साप्ताहिक राशीभविष्य: व्यापारात नफा, नोकरीत फायदा; सरकारकडून लाभ, ८ राशींना चांगला आठवडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:54 PM2023-09-24T12:54:51+5:302023-09-24T13:04:35+5:30

Weekly Horoscope: २४ सप्टेंबर २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात कुठलाही राशीपालट नाही. ग्रहस्थिती अशी- गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कर्केत, बुध सिंहेत, मंगळ आणि रवी कन्येत, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभेत, तर नेपच्यून मीन राशीत आहे.

चंद्राचे भ्रमण धनु, मकर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. २४ रोजी अदुःख नवमी, २५ रोजी परिवर्तिनी स्मार्त एकादशी, २६ रोजी भागवत एकादशी, २७ रोजी प्रदोष, २८ रोजी अनंत चतुर्दशी, २९ रोजी प्रोष्ठपदी पौर्णिमा आहे. मंगळवारी रात्री ८.२९ पासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे तीन दिवस पूर्ण पंचक असून, शनिवारी रात्री ९.०८ पर्यंत पंचक राहील.

अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होऊन काही दिवसांनी पितृपक्ष सुरू होईल. सप्टेंबर महिन्याची सांगता तुमच्यासाठी कशी असेल? जाता-जाता हा महिना कोणासाठी लाभदायक ठरू शकेल? कोणत्या राशींना आगामी काळ अनुकूल, सकारात्मक, उत्तम यश-प्रगती अन् लाभाचा ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: कामावर जास्त लक्ष देऊन जेथे कशाची उणीव दिसेल तेथे ती दूर करण्याचा प्रयत्न कराल. संवादाने वैवाहिक जीवन अधिक सुखावह होईल. घरगुती वातावरणात जिव्हाळा राहील. कार्यालयात कोणालाही खाजगी गोष्टी सांगू नका अन्यथा त्या थट्टेस कारणीभूत ठरू शकतील. कार्यक्षमतेत वृद्धी झाल्याने आपणास फायदाच होईल. वरिष्ठांच्या नजरेत कामगिरी उठून दिसेल. त्यामुळे ते पाठीशी राहतील. व्यापारात चढ - उताराची स्थिती राहिली तरी सुद्धा खुश व्हाल, असा एखादा सौदा आपल्या हाती लागू शकेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील.

वृषभ: हा आठवडा दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचा आनंद घेऊन येणारा आहे. हा प्रवास आपण आनंदासाठी व मित्र किंवा प्रियजनांसह करून अत्यंत खुश व्हाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी नवीन उमेद घेऊन येणारा आठवडा आहे. प्रगती व्हावी म्हणून आपण आवश्यक तितके परिश्रम कराल. पदोन्नती विलंबित होऊ शकते. असे असले तरी हिंमत सोडू नका, हे काही काळासाठीच असेल. व्यापाऱ्यांना उन्नती बघावयास मिळेल. त्यांना हाताखाली काम करणाऱ्यांशी चांगले वागावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपली योग्यता सिद्ध करून तांत्रिक व मॅनेजमेंटच्या अभ्यासात चांगला लाभ होईल. एखादी सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल.

मिथुन: हा आठवडा उत्तम आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारासाठी बरेच प्रवास करावे लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नका. निव्वळ आपले कामच करत राहावे. एखादे नवीन काम मिळाल्यास ते उत्साहात पूर्ण करा. जमीन - जुमल्यात मोठा लाभ होण्याची संभावना आहे. एखादी संपत्ती मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. आर्थिक आघाडीवर यशस्वी व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडथळे येऊ शकतात.

कर्क: हा आठवडा चढ - उतारांचा आहे. आठवड्याची सुरवात काहीशी प्रतिकूल असेल. मानसिक चिंतेत हरवून जाल. वैवाहिक जीवनात प्रेम, रोमांस व आपुलकी असली तरी काही मतभेद होण्याची संभावना आहे. मित्रांची भेट होईल. नोकरीतील लक्ष्यांक पूर्ण न होण्याची चिंता आपणास सतावू शकते. असे असून आठवड्याची अखेर नोकरीसाठी अनुकूल असेल. प्रयत्न यशस्वी होतील. व्यापाऱ्यांच्या हाती नवीन सौदे येऊ शकतील, जे आवश्यकच असतील. खर्चात वाढ होईल, ज्यामुळे काळजी वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे.

सिंह: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. नवीन कृतिशीलता दाखविण्याचा प्रयत्न कराल. कलेस वाव दिल्याने फायदा होईल. मन हलके होऊन मनावरील ताण दूर होईल. सामाजिक प्रतिमेत सुधारणा होईल. काही नवीन लोकांशी मैत्री संभवते. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असली तरी खूप मेहनत करावी लागेल, तसेच कामावर लक्ष द्यावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. कामात वाढ करून त्याची व्याप्ती वाढवाल. त्यामुळे फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा विशेष अनुकूल नसल्याने त्यांना आपल्या अभ्यासावर जास्त लक्ष द्यावे लागेल.

