२ बलशाली ग्रहांचा युती योग! सूर्य-शुक्राचा घातक प्रभाव, ‘हे’ ५ उपायच तारु शकतील; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:16 AM2022-11-19T11:16:27+5:302022-11-19T11:21:32+5:30

सूर्य आणि शुक्राचा अजब युती योग अनुकूल मानला जात नाही. यावर कोणते उपाय करावेत? नेमके काय करू नये? जाणून घ्या....

ज्योतिषशास्त्रानुसार, नोव्हेंबर महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. नोव्हेंबर महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बरेच बदल होत आहेत. शुक्र आणि सूर्य वृश्चिक राशीत बुधासोबत युतीत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि सूर्य हे दोन्ही अत्यंत प्रभावी ग्रह आहेत. परंतु दोन्ही एकाच राशीत असणे चांगले मानले जात नाही. (venus and sun conjunction in scorpio november 2022)

बलशाली ग्रह असूनही सूर्य आणि शुक्राची युती अनुकूल मानली जात नाही. याचे कारण सूर्याच्या जवळ कोणताही ग्रह अंशात आला तर तो अस्तंगत होऊन शुभ प्रभाव गमावतो. वृश्चिक राशीतही अशीच काहीशी स्थिती असल्याचे सांगितले जाते आहे. (surya shukra yuti yoga november 2022)

वृश्चिक राशीत सूर्याच्या आगमनाने शुक्राचा शुभ प्रभाव नगण्य होऊ शकतो. त्याचा परिणाम देश आणि जगासह तुमच्या जीवनावर दिसून येईल. वृश्चिक राशीत सूर्य-शुक्राच्या अजब संयोगाचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल आणि कोणत्या उपायांनी तुम्ही त्याचा प्रतिकूल परिणाम दूर करू शकता, ते जाणून घेऊया...

शुक्र ग्रहाने ११ नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला. त्यानंतर १३ नोव्हेंबरला बुधाचे या राशीत आगमन झाले. तर १६ नोव्हेंबर रोजी नवग्रहांचा राजा सूर्य वृश्चिक राशीत विराजमान झाला. सूर्य आणि शुक्र यांची युती होते तेव्हा त्याला युति योग म्हटले जाते.

या योगाच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या व्यक्तींवर वैवाहिक, आर्थिक आणि सामाजिक जीवनावर सर्वाधिक प्रभाव पडतो. यासोबतच शुक्राशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते. सूर्य आणि शुक्र ग्रह एकत्र असतात तेव्हा ते शुभ परिणाम देऊ शकत नाहीत. याच्या प्रभावामुळे माणसाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

या युती योगाच्या संयोगामुळे व्यक्तीला वैवाहिक जीवनात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या सभोवतालची सर्व नाती मजबूत ठेवण्यासाठी त्याला कठोर परिश्रम करावे लागतात. यासोबतच व्यक्तीची परस्पर समजही कमी होते, त्यामुळे त्याच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

युती योगादरम्यान व्यक्तीत अहंकाराची भावनाही वाढू शकते. त्यामुळे जीवनाच्या विविध क्षेत्रात चढ-उतारांना सामोरे जावे लागते. या काळात लोकांना कुठेही गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, यावर ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत. ज्यामुळे या युती योगाचा प्रतिकूल प्रभाव कमी करता येऊ शकतो, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य आणि शुक्राचा संयोग असेल तेव्हा दररोज देवी दुर्गेची पूजा करणे उपयुक्त ठरू शकते. तसेच दुर्गा चालिसा पठण वा श्रवण करावी. देवी दुर्गेची नियमित पूजा केल्याने ग्रह-नक्षत्र अनुकूल राहतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. देवी दुर्गेच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

शारीरिक सुख, संपत्ती, सौंदर्य इत्यादींचा कारक शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी गोमातेला अन्नदान करावे. असे केल्याने कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होऊ शकेल आणि जीवनात समृद्धी येऊ शकेल.

ग्रहांच्या शुभ प्रभावासाठी सोन्याचे दागिने घालणे चांगले मानले जाते. याशिवाय तुम्ही चांदीची अंगठीही घालू शकता, असे सांगितले जाते.

युती योगाच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्त होण्यासाठी, आपल्या वडिलांचा आदर करा आणि त्यांच्याशी नाते दृढ करण्याचा प्रयत्न करा. तसेच त्यांच्या निर्णयाचे पालन करा. यासोबतच हेही लक्षात ठेवा की महिलांचा आदर करणे अत्यंत आवश्यक आहे, तुमच्या आजूबाजूच्या कोणत्याही महिलेला कोणत्याही प्रकारचे दुःख देऊ नका.

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि सूर्यनमस्कार करा, असे केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होईल आणि ग्रहांनाही शुभ परिणाम मिळतील. यासोबतच दूध आणि नारळाचे दान जरूर करा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.