Vrat And Festivals May 2022: अक्षय्य तृतीया, बुद्धपौर्णिमा ते शनैश्चर जयंती; ‘हे’ आहेत मे महिन्यातील प्रमुख सण-उत्सव, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:11 PM 2022-04-27T14:11:19+5:30 2022-04-27T14:17:53+5:30
Vrat And Festivals May 2022: एप्रिलप्रमाणे मे महिन्यातही सण-उत्सवांची रेलचेल आहे. नेमके कोणते सण-उत्सव या महिन्यात साजरे केले जाणार आहेत? पाहा, डिटेल्स... मराठी वर्षाच्या प्रत्येक महिन्यात सण-उत्सवांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळते. नैसर्गिक, वैज्ञानिक, शास्त्रीय आणि धार्मिकदृष्ट्या आपल्याकडील सण-उत्सवांना विशेष महत्त्व असल्याचे दिसते. (Vrat Festival In May 2022)
मराठी शुभकृतनाम संवत्सर सुरू झाले आहे. चैत्र महिना लोटून मे महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच १ मे रोजी वैशाख महिना सुरू होईल. वैशाख महिन्यात अनेकविध सण-उत्सव साजरे केले जातात. ज्योतिषीय दृष्ट्याही मे महिना महत्त्वाचा मानला गेला आहे. (Marathi San Utsav In May 2022)
मराठी नववर्षातील बारा महिने आणि सहा ऋतू हे निसर्गचक्राप्रमाणे चालताना आपल्याला दिसतात. किंबहुना निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया मे महिन्यात येणाऱ्या मुख्य सण-उत्सवांविषयी...
१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी मोठी चळवळ, आंदोलन करण्यात आले. आचार्य अत्र्यांसह अनेक दिग्गज मंडळींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि अखेर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. हा दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी कामगार दिवसही साजरा केला जातो. (Maharashtra Din 2022)
मंगळवार, ३ मे २०२२ रोजी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणाऱ्या अक्षय्य तृतीतयेला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी श्रीविष्णूंचा सहावा अवतार मानल्या जाणाऱ्या परशुरामांची जयंती आहे. याशिवाय नर-नारायण आणि हयग्रीव आदी अवतार याच दिवशी घेण्यात आल्याची नोंद पुराणात सापडते. याच दिवशी महात्मा बसवेश्वर जयंती आहे. तसेच रमजान ईद देखील याच दिवशी साजरी केली जाईल. (Akshaya Tritiya May 2022)
शुक्रवार, ६ मे रोजी वैशाख शुद्ध पंचमीला आद्य शंकराचार्यांची जयंती आहे. वयाच्या दुसऱ्या वर्षी वेद, उपनिषदाचे ज्ञान घेत अवघ्या ७ व्या वर्षी संन्यास घेतला, असे आद्य शंकराचार्यांच्या बाबतीत सांगितले जाते. आद्य शंकराचार्यांनी अनेक नव्या गोष्टींचा प्रारंभ केला. ते आजतागायत सुरू असलेले पाहायला मिळतात. (Adi Shankaracharya Jayanti May 2022)
रविवार, ८ मे २०२२ रोजी म्हणजेच वैशाख शुक्ल सप्तमीला गंगा सप्तमी आहे. या दिवशी गंगा नदीची उत्पत्ती झाल्याची मान्यता आहे. या दिवशी विशेष गंगा पूजन केले जाते. गंगा जयंतीच्या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान केल्यास सात्त्विकता आणि योग्यता प्राप्त होते. गंगा सप्तमी संपूर्ण देशभर श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जाते. गंगा जन्माची कहाणी स्कंदपुराण, वाल्मिकी रामायण इत्यादी ग्रंथांत वर्णन केलेली आहे. (Ganga Saptami Jayanti May 2022)
मंगळवार, १० मे २०२२ रोजी सीता नवमी आहे. शास्त्र, पुराणांनुसार, वैशाख शुद्ध नवमीला राजा जनकाच्या नगरीत सीता प्रकट झाली होती. पुष्य नक्षत्रावर सीता देवी प्रकट झाली होती. या दिवशी देशभरात व्रताचरण केले जाते. यामुळे सीतेचे पावित्र्य आणि पतिव्रता होण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले जाते. (Sita Navami May 2022)
गुरुवार, १४ मे २०२२ रोजी वैशाख शुद्ध एकादशी आहे. या एकादशीला मोहिनी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी श्रीविष्णूंची उपासना केली जाते. त्रेतायुगात एकदा गुरु वशिष्ठ यांच्या सांगण्यावरून श्रीराम यांनी हे व्रत केले होते. तर द्वापार युगात श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिरानेही मोहिनी एकादशीचे व्रत केले होते, असे सांगितले जाते. (Mohini Ekadashi 2022)
शनिवार, १४ मे २०२२ रोजी वैशाख शुद्ध चतुर्दशी आहे. या दिवशी श्रीविष्णूंनी भक्त प्रल्हादासाठी नृसिंह अवतार धारण केला होता. म्हणूनच ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी करण्यात येते. राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपू याचा वध करण्यासाठी विष्णू नृसिंह अवतारात प्रकट झाले. नृसिंह जयंतीला केलेल्या व्रतामुळे सारी दुःखे दूर होतात, अशी मान्यता आहे. (Nrusinh Jayanti May 2022)
रविवार १५ मे २०२२ रोजी कुर्म जयंती साजरी केली जाईल. कुर्म जयंती वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो, देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागरात समुद्रमंथन केले. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. श्रीविष्णूनी कूर्मावतार घेतला, अशी अख्यायिका आहे. या दिवशी श्रीगणेशाच्या तीन मुख्य अवतारांपैकी एक असलेल्या पुष्टिपती विनायाकाची जयंती आहे. (Kurma Jayanti May 2022)
सोमवार, १६ मे २०२२ रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. म्हणूनच ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने साजरी केली जाते. बौद्ध धर्मीय ही तिथी मोठ्या उत्साहात साजरी करतात. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संत दामाजी पुण्यतिथी (मंगळवेढा) असून, याच दिवशी वैशाख स्नान समाप्ती होत आहे. (Buddha Purnima May 2022)
गुरुवार, १९ मे २०२२ रोजी संकष्ट चतुर्थी आहे. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करून गणपतीचे नामस्मरण करतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला महत्त्व असते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने त्या त्या वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो आणि गणेश भक्त दिवसभराचा उपवास सोडतात. (Sankashti Chaturthi May 2022)
गुरुवार, २६ मे २०२२ रोजी वैशाख वद्य एकादशी आहे. ही तिथी अपरा एकादशी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी विष्णूंची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या व्रतामुळे वर्षभर योग्य मार्गदर्शन मिळते, पुण्य मिळते, असे सांगितले जाते. (Apara Ekadashi May 2022)
सोमवार, ३० मे २०२२ रोजी वैशाख अमावास्या आहे. यादिवशी शनैश्चर जयंती साजरी केली जाते. यावेळी अमावस्या सोमवारी आल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या किंवा दर्श अमावास्या किंवा भावुका अमावस्या असेही संबोधले जाते. (Shani Jayanti May 2022)