बायका 'या' चार गोष्टींबद्दल आपल्या नवऱ्याशी कधीच मोकळेपणाने बोलत नाहीत!- चाणक्यनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 08:44 AM2022-11-10T08:44:01+5:302022-11-10T09:03:26+5:30

बायकांच्या मनात काय सुरू आहे, ते ब्रह्मदेवही ओळखू शकत नाही, नवऱ्याला ते ओळखणं दूरच! म्हणून तर संसारात पडल्यावर भांड्याला भांड लागतं म्हणतात, ते यासाठीच! बायका आपल्या मनातलं सांगत नाहीत आणि पुरुषांना ते ओळखता येत नाही, तरी त्यांनी ते न सांगता समजून घ्यावं हा बायकांचा हट्ट असतो. म्हणून इथे आम्ही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या त्या चार गोष्टींचा खुलासा करणार आहोत, ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा संसार सुखी होईल आणि बायकोही खुश राहील!

आचार्य चाणक्य अर्थ शास्त्रात निपुण असले तरी त्यांनी मनुष्य जीवनाचा अर्थ ही उलगडून सांगितला आहे. त्यांचे विचार आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन चाणक्यनीती म्हणून ओळखले जाते. या लेखात आपण अशाच चार महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल जाणून घेऊ!

बायका घरासाठी आणि घरच्यांसाठी राब राब राबतात. अगदी आजच्या प्रगत काळातसुद्धा! हाताशी मोलकरीण असली तरी आपले काम सांभाळून घरच्यांची जबाबदारी ती सांभाळत असते. अशात तिचे स्वतःच्या प्रकृतीकडे नेहमीच दुर्लक्ष होते. अशा वेळी बाकीच्यांनी नाही तरी निदान नवऱ्याने तिची विचारपूस करावी, काळजी घ्यावी, तिला हवं नको ते बघावं अशी तिची माफक अपेक्षा असते. ही गोष्ट लक्षात ठेवलीत तर बायको कायम तुमच्यावर खूष राहील हे लक्षात ठेवा!

प्रणय हा सुखी संसाराचा मूलभूत पाया असतो. पुरुषांना जरा प्रणयात रस असतो तसा स्त्रियांनाही असतो. सगळ्याच स्त्रिया त्याबद्दल मोकळेपणाने बोलत नाहीत. केवळ शरीरसुख म्हणजे प्रणय नाही, प्रेमाचे शब्द, आपुलकी, सहवास, गप्पा, आठवणी, गाणी हा सुद्धा प्रणयाचा एक भाग आहे. मात्र ही पायरी वगळून पुरुष जेव्हा थेट स्त्रीच्या देहावर हक्क गाजवू पाहतात, तेव्हा त्यांनाही कोरडा, रुक्ष आणि अनैच्छिक प्रतिसाद मिळतो. हे टाळायचे असेल तर बायकोचे मन जिंका. छोट्या छोट्या गोष्टींनी सुखावणारी ती मोठ्या भेटवस्तू मिळवण्यासाठी आसुसलेली नसते. पण जेव्हा प्रेमाच्या चार गोष्टी सुद्धा मागाव्या लागतात तेव्हा ती नाराज होते. तिची नाराजी दूर करा आणि नवरा बायकोचे नाते प्रेमाने घट्ट बांधून ठेवा.

नवऱ्याचा पगार कितीही असला, ती स्वतः जरी कमावती असली, तरी तिला स्वतःची वेगळी बचत करायला आवडते. ती अनेक ठिकाणी गुपचूप पैसे साठवून ठेवते. त्या पैशांचा ती स्वतःसाठी वापर करेल असे नाही, पण अडीअडचणीला घरासाठी, नवऱ्यासाठी जरूर खर्च करेल. एक प्रकारे ती घरातील स्विस बँक असते असे म्हटले तरी चालेल. मात्र तिला गृहीत धरणे योग्य नाही. आपण स्वतः बचतीची सवय लावून घेत, आपल्या जमा खर्चाबद्दल, गुंतवणुकीबद्दल तिच्याशी मोकळेपणाने चर्चा केली तर नवरा बायकोचे नाते अधिक दृढ होते. एकमेकांचा विश्वास संपादन करता येतो आणि तोच या नात्याचा शेवट्पर्यंत आधार असतो.

लग्नानंतर नवरा बायकोने आपल्या भूतकाळावर पडदा टाकावा. लग्नाआधी उमलत्या वयात प्रेम होणं स्वाभाविक आहे, परंतु लग्नानंतर जोडीदाराशी एकनिष्ठ राहून संसार सुखाचा करणे ही दोघांची जबाबदारी असते. अशा वेळी अकारण मागची नाती खोदून न काढता त्या आठवणींना मूठ माती देऊन जोडीदाराशी प्रतारणा करू नये, हेच इष्ट! म्हणून विवाह संस्थेने धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरुषार्थासाठी सहचारिणी दिलेली असते. तिचा विश्वास संपादन करा, प्रेम करा, ती कधीच जुन्या नात्यांची आठवण काढणार नाही!