साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चांगला काळ, परदेशी जायची संधी; व्यापारात नफा, पद-पैसा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 09:32 AM2023-12-03T09:32:15+5:302023-12-03T09:44:55+5:30

Weekly Horoscope: ०३ डिसेंबर २०२३ ते ०९ डिसेंबर २०२३ चा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी गुरु, हर्षल मेषेत, केतु कन्येत, शुक्र तुळेत, रवी आणि मंगळ वृश्चिकेत, बुध धनूत, प्लुटो मकरेत, शनी कुंभेत, तर राहु, नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह, कन्या आणि तूळ राशीतून राहील. मंगळवारी कालभैरव जयंती आहे. शुक्रवारी उत्पत्ती एकादशी (स्मार्त) तर शनिवारी भागवत एकादशी आहे. रविवार, ३ डिसेंबर २०२३ रोजी कार्तिक कृष्ण षष्ठी आहे. रात्री ९:३६ पर्यंत आश्लेषा, तर त्यानंतर मघा नक्षत्र राहील.

डिसेंबर सुरू झाला असून, या महिन्याचा पहिला आठवडा कोणत्या राशींना उत्तम लाभदायक आणि यश-प्रगतीकारक ठरू शकेल? जीवनातील विविध क्षेत्रांवर ग्रहस्थितीचा प्रभाव कसा असू शकेल? जाणून घ्या...

मेष: हा आठवडा मानसिक शांतता देणारा आहे. विवाहित व्यक्ती रोमँटिक होऊन आपले दांपत्य जीवन सुखद करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येईल. तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे कटुता निर्माण होऊ शकते. मन घरगुती कामात रमून आपले काम लक्षपूर्वक कराल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात मजबुती दिसून येईल. हातून एखादी चूक होणार नाही ह्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. अन्यथा अडचणीत याल. व्यापारात छान प्रगती होईल. एखाद्या स्त्री मित्राच्या सहकार्याने व्यापारात लाभ होईल. मनात धार्मिक विचार येतील. एखाद्या कामात इतरांना सल्ला द्याल. प्राप्तीत वृद्धी होईल. विरोधकांपासून सतर्क राहावे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळा संभवतो. एकाग्रता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे.

वृषभ: डिसेंबर महिन्यातील हा पहिला आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात काहीसे त्रासलेले दिसतील. चिडचिड व राग वाढल्याने दांपत्य जीवनात तणाव येऊ शकतो. व्यापारातील चढ-उतार संपुष्टात येऊन त्यांना शासनाकडून एखादा मोठा लाभ होईल. शासन-प्रशासन सहकार्याने व्यापारात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. एखादे सरकारी काम मिळू शकते. प्राप्ती व प्रतिष्ठा वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. कष्टाने स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. मनात धार्मिक विचार येतील. लोकांचे कल्याण कराल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. खूपच लक्षपूर्वक परिश्रम करून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ऋतुजन्य विकार संभवतात.

मिथुन: हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक समस्या कमी होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती अवघड परिस्थितीस सहजपणे हाताळण्याचा प्रयत्न करतील. हे कौशल्य त्यांना त्यांच्या अनुभवाने व बुद्धिमत्तेने प्राप्त झालेले असेल. वरिष्ठ त्यांच्यावर खुश झाल्याचे दिसून येईल. व्यापारासाठी हा आठवडा पूर्णतः अनुकूल आहे. काही खर्च झाले तरी ते स्थिती मजबूतच करतील. विद्यार्थ्यांना परिश्रमानुसार चांगले परिणाम मिळतील. स्पर्धेत यश संभवते.

कर्क: हा आठवडा चांगला आहे. जोडीदारास मनातील सर्व विचार सांगतील. प्रेमिकेशी वाद संभवतो. तेव्हा सावध राहावे. सृजनशीलतेने कामे अधिक उत्तम करू शकाल. मन लावून काम कराल व त्याचे चांगले परिणाम मिळतील. प्राप्तीत वाढ होईल. बाजारात प्रतिष्ठा उंचावण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. लोक सल्ला घेण्यासाठी येऊन कौतुक करतील. प्राप्तीत वाढ झाल्याने खोळंबलेली कामे पूर्ण करू शकाल. प्रयत्नांचा वेग कमी होणार नाही. घरात सुख-शांती नांदेल. एखादी नवीन वस्तू घरात आल्याने आनंद पसरेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. मॅनेजमेंट व तांत्रिक विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतील. मसालेदार पदार्थांचे सेवन कमी करावे.

सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. संवाद कौशल्यात सुधारणा केल्याने प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. वैवाहिक जीवनासाठी आठवडा चांगला आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास आठवडा अधिक चांगला जाईल, अन्यथा तणाव निर्माण होईल. प्राप्ती सामान्यच राहील. मित्रांच्या सहवासात वेळ चांगला जाईल. भावंडांशी उत्तम समन्वय साधला जाईल. त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास किंवा चित्रपट पाहण्यास जाऊ शकाल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. वाद-विवादात यशस्वी व्हाल. जमीन - जुमल्याशी संबंधीत बाबीत यश प्राप्त होईल. व्यापाऱ्यांना मात्र थोडे सावध राहावे लागेल. काही जुन्या चुकांचा त्रास संभवतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने नवीन काहीतरी करू शकाल. विद्यार्थी तणावमुक्त असतील.

