साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ राशींना अत्यंत शुभफलदायी, राजकारणात उत्तम लाभ; सुख-समृद्धीचा काळ! By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 08:58 AM 2024-07-14T08:58:15+5:30 2024-07-14T09:11:59+5:30
Weekly Horoscope: तुमच्यासाठी कसा असेल आगामी आठवडा? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… या सप्ताहात रवी आणि बुध यांचे राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी मंगळ, गुरू आणि हर्षल वृषभ राशीत आहेत. रवी मिथुनेत असून, १६ जुलै रोजी तो कर्क राशीत जाईल, तेथे त्याची युती बुध व शुक्राशी होईल. बुध दि. १९ जुलै रोजी सिंह राशीत जाईल. केतु कन्येत, प्लूटो मकरेत, शनि कुंभेत आहेत. राहू आणि नेपच्यून मीन राशीत आहे. चंद्राचे भ्रमण कन्या, तूळ, वृश्चिक आणि धनू राशीतून राहील.
१७ जुलै रोजी देवशयनी एकादशी आहे. चातुर्मास सुरू होत आहे. पंढरपूरची यात्रा सुरू होत आहे. १९ जुलै रोजी प्रदोष आहे. २० जुलै रोजी सायंकाळी आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे. १६ जुलैपासून विठ्ठल नवरात्र सुरू होत आहे. १५ जुलैपासून श्री जगन्नाथ पुनर्यात्रा सुरू होत आहे.
आषाढी देवशयनी एकादशी, चातुर्मासारंभाचा काळ कोणत्या राशींना उत्तम लाभदायक ठरू शकेल? कोणत्या राशींवर पांडुरंग विठ्ठलासह, महादेव, लक्ष्मी देवीची कृपा राहू शकेल? व्यापार, व्यवसाय, शिक्षण, नोकरी, करिअर, कुटुंब, आर्थिक आघाडीवर आगामी आठवडा कसा असू शकेल? ते जाणून घेऊया...
मेष: हा आठवडा आपणास शुभ संकेत देणारा आहे. अचानकपणे कोठून तरी मोठा धनलाभ होण्याची संभावना आहे. कारकीर्द-व्यवसाय यांच्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. महिलांची धर्माप्रती रुची वाढेल. व्यवसायात आशास्पद प्रगती होत असल्याचे दिसले तरी आर्थिक देवाण-घेवाण करताना सावध राहावे. इतरांवर डोळेझाक विश्वास ठेवू नका. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखाद्या मंगल किंवा धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. प्रेमिकेशी प्रेम व सामंजस्य वाढेल. दांपत्य जीवन सुखद होईल. मुलांशी संबंधित एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण झाल्याने मनास दिलासा मिळेल.
वृषभ: ह्या आठवड्यात जीवनाशी संबंधित कोणतेही पाऊल विचारपूर्वकच उचलावे लागेल, अन्यथा निष्कारण समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ह्या आठवड्यात कामे वेळेवर पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न व परिश्रम करावेच लागतील. कामाचा भार जास्तच राहील. आपल्या व्यस्त कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य कमीच मिळेल. व्यापाऱ्यांसाठी आठवड्याची सुरुवात जरी चांगली झाली नाही तरी आठवड्याच्या अखेरीस मिळणारा लाभ त्यांच्या आनंदास कारणीभूत ठरेल. जमीन-जुमल्याशी संबंधित वाद आपल्या चिंतेस कारणीभूत ठरेल. परीक्षेची-स्पर्धेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
मिथुन: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस कार्यात जरी अडचणी आल्या तरी उत्तरार्धात कामे आपल्या मनाप्रमाणे होत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या सुरवातीस कारकीर्द-व्यवसाय यासाठी दूरवरचे किंवा जवळचे प्रवास संभवतात. दिनचर्या व आहारावर लक्ष ठेवावे. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. परिसराच्या बाहेर काम करणाऱ्या व कमिशनवर काम करणाऱ्या व्यक्तींना मानसिक तणाव व बेचैनी जाणवेल. प्रेम संबंध प्रगल्भ होतील. प्रेमिकेकडून एखादी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे. दांपत्य जीवन सुखद होईल. आठवड्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध सौख्य व यश देणारा होईल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने एखाद्या मोठ्या समस्येचे निराकरण झाल्याने मन प्रसन्न होईल.