कन्या: हा आठवडा तजेला देणारा आहे. असे असून अहंकारी होऊ शकता. आपल्या अहंकारामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची संभावना आहे. अहंकारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आपल्या क्रोधामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकते. आत्मविश्वास उंचावल्याने नोकरी व व्यापार अशा दोन्ही क्षेत्रात आपली कामगिरी उत्तम होईल. उत्साह सभोवतालच्या लोकांना प्रभावित करेल. प्रेरित होऊन इतरांच्या पाठीशी असल्याचे दिसून येईल. असे असले तरी घाईघाईत कोणतेही काम करणे टाळावे. अन्यथा त्रास होऊ शकतो. कोणालाही अप्रिय बोल बोलू नये. आपल्या खाण्या - पिण्यावर लक्ष द्यावे. प्राप्तीत वाढ होईल. खर्चात कपात होईल. नोकरीत यश प्राप्त होईल. व्यापाऱ्यांना त्यांच्या आत्मविश्वासाच्या जोरावर यशस्वी होता येऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच एखादे विधायक काम करण्याची संधी मिळू शकेल. प्रतिमा उंचावेल.

तूळ: हा आठवडा चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस मित्रांच्या सहवासात चांगला वेळ घालवू शकाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात समाधानी असल्याचे दिसून आले तरी आठवड्याच्या अखेरीस त्यांच्यात काही गैरसमज होण्याची संभावना आहे. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. नवीन जवाबदारी अंगावर पडण्याची चर्चा होऊ शकते. व्यापारात परिस्थिती अनुकूल राहील. गुंतवणुकीचा फायदा होईल. केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नशिबाच्या प्राबल्यामुळे धन प्राप्ती होईल. विद्यार्थ्यांना आपली एकाग्रता वाढवून अभ्यास करावा लागेल. असे केल्यासच त्यांना चांगले परिणाम मिळतील. हा आठवडा संशोधन करण्यास अनुकूल आहे.

वृश्चिक: हा आठवडा अनुकूल आहे. वाणीतील गोडव्यामुळे आपण शत्रुंना आपलेसे करू शकाल. विरोधकांवर मात कराल. विवाहितांसाठी आठवडा अनुकूल आहे. नोकरीत स्थिती आपणास अनुकूल राहील. परिश्रमाचे यथोचित फळ मिळेल. सरकारी क्षेत्राकडून सुद्धा चांगला लाभ संभवतो. आर्थिक दृष्ट्या आठवडा अनुकूल आहे. आर्थिक उन्नती होईल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. व्यापारानिमित्त एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीची भेट संभवते. भरपूर प्रवास होतील, जे व्यापारासाठी उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. उच्च शिक्षणात यश प्राप्त होईल. पोटाशी संबंधित आजार संभवतात. तेव्हा काळजी घ्यावी.

धनु: हा आठवडा प्रगतीदायक आहे. आत्मविश्वास वाढेल. जीवनात इतरांना महत्व द्याल. अत्यंत भावनाशील होऊन नातेसंबंधांवर लक्ष घालू लागाल. कोणतीही व्यक्ती आपले वाईट करू शकणार नाही. नोकरी व व्यापार अशा दोन्ही ठिकाणी आपल्या यशाचा झेंडा फडकवाल. कोणतेही काम अति आत्मविश्वासाने न करता योग्य पद्धतीने केल्यास कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. खर्च कमी होतील. प्राप्तीत वाढ होईल. प्रकृतीत चढ - उतार होताना दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांनी अभ्यासात मागे राहू नये इतकेच, अन्यथा नुकसान संभवते.

मकर: हा आठवडा चढ - उतारांचा आहे. घरगुती कामात अत्यंत व्यस्त राहाल. घरात सुख - शांती नांदेल. नोकरीच्या ठिकाणी अनुकूलतेचा फायदा घेण्यास शिकावे लागेल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. व्यापारात यश प्राप्ती होईल. खर्चात वाढ झाल्याने मानसिक ताण वाढू शकतो. प्रकृतीच्या बाबतीत जागरूक राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात चांगले परिणाम मिळतील. ते उच्च शिक्षणात व तांत्रिक विषयात उत्तम कामगिरी करू शकतील.

कुंभ: हा आठवडा सामान्यच आहे. एखाद्या विशेष कामात खास मित्राचा पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने कामात यश प्राप्ती होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वकच करावी. अन्यथा नुकसान सोसावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांनी त्यांची प्रतिमा मलिन होईल असे कोणतेही कृत्य करू नये. काम निष्ठेने करावे. व्यापाऱ्यांना चांगले यश प्राप्त होऊ शकते. ते काही महत्वाच्या योजना तयार करतील, ज्यामुळे ते त्यांच्या विरोधकांवर मात करू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम मिळू लागतील, ज्यास त्यांचे परिश्रम कारणीभूत ठरतील.

मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. नशिबाची साथ मिळाल्याने बरीचशी कामे सहजपणे पूर्ण होतील. प्रेमीजनांसाठी आठवडा उन्नतीदायक आहे. विवाहितांसाठी हा आठवडा काहीसा विचार करावयास लावणारा आहे. एखाद्या मुद्द्यावर जोडीदाराशी मतभेद होण्याची संभावना आहे. प्राप्तीत वाढ नक्कीच होईल. खर्च होतच राहतील. व्यापारात प्रगती होईल. लोक आपली ईर्ष्या करू लागतील, ह्याचाच अर्थ असा की योग्य मार्गावरून वाटचाल करत आहात. कामे करतच राहा. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते.