि कार्यक्षेत्राचे दरवाजे आतल्या बाजूला उघडणारे असावेत. तसेच खिडक्या, दरवाजे, कपाटे इत्यादी सर्व वस्तू तुटलेल्या नसून परिपूर्ण स्थितीत असाव्यात. ते खराब असल्यास, त्यांची दुरुस्ती करा. ऑफिसमध्ये जिथे मीटिंग हॉल असेल तिथे आयताकृती टेबल वापरा. दुकानांमध्येही अशीच टेबल्स वापरता येतात.

व्यवसायातील प्रगतीसाठी तुम्ही तुमच्या टेबलावर श्री यंत्र, व्यापर वृद्धी यंत्र, क्रिस्टल टर्टल, क्रिस्टल बॉल इत्यादी ठेवू शकता. हे शुभ प्रतीक मानले जाते. ते प्रगतीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करते.

व्यवसायात प्रगतीसाठी कामाच्या ठिकाणी पांचजन्य शंख स्थापित करून त्याची नियमित पूजा करावी. तुम्हाला त्याचा फायदा होईल. शंखपूजनाने देवी लक्ष्मीही प्रसन्न होते असे म्हटले जाते.

कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या मालकाची खोली दक्षिण-पश्चिम दिशेला आणि बसताना उत्तरेकडे तोंड करून असल्यास उत्तम. तुम्ही जिथे बसता त्यामागे एक भक्कम भिंत असावी. काचेच्या भिंती किंवा खिडक्या नसाव्यात.

वास्तुशास्त्रानुसार कार्यालयाचा मुख्य दरवाजा उत्तर दिशेला असेल तर ते खूप चांगले असते. मुख्य दरवाजा वायव्य किंवा ईशान्य दिशेला असणेही चांगले मानले जाते. मुख्य गेटसमोर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि प्रगती होते. टीप: कोणतंही काम करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.