Vastu Tips: 'या' चार रोपांमध्ये आहे सकारात्मकता आकर्षून घेण्याची ताकद; वास्तूसाठी अतिशय उपयोगी! By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 04:36 PM 2024-03-30T16:36:24+5:30 2024-03-30T16:38:22+5:30
Vastu Shastra: निसर्गात झाडं आणि घरात रोपं परिसर सुशोभित तर करतातच, शिवाय वातावरण शुद्ध करतात. निसर्गाचे संगोपन तर आपण करायलाच हवे. झाडे लावा, झाडे जगवा मोहिमेत आपण सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आणि वास्तूसाठी रोप निवडण्याची वेळ आली की बागेत पुढील चार रोपांचा आवर्जून समावेश करावा. जेणेकरून वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि समस्यां घरातून पळ काढतील. हिरवीगार झाडं, रंगीबेरंगी फुलं आपल्या तना-मनाला तजेला देतात. मनावरची मरगळ झटकून टाकतात. म्हणून घरात, विशेषतः आपला वावर जिथे जास्त असतो अशा ठिकाणी अर्थात हॉल, किचन, बेडरूममध्ये इनडुअर रोपं लावावीत असा सल्ला वास्तू तज्ज्ञ देतात. या रोपांना प्रखर प्रकाशाची गरज नसून घरात येणाऱ्या प्रकाशावर देखील त्यांची उत्तम वाढ होते. बघूया अशाच काही रोपांची माहिती.
तुळस : हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीचे रोप दारात, अंगणात किंवा खिडकीत ठेवल्यास वातावरणशुद्धी होते. तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावल्यास प्रचंड सकारात्मकता जाणवते. घरातील वातावरण सकारात्मक राहते. वास्तुशास्त्रात उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुळशी लावणे उत्तम मानले जाते.
मनी प्लांट : वास्तुशास्त्रात मनी प्लांटचे विशेष महत्त्व आहे. ही वनस्पती संपत्ती आणि समृद्धीशी संबंधित आहे. मनी प्लांट घराच्या आग्नेय दिशेला लावल्यास ते शुभ मानले जाते. घरातील वातावरणही चांगले राहते. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही हे रोप लावू शकता. असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
शमी : हिंदू धर्मात शमीच्या वनस्पतीचा संबंध शनिदेवाशी आहे. वास्तुशास्त्रातही ही वनस्पती अतिशय शुभ मानली जाते. वास्तूच्या दारात किंवा बिल्डिंगच्या पायथ्याशी हे रोप लावायचे असेल तर यासाठी दक्षिण दिशा अतिशय शुभ मानली जाते. दक्षिण ही शनी देवाची दिशा असल्याने लावलेले शमीचे झाड शुभ ठरते.
बांबू : बांबूचे झाड म्हटल्यावर राना-वनातील बांबूची झाडं आठवली असतील. परंतु वास्तुशास्त्रात असे मानले जाते की बांबूच्या रोपामुळे सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. घराच्या उत्तर दिशेलाहे झाडे ठेवणे शुभ मानले जाते.