वास्तुशास्त्र : घराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला चपलांचा ढीग यशाचा मार्ग अडवतो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 01:14 PM2022-03-02T13:14:25+5:302022-03-02T13:20:26+5:30

आपण आपल्या घरातला पसारा आवरतो, नीटनेटके ठेवतो. परंतु घराइतकेच महत्त्वाचे असते आपले अंगण किंवा शहरी भागाबद्दल बोलायचे तर उम्बरठ्याबाहेरील कॉरीडोर अर्थात सज्जा. अतिथी येण्याचे ते प्रवेश द्वार किंवा लक्ष्मीच्या स्वागताचा तो मार्ग दुर्लक्षित ठेवून कसा चालेल? यासाठीच पूर्वी रोज अंगण सारवून सडा रांगोळी केली जात असे. आता व्यस्त जीवनशैली मुळे तेवढे शक्य नसले तरी त्या परिसरात निदान चपलांचा ढीग नसावा याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला चपलांचा ढीग यशाचा मार्ग अडवत असतो.

वास्तविक असेही म्हटले जाते, की ज्यांच्या घराबाहेर चपलांचा ढीग तो खरा श्रीमंत! मात्र याचा शब्दशः अर्थ न घेता यामागे असलेला तर्क असा आहे, की चपलांचा ढीग म्हणजे घराशी जोडलेली माणसे ही खरी श्रीमंती! परंतु जशी श्रीमंती उधळून उपयोग नसतो तसा 'या' श्रीमंतीचा पसाराही प्रेक्षणीय ठरत नाही. म्हणून तो नेहमी आवरलेला असावा.

वास्तुशास्त्रानुसार घराबाहेर वापरण्याच्या चपला घरात आणू नये. त्या चपलांबरोबर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. म्हणून चपला नेहमी दाराबाहेर काढाव्यात. मात्र अनेक ठिकाणी चपला चोरीला जाण्याची भीती असते किंवा कुत्रे मांजरी रात्री चपला खेळता खेळता कुरतडून टाकतात. यादृष्टीने चपलांच्या कपाटात चपला ठेवणे अधिक योग्य ठरते.

वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात चपला विखुरलेल्या असतात, तिथे शनीदेवाची अवकृपा होते. कारण शनिदेव हे शिस्तप्रिय आहेत. तसेच त्यांची पूजा किंवा त्यांच्या नावे दान करताना चपलाही दान केल्या जातात. त्यामुळे चपलांचा पसारा शनिदेवाची वक्रदृष्टी ओढवून घेतात. म्हणून चपला एका कोपऱ्यात नीट मांडून ठेवाव्यात.

जुने शूज आणि चपला घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते. याशिवाय मानसिक आणि आर्थिक समस्या घरात आपले ठाणे मांडते. म्हणून वापरात असलेली पादत्राणे सुस्थितीत ठेवणे योग्य ठरते.

शूज आणि चपलांचा रॅक कधीही देवघराच्या भिंतीला किंवा स्वयंपाकघराला लागून ठेवू नये. तसेच शूज रॅक किंवा कपाट घराच्या पूर्व , उत्तर किंवा आग्नेय नाहीतर ईशान्य दिशेला बनवू नये. चपला रॅकसाठी उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम दिशा सर्वोत्तम मानली जाते.

घरात शूज आणि चप्पल विखुरलेली असेल तर घरातील सदस्यांमधील संबंध बिघडू लागतात. तसेच घरात वापरायच्या चपलादेखील विखुरलेल्या ठेवू नयेत. घराच्या कोपऱ्यात ठेवाव्यात परंतु झोपताना बेड खाली ठेवू नये. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.