तुमचा अंगठा उलगडेल, तुमचे व्यक्तिमत्त्व आणि स्वभाववैशिष्ट्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 08:47 AM2021-06-03T08:47:54+5:302021-06-03T08:53:49+5:30

व्यक्तीचा स्वभाव कसा असेल याचे अनुमान काढण्यासाठी आपल्याकड ज्योतिषशास्त्र, हस्तरेखाशास्त्र, समुद्रशास्त्र इ. शास्त्रांच्या माध्यमातून पुष्कळ अभ्यास झालेला आहे. सर्वांनाच या विषयाची गोडी किंवा अभ्यासाची गरज भासेल असे नाही. परंतु, आपल्या आणि इतरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जुजबी ज्ञान असावे, असे प्रत्येकाला वाटते. यासाठी उपरोक्त शास्त्राच्या अभ्यासकांकडून मिळणारी माहिती आपल्याला काही विषयांचा उलगडा करून सांगते. जसे की, आपल्या हाताचा अंगठा!

समुद्रशास्त्रानुसार ज्यांचा अंगठा छोटा असतो, अशा व्यक्ती साहित्य, संगीत अशा विषयांशी जोडलेली असतात. त्यांच्याकडे मित्रांची कमतरता नसते. मोठा लोकसंग्रह असतो. अशा व्यक्ती बुद्धीपेक्षा जास्त हृदयाचा कौल घेतात. त्यामुळे भावनिक होऊन इतरांच्या निर्णय प्रक्रीयेत सल्ले द्यायला पुढे असतात, परंतु जेव्हा स्वत:वर निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा ते द्विधा मन:स्थितीत अडकलेले असतात.

काही जणांची बोटं लांबसडक असतात. अशी मंडळी कलाकार असतात. कलाक्षेत्रात नाव कमावतात. इतर बोटांप्रमाणे अंगठाही मोठा व लांब असलेल्या व्यक्ती दिसायला आकर्षक असतात. कुशाग्र बुद्धीचे असतात. त्यांच्यात नेतृत्वाचे चांगले गुण असतात. कोणत्याही परिस्थितीचे नियोजन ते उत्तम प्रकारे करू शकतात. त्यांना कधीही पैशांची कमतरता भासत नाही. उलट, असे लोक गडगंज श्रीमंत असतात.

ज्यांचा अंगठा कठोर असतो. असे लोक स्वभावानेदेखील कठोर असतात. त्यांचे मन स्वच्छ असते परंतु स्पष्टवक्तेपणामुळे ते समोरच्याला दुखावतात आणि याचे त्यांना भानही नसते. याच स्वभावामुळे लोक त्यांच्यापासून दुरावले जातात. वास्तविक पाहता, अशा लोकांकडे निर्णयक्षमता चांगली असते. ते भावनिक न होता वास्तवतेला धरून निर्णय घेतात. परंतु, त्यांच्यात संघटनक्षमता नसल्यामुळे लोक त्यांचा सल्ला विचारात घेत नाहीत.

काही लोकांचा हात, बोटं, अंगठा एवढा मुलायम, मृदू असतो, की त्यांच्या हातात हाडं आहेत की नाही, अशी शंका येते. अशा लोकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक असतो. त्यांना काही मिळवण्यापेक्षा दुसऱ्यांना देण्यात आणि नवनवीन गोष्टी शिकण्यात धन्यता वाटते. या स्वभावामुळे त्यांची कायम प्रगती होत राहते. असे लोक व्यवसायात यशस्वी ठरतात.

ज्यांचा अंगठा मागच्या बाजूला झुकलेला असतो आणि अत्यंत लवचिक असतो, असे लोक कोणत्याही परिस्थितीशी सहज जुळवून घेतात. त्यांना संधी अचूक ओळखता येते. परंतु हलक्या कानाचे असल्यामुळे दुसऱ्यांच्या विचारांनी विचार करत आलेली संधी दवडतात. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नसते, परंतु खर्चिक स्वभावामुळे बचतीच्या नावे आनंद असतो.

काही जणांचा अंगठा अगदी काटकोनात उभा असतो. त्याला थोडाही बाक नसतो. अशा लोकांचा स्वभाव त्यांच्या अंगठ्यावरून सहज ओळखता येतो. असे लोक सरळ स्वभावाचे, इमानदार, निष्ठावान असतात. त्यांच्यात खूप आत्मविश्वास असतो. असे लोक जे ठरवतात, ते प्राप्त केल्याशिवाय थांबत नाहीत.