कर्क: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आठवड्याच्या सुरुवातीस होऊ घातलेल्या कामात अडथळे आल्याने मन खिन्न होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या आजिविकेचे साधन अडचणीत येऊ शकते. व्यापाऱ्यांना त्यांच्या स्पर्धकांशी मोठी टक्कर द्यावी लागू शकते. आठवड्याच्या मध्यास कामात वाढ होईल. नोकरी करणाऱ्या महिलांना कार्यक्षेत्र व कुटुंब ह्यात समतोल साधणे अवघड होऊ शकते. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी जोडीदारास थोडा वेळ अवश्य द्यावा. प्रेम संबंधाचे प्रदर्शन करणे किंवा ते जगजाहीर करणे टाळावे. कोणतेही पाऊल विचारपूर्वक उचलावे, अन्यथा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
सिंह: हा आठवडा अत्यंत शुभ फलदायी आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात खूपच चांगली आहे. ह्या दरम्यान आपली पदोन्नती किंवा पगारवाढ संभवते. वरिष्ठांशी संपर्क वाढतील. अनेक दिवसांपासून जमीन-घर यांच्या खरेदी - विक्रीची योजना आखली असेल तर मनोकामना पूर्ण होऊ शकते. प्राप्तीचे नवीन स्रोत मिळून संचित धन वृद्धिंगत होईल. राजकारणातील व्यक्तींना उच्च पद मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी ओळख होईल, ज्याच्या मदतीने धन लाभ व प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कुटुंबातील एखाद्या वयस्कर व्यक्तीच्या प्रकृतीमुळे आपले मन काहीसे चिंतीत होऊ शकते. प्रेम संबंध प्रगल्ल्भ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल.
कन्या: ह्या आठवड्यात कार्यक्षेत्री विरोधकांपासून सावध राहावे लागेल. कारकिर्दीशी किंवा व्यवसायाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाईघाईत घेऊ नये. अशा वेळी एखाद्या शुभचिंतकाच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा किंवा निर्णय घेणे पुढे ढकलावे. आठवड्याच्या उत्तरार्धात प्राप्ती कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने आर्थिक घडी विस्कटू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कंटाळा येऊ शकतो. व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन योजनेत आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहावे लागेल. आपल्या अडचणीच्या वेळी आपली प्रेमिका मदतीस धावून येईल. वैवाहिक जीवन सुखद होईल.
तूळ: हा आठवडा आपल्यासाठी सुख-समृद्धी घेऊन येणारा आहे. आठवड्याच्या सुरवातीस सुख-सोयींशी संबंधित वस्तूंच्या खरेदीमुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अनेक दिवसांपासून बदलीच्या किंवा पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असाल तर मनोकामना पूर्ण होऊ शकते. प्राप्तीची साधने वाढली तरी आपले खर्च वाढतील. व्यवसायात अनपेक्षितपणे मिळालेला लाभ आपला आनंद वाढवेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपल्या मित्रांच्या मदतीने एखादे मोठे कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. प्रेमिकेशी जवळीक वाढेल. दांपत्य जीवन सुखद होईल. वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात हसत-खेळत वेळ घालविण्याची संधी मिळेल. जोडीदाराचे एखादे यश कुटुंबियांच्या आनंदास कारणीभूत ठरेल.
वृश्चिक: ह्या आठवड्यात एखाद्या गोष्टीमुळे स्वजनांशी मतभेद होण्याची संभावना आहे. बोलताना वाणी व वागणुकीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. आठवड्याच्या पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध काहीसा दिलासा देणारा असू शकतो. एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन कार्याची योजना आखाल. परदेशात कारकीर्द किंवा व्यवसाय करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. दांपत्य जीवन सुखद होण्यासाठी जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका. आठवड्याच्या सुरुवातीस प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विनाकारण होणारी धावपळ व खर्च ह्यामुळे मन काहीसे खिन्न होईल. कार्यक्षेत्री आपले विरोधक आपल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात.
