Vastu TIps: रात्री अपरात्री कुत्र्याच्या रडण्याचा आवाज कानावर पडणे अशुभ का मानले जाते? वाचा! By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:42 PM 2023-06-29T17:42:20+5:30 2023-06-29T17:51:49+5:30
Vastu Shastra: रात्रीच्या शांततेत माणसांच्या रडण्याचे आवाज आले तरी आपण पटकन कानोसा घेतो आणि कोणाकडे काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. मनुष्याच्या बाबतीत काही घडले तर ती वार्ता जाणून तरी घेता येते, मात्र मूक प्राण्यांचे क्रंदन गूढ वाटते. त्यांना होणाऱ्या यातना आपल्याला कळत नाहीत आणि त्यांचे रडणे थांबवताही येत नाही. त्यामुळे तो आवाज ऐकून आपली मनस्थिती ढळते आणि वाईट विचार मनात थैमान घालू लागतात. त्यामुळे कुत्री, मांजरी रडू लागली की आपण त्यांना हाकलून देतो. मात्र तो आवाज सातत्याने कानावर पडत राहिला तर कोणते दुष्परिणाम होतात याबद्दल वास्तुशास्त्र सांगते... मन मोकळे होण्यासाठी रडणे ही भावनिक गरज असते. मात्र सर्वकाही सुबत्ता असूनही काही लोक नाराजीचा सूर लावून रडतात किंवा काही घरात हिंसेमुळे महिला, मुले, नोकर, कधी कधी घरचा कर्ता पुरुषही कण्हत राहतो, अशा वेदनांमुळे घरात नकारात्मक वलय तयार होते आणि वास्तूचा ऱ्हास होतो. त्यामुळे भरल्या घरात रडू नये असे आपले पूर्वज आपल्याला सांगत असत.
मात्र जेव्हा प्राणी विशेषतः कुत्रे, मांजरी रडतात तेव्हा त्यांना काही वेदना होत आहेत का? किंवा त्यांच्या राहत्या जागी त्यांना काही त्रास होतोय का? आरोग्याच्या तक्रारी आहेत का हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. त्यानुसार उपाय योजना करता येते. त्यांच्यावर मायेने हात फिरवून त्यांना शांत करता येते. परंतु जेव्हा परिस्थिती हाताबाहेर असेल अर्थात त्यांचे कारण समजण्यासारखे नसेल तेव्हा त्यांना काही काळासाठी तिथून दूर ठेवणे योग्य ठरते. कारण त्यांचे रडणे अनेक प्रकारच्या अशुभ घटनांचे संकेत देते.
वास्तू शास्त्रानुसार रात्रीच्या वेळी कुत्र्याचे रडणे हे संकट येणार असल्याचे सूचित करते. तर काही जणांना अशुभ वार्ता कानावर पडण्याचाही धोका असतो.
असेही म्हटले जाते की कुत्र्यांना आगामी नैसर्गिक घटना आधीच जाणवू शकतात. भूमीची स्पंदनं त्यांना लवकर जाणवतात. भूकंप येण्याची सूचना त्यांना आधी कळते. ते एक तर जोरजोरात भुंकतात किंवा भीतीने रडायला लागतात. त्यामुळे रडणे अशुभ घटनेचा संकेत देणारी असली तरी काही वेळेस आवश्यकही असते.
काही समजुतींनुसार, कुत्री सर्वात जास्त रडतात जेव्हा त्यांच्या आजूबाजूला काही वाईट शक्ती असते. यामुळे लोक आपल्या आजूबाजूला कुत्रा रडताना दिसतात आणि त्याला पळवून लावतात.
असं म्हणतात की कुत्रे रडून आपल्या एकतेची ताकद दाखवतात. एक कुत्रा रडला तर दुसराही रडायला लागतो. ते सामूहिक रडणे आणखी वाईट, म्हणून हाकलून देण्याचा पर्याय योग्य!
महत्त्वाच्या कामाला जाताना कुत्रा रडताना दिसला तर ते अप्रिय घटनेचे लक्षण आहे. अशा स्थितीत थोडा वेळ थांबा आणि मग घराबाहेर पडा.
काही मान्यतेनुसार कुत्रा एखाद्या व्यक्तीच्या दारात सतत भुंकत असेल तर कुटुंबात धनहानी होण्याची चिन्हे आहेत.