कन्या: हा आठवडा खूपच अनुकूल आहे. प्राप्तीत जलद गतीने वाढ होईल. खर्चात कपात होईल, अर्ध्या अधिक चिंता दूर होतील. धार्मिक विचारात गढून जाल. धर्माशी संबंधित प्रवृत्तीत आपण खूपच प्रवृत्त असल्याचे दिसून येईल. घरात एखादा सोहळा होऊ शकतो. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. लोकांच्या भेटीगाठी होतील. कौटुंबिक परिस्थिती आपणास अनुकूल असेल. घरात आनंद पसरेल. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून एखादा मोठा फायदा होऊ शकतो. कामात प्रगती करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती पूर्णतः अनुकूल असेल. जे परिश्रम केलेत त्याचे फायदे आता मिळू लागतील. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित झाल्याने वाटचाल योग्य दिशेने होईल.

तूळ: डिसेंबर महिन्याचा हा पहिला आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनातील समस्यांचा पूर्णतः विसर पडेल. कोणाशीही विचारपूर्वक बोलावे लागेल. कामावर पूर्णपणे लक्ष देऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल होईल. कार्यकौशल्यात वाढ होईल. मन लावून काम कराल. काही नवीन योजनांवर काम करण्याची संधी देण्यात येईल, त्यामुळे खुश व्हाल. व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. अनुभवाच्या व भागीदाराच्या जोरावर उत्तम कामगिरी करू शकाल. बाजारात व्यवसाय चांगली उंची गाठू शकेल. भांडणापासून दूर राहा. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. आनंद उपभोगण्याची तयारी ठेवा.

वृश्चिक: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात थोडा तणाव असल्याचे जाणवले तरी नाते टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही बाजूने पूर्णतः प्रयत्न केले जातील. मानसिक ताण दूर होईल. कार्यात यश प्राप्त होईल. ज्या समस्यांचे व चिंतेचे मळभ दाटले होते ते दूर होऊन कामात प्रगती कराल. खर्चात वाढ होईल, परंतु हे खर्च सुख-सोयींसाठी झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मोठी गुंतवणूक करावी लागू शकते. नोकरीत स्थिती अनुकूल आहे. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आत्मबल वाढल्याने कामे होतील. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. विद्यार्थ्यांना एकाग्रचित्त होण्यात कोणतीही समस्या असणार नाही, परंतु ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.

धनु: हा आठवडा चढ-उताराने भरलेला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. जोडीदाराचा पाठिंबा असल्याचे दिसून येईल. जीवनात यश प्राप्त होईल. प्रेमिकेच्या हृदयात अधिक जवळ याल. नाते अधिक दृढ होईल. खर्चात वाढ होईल. मानसिक चिंता वाढतील. आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल. असे असून आपणास नोकरीत बदलीस किंवा स्थान परिवर्तनास सामोरे जावे लागू शकते. व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल. बुद्धिमत्तेच्या व चातुर्याच्या जोरावर व्यवसाय वाढविण्यात यशस्वी व्हाल. खूप मोठी गुंतवणूक करावी लागू शकते. विद्यार्थी अभ्यासावर एकाग्र करू शकतील. लाभ होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची शक्यता होऊ शकते.

मकर: हा आठवडा चांगला आहे. कामावर लक्ष घालू शकाल. कुटुंबास वेळ देऊ शकाल. जोडीदाराशी सामंजस्य वाढवण्यावर सर्व लक्ष असेल. घरातील वातावरण सकारात्मक होईल. घरगुती खर्च कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपली स्थिती उत्तम असली तरी वायफळ बोलण्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सहकाऱ्यांशी नीट वागा. चांगला अर्थ लाभ होण्याची संभावना आहे. सरकारी क्षेत्राकडून फायदा होऊ शकतो. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळण्याची संभावना आहे.

कुंभ: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव असल्याचे जाणवेल. कामाच्या धावपळीमुळे जोडीदाराशी संवाद कमी होईल. मानसिक चिंता दूर करण्याचा प्रयत्न करणे आपल्यासाठी हितावह होईल. खर्चाचा जास्त विचार करू नका. प्राप्तीत थोडी वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. अनुकूलतेचा जितका लाभ घेता येईल तितका घेण्याचा प्रयत्न करून स्थान पक्के करावे. व्यापारासाठी आठवडा सामान्यच आहे. काही जुन्या योजना सुरु झाल्याने दिलासा मिळेल. नशिबाच्या जोरावर काही कामे कमी परिश्रमात यशस्वी करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्य आहे. परंतु, आर्किटेक्ट व फाईन आर्टस् चे विद्यार्थी उत्तम कामगिरी करू शकतील. खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल.

मीन: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर ती व्यक्ती आपल्यासाठी काहीही करण्यास तयार होईल. ती व्यक्ती नकार देऊ शकणार नाही. प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. स्वतःचा आत्मविश्वास वाढल्याची जाणीव होईल. व्यवसायात नवीन काही करण्यात मजा येईल. व्यापारास गती येईल व त्यामुळे प्राप्ती वाढेल. काही फायदेशीर सौदे होतील. काही नवीन लोकांच्या साथीने काम अधिक चांगले करू शकाल. नोकरी करणाऱ्यांना कामावर लक्ष द्यावे लागेल, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. स्वतःची वागणूक सुधारण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना नवीन काही करण्याची संधी मिळेल. अभ्यासास सृजनात्मकतेने पुढे घेऊन जाऊ शकतील.