शुक्रचा कन्या प्रवेश: ‘या’ ५ राशींना शुभ-लाभदायक; कमाई वाढणार, नवरात्रातच दिवाळी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 03:08 PM2022-09-15T15:08:34+5:302022-09-15T15:13:40+5:30

शुक्राचे राशीपरिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिना महत्त्वाचा मानला गेला असून, नवग्रहांपैकी काही ग्रहांचे राशीपरिवर्तन होत आहे. प्रत्येक ग्रह नियमित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात शुक्र ग्रह सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीतून बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. (venus transit in virgo 2022)

नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या दोन दिवस आधी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. २४ सप्टेंबर रोजी शुक्र कन्या राशीत विराजमान होईल. आताच्या घडीला बुध कन्या राशीत वक्री असून, शुक्र प्रवेशाच्या आधी १७ सप्टेंबर रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कन्या राशीत विराजमान होणार आहे. (shukra in kanya rashi 2022)

शुक्र हा सौंदर्य, प्रेम प्रकरण, पैसा आणि भौतिक सुविधांशी संबंधित ग्रह मानला जातो. शुक्राच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे यावेळी काही राशींना विशेष लाभ होणार आहे. त्यांच्यासाठी करिअर आणि पैशाच्या दृष्टीने शुभ योग बनत आहेत. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचे गोचर उत्तम ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कन्या प्रवेश नवीन संधींचा ठरू शकेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि तुमच्या कमाईत वाढ होण्याचे संकेत आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमची सर्जनशीलता वाढेल. तुम्ही पैसे वाचवू शकाल. विद्यार्थ्यांना शिक्षणातही अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. सरकारी नोकरीशी संबंधित कोणत्याही परीक्षेत यश मिळेल. त्याचबरोबर व्यावसायिकांनाही लाभाच्या संधी मिळतील.

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. या काळात, विविध स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल आणि आपण व्यवसायात नफा मिळू शकेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्ही तणावमुक्त व्हाल आणि तुमचे आरोग्यही चांगले राहील. तुम्ही तुमच्या सुखसोयी, कपडे आणि दागिन्यांवर खर्च करू शकता. बजेटपेक्षा खर्च जास्त होणार नाही, याकडे विशेष लक्ष देणे, उपयुक्त ठरू शकेल.

कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्राचा प्रवेश लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. गुंतवणुकीसाठी आगामी काळ अनुकूल ठरू शकेल. आर्थिक समस्यांपासून मुक्त होऊ शकाल. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील. व्यावसायिकांसाठी उत्तम कालावधी असून, उत्पन्न वाढू शकेल. करिअरच्या चांगल्या संधी मिळतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कन्या प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. तुम्ही कठोर परिश्रम करून पैसे कमवाल. तुमचे सर्व प्रयत्न यशस्वी होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल आणि सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रेमप्रकरणातही यश मिळू शकेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असू शकेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळेल. समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा लाभेल.

मकर राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कन्या प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. लोकांशी तुमचे सौहार्दपूर्ण संबंध असतील. या काळात तुम्हाला पैसे कमविण्याच्या अनेक चांगल्या संधी मिळतील. सणाच्या काळात तुम्ही कपडे आणि दागिने खरेदी कराल आणि तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकेल. करिअरच्या दृष्टीनेही हा काळ फायदेशीर ठरू शकेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांनाही यावेळी त्यांच्या इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. तुमच्या कामामुळे सर्वजण प्रभावित होऊ शकतील.

सूर्याने कन्या राशीत प्रवेश केल्यावर बुधशी युती होऊन बुधादित्य नामक शुभ योग जुळून येऊ शकेल. तसेच शुक्राचा कन्या राशीत प्रवेश झाल्यानंतर शुक्र, बुध आणि सूर्याचा त्रिग्रही योगही जुळून येऊ शकेल. हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.