आयुष्यात जेव्हा चांगल्या गोष्टी घडणार असतात, तेव्हा ईश्वराकडून मिळतात 'या' पूर्वसूचना! By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 04:17 PM 2021-03-02T16:17:35+5:30 2021-03-02T16:22:59+5:30
आपण सगळे जण सुखाची वाट बघत आस लावून बसलेले असतो. सुख मात्र हुलकावणी देते. येईल येईल म्हणता म्हणता आणखीनच वाट पहायला लावते. मात्र अनेकदा चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतात आणि त्याच्या आपल्याला पूर्वसूचनाही मिळतात. फक्त त्या सूचना कोणत्या हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून पुढील गोष्टी लक्षात ठेवा आणि सुखाचे स्वागत करत म्हणा, 'या सुखांनो या...' ब्रह्ममुहूर्तावर पडलेले स्वप्न: असे म्हणतात, की पहाटे पडलेली स्वप्नं खरी होतात. परंतु झोपून उठल्यावर सगळीच स्वप्नं आपल्याला लक्षात राहतात असे नाही. मात्र काही स्वप्नं आपल्याला दिवसभर त्याच विचारात मग्न ठेवतात. अशा स्वप्नांपैकी तुम्हाला असे स्वप्नं पडले, की तुम्ही एखाद्या प्रकाशमान दिशेने चालत जात आहात. न संपणारी वाट तुम्हाला खुणावत आहे, समुद्रकिनाऱ्यावर चालताना अथांग सागर आणि विस्तीर्ण क्षितिज दिसत आहे, तर समजून घ्या, तुमच्या यशाचे द्वार खुले होणार आहे. सुखाची, यशाची वाट तुम्हाला आकर्षून घेत आहे. तुमची रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत.
अकारण प्रसन्नता : आयुष्यात छान गोष्टी घडू लागल्या, की मन आनंदी आणि प्रसन्न राहते. परंतु, अनेकदा असे घडते, की आनंदाचे काही कारण नसतानाही आपल्याला प्रसन्न वाटते. सगळे काही सुरळीत झाले आहे, सगळे प्रश्न संपले आहेत असा भास होतो. एका वेगळ्याच विश्वात आपण वावरतो, आनंदी राहतो. असे अकारण आनंदाचे क्षण आपल्याला भविष्यातील आनंद वार्तेची सूचना देत असतात.
दारात पशु पक्ष्याचे येणे: पशु पक्षी पाळीव असतील तर त्यांना आपला लळा लागणे स्वाभाविक आहे. परंतु, ओळख नसतानाही गाय, वासरू, कुत्रा, मांजर, खारुताई, पोपट, चिमणी आपल्या घरा-दारावर येत असतील, तर हे देखील सुखाच्या आगमनाचे संकेत आहेत. अनेकांच्या गॅलरीत, व्हरांड्यात, अंगणात चिमणी, कबुतरे, मांजरी, कुत्री पिलांना जन्म देतात, आपल्याला त्यांची आवराआवर करण्यात मनस्ताप होतो. परंतु शास्त्रानुसार नवा जीव तुमच्या घराच्या आवारात जन्म घेत असेल, तर तुमच्या घरात सुखाचा शिरकाव होत आहे असे समजू शकता.
घराचे गोकुळ होणे : लहान मुले आपल्या घरापेक्षा शेजाऱ्यांकडे जास्त काळ राहतात. त्यांना तिथेच रमायला जास्त आवडतं. त्यांच्या येण्याने आपल्या घराचे गोकुळ बनते. घरात वातावरण प्रसन्न राहते. मुलांच्या खेळण्या बागडण्याने, हसण्या खिदळण्याने सुख देखील अलवार पावलांनी आपला गृहप्रवेश करते.
देवाची हसरी मूर्ती : सर्व देवी देवतांच्या मूर्ती प्रसन्न वदनीच असतात. परंतु, कधी कधी देवपूजा करत असताना आपल्याला मूर्तीकडे, फोटोकडे पाहून ते आपल्याकडे पाहून हसत असल्याचा भास होतो. देव आपल्याकडे पाहून हसतोय ही भावना मुळात कितीतरी सुखद आहे. तसे जाणवणे देखील सुखाची नांदी असते.
साधूंचे किंवा गोमातेचे दर्शन : एखाद्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि तुम्हाला वासुदेवाचे, साधूंचे, गोमातेचे दर्शन घडले, तर कामात अडचणी येत नाहीत. कामे मार्गी लागतात आणि कामात यश प्राप्त होते.
मिठाई मिळणे : आपल्या आनंदाच्या क्षणी मिठाई वाटून आपण आनंद साजरा करतोच. परंतु सायंकाळच्या वेळी अनपेक्षितपणे कोणाकडून तुम्हाला मिठाई मिळाली, तर तीसुद्धा तुमच्या आयुष्यात शुभ समय सुरू होणार असल्याचे सूचक करते.