शुक्राचा मीन प्रवेश: ‘या’ ६ राशींना सर्वोत्तम काळ, ६ राशींना संमिश्र परिणाम; काय उपाय करावे?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 01:01 PM2023-02-15T13:01:01+5:302023-02-15T13:01:01+5:30

शुक्राचा गुरुच्या राशीत होत असलेला प्रवेश तुमच्यासाठी कसा ठरू शकेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव दिसू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारीचा महिना विशेष ठरत आहे. नवग्रहांचा राजकुमार बुध, नवग्रहांचा राजा सूर्य यांच्यानंतर आता शुक्र ग्रहाचे राशीपरिवर्तन होत आहे. शुक्र आपल्या उच्च राशीत प्रवेश करत असून, नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहासोबत शुक्र सुमारे महिनाभर युतीत असेल. (venus transit in pisces february 2023)

१५ फेब्रुवारी रोजी शुक्र शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीतून गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करत आहे. मीन ही शनीची उच्च राशी मानली जाते. मीन राशीत या राशीचा स्वामी असलेला गुरु आधीपासूनच विराजमान आहे. १२ मार्चपर्यंत शुक्र या राशीत विराजमान असेल आणि गुरुसोबत युतीत असेल. (shukra gochar meen rashi 2023)

शुक्र हा रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला जातो. शुक्राचा मीन राशीतील प्रवेश काही राशींना संमिश्र ठरणारा आहे, तर काही राशींना हा कालावधी चांगला ठरू शकेल. तुमच्या राशीवर कसा असेल परिणाम? जाणून घ्या...

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. प्रवासादरम्यान थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. उधळपट्टीवरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सुखसोयी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा खर्च होऊ शकेल. विरोधकांवर विजय मिळवाल. करिअरच्या क्षेत्रात लाभ मिळू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावावा.

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश उत्तम ठरू शकेल. उत्पन्न वाढू शकेल. मनोकामना पूर्ण होऊ शकतील. पूर्वी अडथळे आलेली कामे आता हळूहळू पूर्ण होऊ शकतील. आर्थिक लाभ मिळतील. नवीन वाहन खरेदीची योजना आखू शकाल. प्रेम प्रकरणांसाठी हा काळ प्रगतीकारक असेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार शुक्राचे रत्न धारण करणे उपयुक्त ठरू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतील. कोणत्याही प्रकारच्या गटबाजीपासून दूर राहा. कामात लक्ष दिले तरच ते चांगले होईल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आनंद असेल. कौटुंबिक जीवनात समाधान लाभेल. घराच्या सजावटीवर खर्च होईल. प्रेमसंबंधात चढ-उतार येतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडू शकता. गोमातेला अन्नदान करणे लाभदायक ठरू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. अडचणी कमी होतील. अनपेक्षित पैसे मिळू शकतील. पैशांअभावी एखादे काम दीर्घकाळ रखडले असेल तर ते आता पूर्ण होईल. अनपेक्षित यश मिळेल. नशिबाची साथ मिळू शकेल. उत्साह वाढेल. नोकरी बदलण्यातही यश मिळू शकते, मोठी संधी मिळू शकते. सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण करावे.

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश लाभदायक ठरू शकेल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकेल. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. सखोल संशोधनाच्या कामात यशस्वी होऊ शकाल. कामाच्या ठिकाणी काही चढ-उतार होऊ शकतात, परंतु कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. जोडीदाराशी जवळीक वाढेल. काही अडचण येत असेल तर तीही दूर होऊ शकेल. जोडीदाराच्या नावाने कोणताही व्यवसाय करत असाल किंवा त्यांच्यासोबत मिळून कोणतेही काम करत असाल तर या काळात तुम्हाला त्या कामात यश मिळेल. तब्येत सुधारेल. शुक्रवारी श्रीसुक्ताचे पठण करावे.

तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. विरोधकांवर विजय मिळव शकाल. खर्चातही वाढ होईल. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागेल. नोकरीत परिस्थिती अनुकूल राहील. व्यवसायाबाबत तुम्ही थोडे चिंतेत दिसाल, परंतु काळजी करण्याची गरज नाही. परदेश प्रवासाची शक्यता आहे. व्यवसायात भांडवल गुंतवण्याची संधी मिळेल. महालक्ष्मीला आवडती फुले अर्पण करणे लाभदायक ठरू शकेल.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश चांगला ठरू शकेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. शिक्षणासाठी परदेशातही जाऊ शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या मेहनतीचे सार्थक होईल. जीवनसाथीसोबत प्रेमही वाढेल. हा काळ तुम्हाला आनंदाने भरून जाईल. शुक्रवारी देवीला तांदळाच्या खीरीचा नेवैद्य दाखवावा.

धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश यशकारक ठरू शकेल. सुखसोयी आणि कीर्ती वाढेल. नवीन वाहने खरेदी करू शकाल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार पूर्ण होऊ शकतील. घरात आनंदाचे वातावरण असेल. आईच्या आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवन आणि व्यवसायिक जीवनातील संतुलन योग्य ठेवावे. शुक्रवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन चंदन अर्पण करावे.

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश अनुकूल ठरू शकेल. मित्रांसोबत वेळ घालवला जाईल. आनंददायी घटनांचा अनुभव घेऊ शकाल. खूप खर्च होईल. कमी अंतराचे प्रवास अधिक होतील. आनंद मिळेल. नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी जाण्याची योजना आखू शकता. व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील आणि व्यवसायात प्रगती होईल. भावंडांची प्रगती होईल.

कुंभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा मीन प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. चांगले, सुंदर, चविष्ट आणि मनाला आनंद देणारे पदार्थ खाण्याची संधी मिळेल. पार्ट्या आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळेल. नवीन लोक भेटतील. कौटुंबिक जीवनात सुख-सुविधा वाढतील. परस्पर सामंजस्य टिकेल. मात्र, आरोग्याच्या समस्या वाढू शकतात.

मीन राशीत होत असलेले शुक्राचा प्रवेश या राशीच्या व्यक्तींना अनुकूल ठरू शकेल. स्वभावात आणि व्यक्तिमत्त्वात बदल जाणवेल. बोलण्यातील गोडवा वाढू शकेल. बोलण्याच्या प्रभावाने लोक आकर्षित होतील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. यश मिळेल. शुक्रवारी महालक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.