विष्णुवतार असलेल्या सामर्थ्यवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्ध का थांबवले नाही? जाणून घ्या नेमके कारण

By देवेश फडके | Published: February 16, 2021 07:05 PM2021-02-16T19:05:52+5:302021-02-16T19:09:42+5:30

महाभारतातही मर्यादांचे अनेक आदर्श वस्तुपाठ पाहायला मिळतात. श्रीविष्णुवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांना युद्ध थांबवता येणे शक्य होते का? सर्व शक्तिमान, सामर्थ्यवान श्रीकृष्णांनी महाभारत (Mahabharata War) युद्ध का थांबवले नाही? जाणून घेऊया...

महाभारताचे युद्ध तब्बल १८ दिवस सुरू होते. हजारो पराक्रमी योद्धे यात कामी आले. अर्जुनाला आप्तेष्टांवरच शस्त्र उचलणे शक्य होत नव्हते. अशावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेले ज्ञान भगवद्गीता म्हणून ब्रह्मांडाला लाभले. इतकी वर्षे लोटूनही त्याबाबतची जिज्ञासा कमी झालेली दिसत नाही.

श्रीविष्णूचे दशावतार प्रसिद्ध आहेत. प्रत्येक अवताराचे कार्य, महत्त्व आणि मान्यता वेगळ्या आहेत. यापैकी सर्वांत गाजलेले अवतार म्हणजे रामावतार आणि कृष्णावतार. एका अवतारकार्यात मर्यादांचे तर दुसऱ्या अवतारात मुसद्देगिरी आणि धर्माचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

श्रीकृष्णाने एकही शस्त्र न उचलता कुटनीती, राजकारण, मुसद्देगिरी यांच्या जोरावर पांडवांना या युद्धात विजयी बनवले. महाभारतातही मर्यादांचे अनेक आदर्श वस्तुपाठ पाहायला मिळतात. परंतु, श्रीविष्णुवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांना युद्ध थांबवता येणे शक्य होते का? सर्व शक्तिमान, सामर्थ्यवान श्रीकृष्णांनी महाभारत युद्ध का थांबवले नाही? जाणून घेऊया...

महाभारत युद्धाची घोषणा झाली, तेव्हा कौरवांनी अनेक राजांना आपल्याबाजूने वळवून घेण्यास सुरुवात केली. पांडवांनीही अनेकांना त्यांच्याबाजूने लढण्याची विनंती केली. हे युद्ध धर्म आणि अधर्माच्या तत्त्वामुळे सुरू झाले. या सर्व घडामोडीत श्रीकृष्णाची नीती होतीच.

महाभारत युद्ध १८ दिवस चालले. न भूतो न भविष्यती अशी हानी झाली. महाभारत युद्धानंतर श्रीकृष्ण द्वारकेत परतले. द्वारकेत परतल्यानंतर त्यांनी आश्रमता जाऊन उत्तंक ऋषींची भेट घेतली. श्रीकृष्णांनी महाभारत होणे रोखले नाही, याबाबत ते अत्यंत क्रोधीत झाले होते. आपण एवढे ज्ञानी आणि सामर्थ्यवान असूनही युद्ध थांबवू शकला नाहीत. आपल्याला मी जर शाप दिला, तर ते योग्य ठरणार नाही का?, असा थेट सवाल उत्तंक ऋषींनी केला.

महामुनी एखाद्याला ज्ञान दिले गेले, समजावून सांगितले, योग्य मार्गही दाखवला, तरीही ती व्यक्ती वाईट मार्गाची निवड करत असेल, चुकीच्या मार्गावरूनच मार्गक्रमण करत असेल, तर त्यात ज्ञान देणाऱ्याचे काय दोष? असा प्रतिप्रश्न श्रीकृष्णांनी उत्तंक ऋषींना केला.

महामुनी माझ्याकडून संपूर्ण जीवनात कोणाचे अहित झालेले नाही. निर्दोष माणूस खडकाप्रमाणे बळकट असतो. आपण मला शाप देऊ इच्छित असाल, तर आपण आपली इच्छा पूर्ण करावी, असे सांगून श्रीकृष्णांनी उत्तंक ऋषींना विश्वरुपदर्शनाची झलक दाखवली. विराट रुपाचे दर्शन होताच उत्तंक स्वामी नतमस्तक झाले. वाळवंटातही सर्वत्र पाणी उपलब्ध होऊन हिरवळ होवो, असे वरदान मागितले. श्रीकृष्ण तथास्तु म्हणून निघून गेले.

महामुनी उत्तंक एके दिवशी फिरता फिरता वाळवंटात फार लांब निघून जातात. वातावरण अतिशय उष्ण झाल्याने त्यांचा तहानलेला जीव कासावीस होऊ लागतो. तेवढ्यात एक माणूस त्यांच्यासमोर पाणी घेऊन उभा राहतो. ऋषी रागावून त्याला निघून जाण्यास सांगतात. त्याच्या हातून पाणी पिण्यास त्यांना अतिशय संकोच वाटतो. त्या व्यक्तीला शाप देणार इतक्यात त्यांना समोर श्रीकृष्ण दर्शन होते.

श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की, आपण रागावू नका. आपणच तर म्हणता की, परमात्मा आणि आत्मा एकच आहे. मग आपण सांगा की, त्या व्यक्तीच्या आत्म्यात परमात्म्याचा वास नव्हता का! जे आपणास अमृत पाजण्यास आले होते. पण आपण त्याला हुडकवून लावले.

गुणांच्या अभिमानात उत्तंग बुडालेल्या माझ्यासारख्या माणसाला शास्त्राचे व्यावहारिक ज्ञान कळले नाही, तर मग कौरव -पांडवांनी श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकले नाही, यात श्रीकृष्णांचा काय दोष? थोर, सामर्थ्यवान केवळ मार्ग दाखवू शकतात. परंतु, कोणी त्या ज्ञानाला आपल्या जीवनात आत्मसातच केले नाही आणि त्याच्यापासून मिळणाऱ्या लाभापासून वंचित असेल, तर त्यात त्यांचा काय दोष? महामुनी उत्तंक यांना आपोआप आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळते.