तुम्ही प्रियजनांना भेट म्हणून सोनं देताय? ‘हे’ नियम पाळा, नुकसान टाळा अन् लाभ मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 03:07 PM2022-06-24T15:07:43+5:302022-06-24T15:11:50+5:30

सोने भेट म्हणून देण्याचे अनेक लाभ आहेत, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्राला भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात अनेकविध विषयांचा तर्कावर अंदाज बांधला जातो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास करून भविष्याविषयी सांगता येऊ शकते, अशी मान्यता आहे. (Vastu Tips)

ज्योतिषशास्त्राच्या विविध शाखा आहेत. यामध्ये समुद्रशास्त्र, वास्तुशास्त्र, हस्तरेखाशास्त्र, अंकशास्त्र अशा अनेक शाखा ज्योतिषशास्त्रात आहे. यातील वास्तुशास्त्रात, वास्तुची दिशा, दशा आणि त्याच्याशी निगडीत अनेक गोष्टींबाबत यात विस्तृत आणि सखोल माहिती देण्यात आल्याचे सांगितले जाते.

सण-समारंभ, उत्सव, आनंदाचे क्षण, सुखकारक घटना अशा अनेकविध कार्यक्रमांवेळी आपण आपले प्रियजन, मित्रमंडळी, नातेवाइक, ओळखीचे लोक यांना भेटी देत असतो. काही भेटवस्तू देणे अतिशय शुभ मानले जाते. तर काही भेटवस्तू मिळणे अत्यंत चांगले मानले जाते.

आपल्याकडे सोन्याची प्रचंड क्रेझ ही अबालवृद्धांपर्यंत असलेली दिसते. महिलांना सोन्याचे दागिने मिरवायला अगदी आवडते. पण पुरुषांनाही त्याची चांगली आवड असल्याचे अनेक उदाहरणांवरून पाहायला मिळते. एखाद्या बाळाचा जन्म झाल्यापासून ते अगदी सहस्रचंद्र दर्शनाच्या सोहळ्यापर्यंत अनेकदा सोन्याच्या भेटवस्तू दिल्या जातात.

आपल्या जवळच्या किंवा खास व्यक्तीला भेट म्हणून सोने देणे ही फार पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे आणि दिवसेंदिवस हा ट्रेंड अधिकाधिक वाढत आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून काय द्यावे हे समाजात नाही तेव्हा आपण सोन्याच्या वस्तू भेट म्हणून देण्याचा विचार सर्रास करतो.

सोने भेट म्हणून देण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच काही तोटेही आहेत. चला जाणून घेऊया हे फायदे आणि तोटे. सोन्याचे दागिने भेट देण्याबाबत असे म्हटले जाते की, जर तुम्ही एखाद्याला पैसे दान केले तर त्याचे फळ तुम्हाला एकदाच मिळते.

सोने, जमीन, दान केल्याने माणसाला सात जन्म त्याचे फळ मिळते, अशी मान्यता आहे. त्यामुळे कोणाला काही दान करायचे असेल तर सोन्याचे दागिने द्यावेत, असे म्हटले जाते.

सोने दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनावर गुरु ग्रहाचा शुभ प्रभाव दिसून येतो. पण ज्योतिष शास्त्रानुसार सोन्याचे दान करायचे असेल तर ग्रहांची स्थिती चांगली असली पाहिजे. अन्यथा त्याचे सकरात्मक फळ मिळत नाही. नुकसान होऊ शकते, असे म्हटले जाते.

ज्योतिष शास्त्र सांगते की, जर तुमच्या कुंडलीत गुरु ग्रह शुभ फल देत नसेल तर व्यक्तीला धार्मिक पुस्तके, सोने, पिवळे कपडे, केशर इत्यादी भेटवस्तू दान करणे फायदेशीर आहे. मात्र, गुरु ग्रहाची स्थिती पाहून सोने दान करावे, असे सांगितले जाते. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.