Vastu Tips: ज्यांच्या दारी पडतो पारिजातकाचा सडा, लक्ष्मी माता वसे तिथे सदासर्वदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:22 AM2022-08-23T11:22:43+5:302022-08-23T11:28:31+5:30

Vastu Shastra : पांढऱ्या शुभ्र पाकळ्या आणि नाजूक केशरी देठ व सुगंधाची लयलूट करणारे झाड असते प्राजक्ताचे. त्यालाच संस्कृतमध्ये पारिजात असे म्हणतात. पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे. तेव्हापासून पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात, अशी ही म्हणच पडली.

पारिजात हे भारतात उगवणारे एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. याचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवणारा हा पारिजात "प्राजक्त" म्हणूनही ओळखला जातो. आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो.

>> ज्यांच्या घराच्या आजूबाजूला प्राजक्ताचे झाड असते, त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तु दोष दूर होतात.

>> जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो, तिथे लक्ष्मी वास करते. कारण ही फुले तिला अतिशय प्रिय आहेत. म्हणून लक्ष्मी पूजेच्या दिवशी स्वतःहून खाली पडलेली फुलेच देवीला अर्पण केली जातात.

>>प्राजक्ताच्या सुगंधात तुमच्या जीवनातून ताण काढून जीवन आनंदाने भरण्याची शक्ती आहे. त्याचा सुगंध तुमचे मन शांत करतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते आणि निरोगी तसेच दीर्घायुष्य प्राप्त होते.

>> प्राजक्ताची फुले फक्त रात्रीच फुलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात, तिथे शांतता आणि समृद्धी नेहमीच नांदते.

>> हृदयरोगासाठी प्राजक्त खूप फायदेशीर आहे. हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी ५-६ फुलांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय आहे, परंतु हा उपाय केवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करता येतो. त्याची फुले, पाने आणि साल औषध म्हणून वापरली जातात.