धनु: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. आपले लक्ष्यांक गाठण्यासाठी अतिरिक्त परिश्रम व प्रयत्न करावे लागतील. कितीही कठीण परिस्थिती असली तरी प्राप्तीची साधने मात्र टिकून राहतील. सरकार-दरबारी प्रलंबित असलेल्या कामांना गती येईल. ह्या दरम्यान धार्मिक-सामाजिक प्रवृत्तीत सहभाग वाढेल. आठवड्याच्या मध्यास एखाद्या गोष्टीने कुटुंबियांशी मतभेद संभवतात. ह्या मतभेदांचे रूपांतर मनभेदात होणार नाही याची दक्षता घ्यावी. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या मित्राच्या मदतीने एखाद्या लाभदायी योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. लटकी भांडणे झाली तरी प्रेम संबंध दृढ होतील, शिवाय आपल्या कठीण समयी आपली प्रेमिका हेच आपले शक्तीस्थान असेल.
मकर: आठवड्याच्या सुरुवातीस धनलाभास व उन्नतीस अनुकूल संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. आठवड्याच्या मध्यास एखाद्या महिला मित्राच्या मदतीने एखादी मोठी चिंता दूर होईल. व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्त होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतात. अविवाहितांच्या जीवनात एखाद्या व्यक्तीचा प्रवेश संभवतो. नुकतीच एखाद्या व्यक्तीशी झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होण्याची संभावना आहे. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. कौटुंबिक वातावरण सुखद होईल. रोजगारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. घरात एखादे शुभ कार्य होण्याची संभावना आहे.
कुंभ: आठवड्याची सुरुवात काहीशी त्रासदायी असू शकते, परंतु दिलासाजनक बाब आहे की, त्रासातून बाहेर पडण्यासाठी मित्रांचे व स्वजनांचे भरपूर सहकार्य आपणास मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीस कारकिर्दीसाठी किंवा व्यवसायासाठी दूरवरचे किंवा जवळचे प्रवास करावे लागू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या मदतीने सरकार-दरबारी प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. अर्थात ही कठीण परिस्थिती फार काळ टिकणार नाही. उत्तरार्धात आपली स्थिती अनुकूल होत असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या अखेरीस सुख-सुविधेशी संबंधित वस्तूंसाठी जास्त पैसा खर्च करावा लागेल. प्रेम संबंध दृढ होतील. प्रेमिकेशी संबंधित एखाद्या मोठ्या यशाने मन प्रसन्न होईल. पूर्वी केलेल्या एखाद्या योजनेतील आर्थिक गुंतवणूक मोठ्या लाभास कारणीभूत ठरेल. बाजारात आलेल्या तेजीचा लाभ घेण्यात व्यापाऱ्यांना यश प्राप्त होईल. बाजारात त्यांची प्रतिष्ठा उंचावेल.
मीन: हा आठवडा शुभदायी व लाभदायी आहे. ह्या आठवड्यात कारकिर्दीत व व्यवसायात अपेक्षित प्रगती होत असल्याचे आपणास दिसून येईल. कार्यक्षेत्री वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने लक्ष्यांक वेळे पूर्वी गाठण्यात यशस्वी व्हाल. आठवड्याच्या अखेरपर्यंत एखादी चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. व्यापारानिमित्त केलेले प्रवास धनवृद्धी व व्यवसायवृद्धी करण्यास कारणीभूत ठरतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अतिरिक्त धनप्राप्तीचे स्रोत मिळतील. संचित धनात वाढ होईल. हा आठवडा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे. कार्यक्षेत्राव्यतिरिक्त कुटुंबात मान-सन्मानात वाढ होईल. प्रेम संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवन सुखद होईल. कुटुंबात एखादे मंगलकार्य संपन्न होऊ शकते.