ध्येयपूर्ती करायची आहे? मग तुम्हाला गरज आहे एका भिंगाची! - गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 05:51 PM2021-08-26T17:51:47+5:302021-08-26T18:00:06+5:30

बालपणी आपल्यातल्या प्रत्येकाने भिंगातून सूर्यकिरणे एकवटून कागद जाळण्याचा प्रयोग यशस्वीपणे केला आहे. तोच प्रयोग आपल्याला आता पुन्हा करायचा आहे. फक्त आता आपल्याला कागद जाळायचा नाही तर ऊर्जा एकवटून योग्य ठिकाणी वापरायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा लहान होऊन तो संयम अंगात बाळगावा लागेल. तरच आपल्या इच्छाशक्तीची किरणे एकवटून आपल्या ध्येयावर केंद्रित होतील आणि आपला प्रयोग यशस्वी होईल.

सौर ऊर्जा, सौर प्लांट ही ऊर्जेची आधुनिक रूपे आपल्याला ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचे उदाहरण देतात. यासाठी केवळ सूर्य हे माध्यम असून चालत नाही. तर ती एकवटण्यासाठी अन्य माध्यमाचा खुबीने वापर करता आला पाहिजे. याचाच अर्थ इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून ऊर्जेचा अतिरिक्त वापर टाळला पाहिजे.

फोटो काढताना आपण कॅमेरा अँगल सेट करण्याआधी लेन्स पहा. ती धुरकट दिसते. मग आपण सोयीनुसार लेन्स ऍडजस्ट करतो आणि लेन्स स्थिर करतो. फोटो चांगला येण्याच्या दृष्टीने कोणता अँगल चांगला ठरेल हे ठरवून मग पटापट फोटो काढतो. आपल्या करिअर किंवा ध्येयाच्या बाबतीतही आपल्याला आपली लेन्स अर्थात दिशा निश्चित करून कोणत्या दिशेने गेल्यावर यश मिळेल याचा मागोवा घेऊन पुढे जायचे आहे.

भविष्य कोणालाही दिसत नसल्यामुळे ते चित्र नेहमी अस्पष्ट वाटत राहते. परंतु त्या धूसर चित्रात हरवून जाऊ या भीतीने पुढे जायचे थांबू नका. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा. तो निर्णय योग्य ठरवणे हे तुमच्या हाती आहे, त्यासाठी पुरेपूर मेहनत करा. चित्र आपोआप दिसू लागेल आणि तेव्हा भिंगाची गरजही उरणार नाही!