शुक्राचा कर्क प्रवेश: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींची कमाईत वाढ; धनलाभाचे योग, महिनाभर फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 07:26 AM2022-08-06T07:26:44+5:302022-08-06T07:30:44+5:30

शुक्रचा कर्क राशीतील प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, महिनाभर याचा लाभ काही राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याप्रमाणे ऑगस्ट महिनाही महत्त्वाचा मानला गेला आहे. मराठी वर्षातील महत्त्वाचा कालावधी म्हणजे चातुर्मास. आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे. तर, सण-उत्सव आणि व्रत-वैकल्यांचा राजा मानला गेलेला श्रावण सुरू झाला आहे. श्रावणात प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. श्रावणात नागपंचमीपासून ते पोळापर्यंत अनेकविध प्रकारचे सण-उत्सव साजरे केले जातात. (venus transit in cancer 2022)

ज्योतिषशास्त्रानुसार, या संपूर्ण महिन्यात गुरु आणि शनी आपापल्या राशींमध्ये वक्री आहेत. महिन्याच्या सुरुवातीला बुध ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केलेला असेल. यासोबतच ऑगस्टमध्ये सूर्य, शुक्र, मंगळ आणि बुधसह अनेक ग्रह राशीपरिवर्तन करतील. ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी बुधने सिंह राशीत प्रवेश केला आहे. १० ऑगस्ट मंगळ आपले स्वामित्व असलेल्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करेल. (shukra in kark rashi 2022)

नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १७ ऑगस्ट रोजी आपलेच स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर, २१ ऑगस्ट रोजी बुध राशीपरिवर्तन करुन कन्या राशीत प्रवेश करेल. ऑगस्ट महिन्यातील आणखी एक महत्त्वाचे राशीपरिवर्तन हे शुक्र ग्रहाचे ठरणार आहे. रविवार, ०७ ऑगस्ट रोजी शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून, महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्टला शुक्र कर्क राशीतून सिंह राशीत विराजमान होईल.

शुक्र भौतिक सुविधा, प्रेम आणि सौंदर्याचा कारक मानला गेला आहे. शुक्राचे कर्क राशीत होत असलेले परिवर्तन अनेक लोकांच्या जीवनात शुभ परिणाम आणू शकेल. कर्क राशीत शुक्राच्या आगमनामुळे काही राशींना लवकरच पैसा आणि प्रेम जीवनाशी संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचे कर्क राशीतील गोचर लाभदायक ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कर्क राशीतील प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. ज्यांना वाहन खरेदी करायचे होते, त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. यासोबतच तुमच्या आईसोबतच्या नात्यात सुधारणा होईल आणि तुम्हाला तिच्याकडून आर्थिक लाभही मिळू शकेल. आईची तब्येत बिघडली असेल तर तिच्यातही सुधारणा दिसून येते. या राशीच्या काही लोकांना गळ्याशी संबंधित काही आरोग्य समस्या असू शकतात, म्हणून स्वतःची काळजी घ्या.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कर्क राशीतील प्रवेश सुखकारक ठरू शकेल. कुटुंबात कोणतेही शुभ कार्य या काळात पूर्ण होऊ शकते. यासोबतच तुम्ही तुमच्या बोलण्यात गोडवा आणावा. सामाजिक स्तरावर तुमची कीर्ती वाढू शकते. शुक्राचे गोचरामुळे फायदा व्यावसायिकांना मिळू शकतो. या काळात वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्याचे कामही काही लोक करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना शुक्राच्या संक्रमणादरम्यान स्वादिष्ट अन्न खाण्याच्या अनेक संधी मिळू शकतात.

कर्क राशीच्या व्यक्तींना याच राशीत होत असलेला शुक्र प्रवेश यशकारक ठरू शकेल. ज्या व्यक्ती मीडियाशी निगडीत आहेत किंवा चित्रपटसृष्टीत काम करतात, त्यांच्या कामाचे कौतुक केले जाऊ शकते. या काळात तुम्ही तुमची कलात्मक क्षमता विकसित करू शकता. जरी तुम्ही यावेळी भौतिक गोष्टींवर खूप खर्च करू शकता, परंतु यामुळे बजेट थोडे बिघडू शकते. सामाजिक स्तरावर तुमची नम्रता लोकांना आवडेल आणि या काळात तुमच्या मित्रांची संख्याही वाढू शकते.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कर्क राशीतील प्रवेश लाभदायक ठरू शकेल. या काळात तुमची धार्मिक आणि अध्यात्माच्या क्षेत्रात रुची वाढेल आणि तुम्हाला त्याचा लाभही मिळू शकेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य लाभेल आणि त्यांच्या मदतीने शैक्षणिक जीवनातील अनेक समस्यांवर मात करता येईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या भाऊ किंवा बहिणीकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. या काळात काही लोकांच्या मनात वैराग्याची भावनाही जागृत होऊ शकते.

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कर्क राशीतील प्रवेश अनुकूल ठरू शकेल. विवाहेच्छुक मंडळींना या कालावधीत विवाहासाठी चांगली स्थळे येऊ शकतात. कदाचित विवाहासंदर्भात बोलणी निश्चित होऊन तारीखही ठरू शकते. या काळात भागीदारी व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप कौतुक केले जाऊ शकते. शुक्रचा कर्क राशीतील प्रवेश आपल्यासाठी कसा ठरू शकेल, याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला अधिक उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.