साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लाभाच्या सुवर्ण संधी, उत्तम यश प्रगती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 15:29 IST2025-04-06T15:17:28+5:302025-04-06T15:29:50+5:30

Weekly Horoscope: ०६ एप्रिल २०२५ ते १२ एप्रिल २०२५ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरू आणि हर्षल वृषभ राशीत, मंगळ कर्क राशीत, केतु कन्या राशीत, प्लूटो मकर राशीत आहे. रवी, बुध, शुक्र, शनि, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण कर्क, सिंह आणि कन्या राशीतून राहील. रविवारी रामनवमी, मंगळवारी कामदा एकादशी, गुरुवारी भगवान महावीर जयंती आणि प्रदोष आहे. शनिवारी हनुमान जयंती, वैशाख स्नानारंभ आहे.

एकंदरीत ग्रहस्थिती आणि आगामी सण-उत्सव पाहता कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? कोणत्या राशींना हा कालावधी सकारात्मक अनुकूलता देणारा ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: हा आठवडा ठीक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची आपली सवय असल्याने ह्या आठवड्यात त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे योगासने करणे हितावह होईल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना आपली मेहनत वाढवावी लागेल. अन्यथा आपल्या हातून एखादी सुवर्ण संधी निसटू शकते. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. वरिष्ठांकडून ते प्रशंसित होतील. ह्या आठवड्यात प्रेमीजनांना सावध राहावे लागेल. एखाद्या गैरसमजामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहितांनी त्यांच्या वैवाहिक जीवनात सावध राहावे. जर कर्ज घ्यावयाचे असेल तर ते पूर्ण विचार करून मगच काढावे.

वृषभ: हा आठवडा ठीक आहे. ह्या आठवड्यात प्रकृती पहिल्यापेक्षा जास्त चांगली राहील. प्रकृतीची विशेष काळजी घेण्यासाठी सकाळी फिरावयास जा व योगासने करा. व्यापाऱ्यांचा व्यवसाय उत्तम होईल. त्यांना नवीन कंत्राट मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. जर एखादे नवीन कार्य करावयाचे असेल तर मित्रांची मदत घ्यावी लागेल. जर एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी आठवडा प्रतिकूल आहे. आठवड्याच्या सुरवातीस अशा एखाद्या व्यक्तीशी भेट होऊ शकते की जी व्यक्ती पूर्वीपासूनच प्रिय होती. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी अहंकार व क्रोध दूर ठेवावा लागेल.

मिथुन: हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे. आरोग्याच्या बाबतीत तंदुरुस्त राहाल. असे असले तरी एखाद्या जुनाट आजारामुळे थोडा पैसा खर्च करावा लागू शकतो. ह्या आठवड्यात काही नवीन व्यावसायिक ओळखी होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी प्राप्त करू शकतात. परंतु येथे वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. ह्या आठवड्यात प्रेमीजनांचा काहीसा गोंधळ उडेल. विवाहेच्छुकांच्या नात्यात जवळीक वाढेल. जर जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर हा आठवडा त्यास अनुकूल आहे. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते.

कर्क: हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने जास्त चांगला आहे. आहारावर विशेष लक्ष ठेवावे लागेल. हा आठवडा व्यवसाय व कारकिर्दीच्या दृष्टीने चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना सध्याची नोकरी सोडून दुसरी नोकरी धराव्याची असेल तर त्यासाठी आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. वैवाहिक जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकता. जर शेअर्स बाजारात गुंतवणूक केलीत तर भविष्यात लाभ होऊ शकतो.

सिंह: ह्या आठवड्यात प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. एखादा जुनाट विकार त्रास देऊ शकतो. व्यापाऱ्यांना एखादी मोठी ऑर्डर प्राप्त होण्याची संभावना आहे. त्यामुळे प्राप्तीत वृद्धी होईल. नोकरी करणाऱ्यांना यशस्वी होण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात अत्यंत सावध राहावे लागेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात काहीसा तणाव निर्माण होऊ शकतो. संबंधात माधुर्य निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करावा. ह्या आठवड्यात एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुतंवणूक करू नये. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल.

कन्या: हा आठवडा ठीक आहे. ह्या आठवड्यात प्रकृती पूर्वीच्या तुलनेत चांगली राहिली तरी पथ्य पाळावे लागेल. जर घरापासून दूर जाऊन व्यापार करत असाल तर घराच्या जवळपास नवीन व्यापार सुरु करण्यासाठी कार्यालय घेऊ शकता. ह्या आठवड्यात वायफळ खर्च होण्याची संभावना असून त्याने मानसिक तणावाखाली वावरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून अध्ययन केल्यास ते यशस्वी होऊ शकतात. प्रेमीजन प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाऊ शकतात. वैवाहिक जीवनात जर पूर्वीपासून काही तणाव असला तर तो ह्या आठवड्यात हळूहळू निवळू शकेल.

