'या' साध्या सोप्या उपायांनी तुम्हीदेखील वास्तुदोष सहज दूर करू शकता! By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 05:28 PM 2021-06-17T17:28:14+5:30 2021-06-17T17:51:11+5:30
वास्तू आणि फेंगशुई यांचा संबंध कोणत्याही धर्माशी नसून थेट पंच महाभूतांशी असतो. पृथ्वी, आकाश, तेज, जल आणि वायू हे ज्याप्रमाणे निसर्गात समतोल राखतात, त्याप्रमाणे वास्तुशास्त्रदेखील घरात स्थित पंचमहाभूतांचे समतोल राखतात. घरात जर वास्तू दोष असतील तर काही सोपे उपाय वापरून ते सहज दूर करता येतात. मत्स्यालय : घरात लिव्हिंग रूम मध्ये आकर्षक मत्स्यालय ठेवले असेल, तर घराची शोभा वाढतेच, शिवाय पाहणाऱ्यालाही समुद्र विश्वाशी जोडले गेल्याचे समाधान मिळते. हे मत्स्यालय लिव्हिंग रूम च्या दक्षिण पूर्व दिशेला असेल, तर ते धन समृद्धी आकर्षून घेते.
शोभेचे झाड : लिव्हिंग रूमचा एखादा रिकामा कोपरा किंवा मोकळी जागा शोभेच्या किंवा सूर्यप्रकाशाशिवाय वाढू शकेल अशा झाडाने सजली असेल, तर घराची शोभा वाढतेच, शिवाय ती कुंडी दक्षिण पूर्व दिशेला असेल तर पैशांची आणि आरोग्याचीदेखील भरभराट होते. तसेच पूर्व दिशेला लावलेली रोपे कुटूंबातील सदस्यांसाठी आरोग्यवर्धक ठरतात.
मोठे घड्याळ : घड्याळ केवळ वेळ दर्शवत नाही तर तुमच्या घराची भिंत देखील शोभिवंत करते. मोठ्या आकाराचे घड्याळ कोणाचेही लक्ष वेधून घेते. एखाद्या चित्राबाजूला केलेली छोट्याशा घड्याळाची रचना आकर्षक दिसते. लिव्हिंग रूम मध्ये घड्याळ लावताना उत्तर पूर्व दिशा निवडावी, त्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वज ठरते. येणारा काळ सुखकारक ठरतो.
प्रकाश : घरात जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश असणे वास्तूच्या दृष्टीने हितावह ठरते. जेवढा जास्त प्रकाश तेवढी जास्त सकारात्मक ऊर्जा! शक्य तेवढ्या वेळ घराची खिडक्या दारे उघडी ठेवावीत. घरात वारा आणि प्रकाश खेळते राहिल्याने घराचे आणि घरातल्यांचे आरोग्य चांगले राहते.
फोटो : घरात शक्य तेवढे जास्त कुटुंबातील सदस्यांचे फोटो रचनात्मक पद्धतीने लावून ठेवावेत. विशेषतः स्वयंपाक घर, बेड रूप, लिव्हिंग रूम मध्ये! जिथे आपला वावर जास्त असतो, त्याठिकाणी आल्हाददायक आठवणींचे फोटो लावावेत. चांगल्या आठवणी चांगली मानसिकता तयार करतात. मूड ठीक करतात. वातावरणात हलकेपणा आणतात.
बाग : घराला मागे पुढे अंगण असेल किंवा गॅलरी असेल तर शक्य तेवढी छान छान रोपं लावून बाग तयार करा. त्या बागेत रोज थोडा वेळ घालवा. रोपांची मशागत करा. त्यांची वाढ बघा. निसर्गाच्या जवळ जाण्याचा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. घरात जागेचा अभाव असेल तर खिडकीमध्ये निदान तुळस आणि दोन चार फुल झाडं लावा. घरातही सूर्यप्रकाशाशिवाय वाढणाऱ्या रोपांचा वापर करून वास्तू शास्त्राला पूरक हिरवळ निर्माण करता येईल.
दिवे : घरात दिव्यांची सुंदर आणि कलात्मक रचना वास्तूला उठाव देते. दिवसा भरपूर प्रकाश आणि सायंकाळी आकर्षक दिव्यांची रचना मनाला तजेला देईल. तना-मनाचा थकवा घालवेल. पूर्ण घरात आकर्षक दिव्यांची रचना शक्य नसेल, तर निदान बेडरूम तरी आकर्षक लायटिंग, झुंबर किंवा मिणमिणत्या दिव्यांनी सजवा. वाटल्यास सुगंधी मेणबत्तीचा वापर करा.