तूळ: डोकेदुखी किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित काही त्रास असेल तर ह्या आठवड्यात तो वाढू शकतो. व्यापाऱ्यांना जर जुना व्यवसाय पुन्हा सुरू करावयाचा असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरी मिळण्याची संभावना आहे. तेथे नवीन काही शिकावयास मिळेल. मन प्रेमिकेसाठी बेचैन होईल. काही गैरसमज झाल्यामुळे वैवाहिक संबंधात तणाव असू शकतो. एखादी प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. शेअर्स बाजारात दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी लक्षपूर्वक अध्ययन करावे लागेल. तसेच सामाजिक माध्यम व मित्र ह्यांच्यापासून दूर राहावे लागेल.

वृश्चिक: हा आठवडा ठीक आहे. आठवड्याच्या सुरवातीस एकदम तंदुरुस्त राहिलात तरी उच्च रक्तदाब किंवा हृदयाच्या ठोक्यातील अनियमितता आपणास त्रस्त करण्याची संभावना आहे. व्यवसाय किंवा कारकिर्दीत मातेची मदत कामास येईल. नोकरी करणाऱ्यांनी जुन्या नोकरीत सावध राहावे. आपल्या बरोबर राजकारण खेळले जाऊ शकते. तेव्हा नवीन नोकरीच्या शोधात राहावे. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. एखाद्या जुन्या गोष्टींमुळे जोडीदाराशी वाद होऊ शकतो. एखादी जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करावयाची असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. अभ्यासातून विद्यार्थ्यांचे मन विचलित झाल्याने त्यांना अध्ययनात त्रास होऊ शकतो.

धनु: हा आठवडा अनुकूल आहे. मागील आठवड्याच्या मानाने ह्या आठवड्यात प्रकृती चांगली राहील. डोळ्यांशी संबंधित काही त्रास असेल तर त्यावर उपचार करून घ्यावे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. व्यापारात मेहनत करून अग्रस्थानी राहाल. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत बदल करण्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. प्रेमीजनांसाठी हा आठवडा रोमांसाने भरलेला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात मौज-मजा करण्यात वेळ घालवतील. ह्या आठवड्यात प्राप्तीचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. अभ्यासात गोंधळ उडाल्याने विद्यार्थ्यांना अध्ययनात त्रास होऊ शकतो.

मकर: हा आठवडा चांगला आहे. ह्या आठवड्यात कामानिमित्त भरपूर प्रवास करावे लागू शकतात. नवीन प्रकल्प देण्यात येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत चांगला आहे. कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. जर सध्याची नोकरी बदलावयाची असेल तर नवीन नोकरी मिळू शकते. परदेशी संपर्कात वाढ झाल्याने व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठेत वृद्धी होऊ शकते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवन मात्र सुखद होईल.

कुंभ: ह्या आठवड्यात प्रकृती उत्तम राहील. असे असले तरी ज्यांना डोळ्याचे कोणत्याही प्रकारचे विकार असतील त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. जर बँकिंग किंवा आयटी क्षेत्राशी संबंधित कार्य करत असाल तर हा आठवडा चांगला आहे. जुन्या नोकरीत पदोन्नती होण्याची संभावना असल्याने नोकरीत बदल करण्याचा पुनर्विचार आपण करावा. ह्या आठवड्यात कुटुंबासाठी भरपूर खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात कमी परंतु सामाजिक माध्यम व मित्रांच्या सहवासात अधिक रमेल.

मीन: हा आठवडा चांगला आहे. जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर सध्या तो निर्णय पुढे ढकलावा. व्यापाऱ्यांचे एखादे जुने कार्य पुन्हा सुरू होऊ शकते. ह्या आठवड्यात अधिक उर्जावान राहाल, परंतु कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या प्रकृतीमुळे काहीसे त्रस्त होऊ शकता. ह्या आठवड्यात पैसा विनाकारण खर्च होऊ शकतो. जर वाहन किंवा घर खरेदी करावयाचे असेल तर आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा. ह्या आठवड्यात प्रेमिकेशी वाद होण्याची संभावना आहे. वैवाहिक संबंध विशेष चांगले नसतील. वैवाहिक जोडीदाराशी वाद संभवतो. त्यांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा.