Aadipurush Movie: आदिपुरूषमधील 'रावणा'वर का होतोय वाद, वाल्मिकी-तुलसीदासांनी कसं केलंय लंकापतीचे वर्णन? वाचा... By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2022 03:10 PM 2022-10-04T15:10:38+5:30 2022-10-04T15:32:00+5:30
Aadipurush Movie: एखादा नवीन चित्रपट आला आणि वाद झाला नाही, असे होऊच शकत नाही. दिग्दर्शक ओम राऊतचा 'आदिपुरुष' चित्रपटही वादात सापडला आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खानला पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लंकापती रावण कसा दिसायचा? रावणाचे व्यक्तिमत्व कसे होते? बॉलिवूडचा मेगाबजट चित्रपट 'आदिपुरुष'चे टीझर रिलीज होताच, या प्रश्नांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 'तान्हाजी' फेम दिग्दर्शक ओम राउतच्या या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत अभिनेता सैफ अली खानला दाखवण्यात आले आहे. टीझर पाहून अनेकांना रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आवडलेला नाही. तसेच, त्याच्या लूकवरुनही मोठी टीका होत आहे.
चित्रपटात रावणाला ज्या पद्धतीने दाखवण्यात आलंय, त्यावर काही हिंदू संघटनांनी अक्षेप घेतला आहे. चित्रपटात प्रकांड पंडित रावणाच्या कपाळावर गंध लावण्यात आले नाही. काहीजण केसांच्या स्टाईलवर आणि डोळ्यात लावलेल्या काजळावरही अक्षेप घेत आहेत. परंतू, टीझरमध्ये नीट पाहिल्यावर, काही दृष्यांमध्ये रावणाच्या कपाळावर गंध लावलेले दिसत आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष आचार्य चक्रपाणी यांनी शिवतांडव स्तोत्राची रचना करणाऱ्या रावणाला गंधाशिवाय दाखवण्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच, त्यांनी रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान अलाउद्दीन खिलजी दिसत असल्याचे म्हटले.
रावणाला टीव्ही स्क्रीनवर जीवंत करण्याचे श्रेय रामायण सीरियलचे निर्माते रामानांद सागर यांना जाते. तसेच, रावणाच्या भूमिकेतील अरविंद त्रिवेदी यांनी रुबाब, गंभीर आवाज आणि शिवतांडव स्तुतीने, हे पात्र अजरामर केले आहे. अरविंद त्रिवेदी यांना पाहून, रावण असाच दिसत असावा, असे आताही अनेकांना वाटते. गेल्या तीन दशकांपासून लोकांच्या मनात रावणाच्या याच पात्राने घर केले आहे. या काळात अनेकांनी रावणाची भूमिका साकारली, पण अरविंद त्रिवेदी यांच्यासारखे काम कोणीच करू शकले नाही.
फिल्म आदिपुरुषचे टीझर रिलीज झाल्यानंतर सैफ अली खानचे पात्र चर्चेत आले आहे. आपण हिंदू ग्रंथांवर चर्चा केली, तर वाल्मिकींच्या रामायणात रावणाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. वाल्मिकींचे दिसणे आणि त्यांच्या गुणांची स्तुती करताना, त्याला चार वेदांचा ज्ञानी आणि प्रकांड पंडित म्हटले आहे. जेव्हा हनुमानाला रावणाच्या दरबाराज हजर केले जाते, तेव्हाच्या दृष्यामध्ये वाल्मिकींनी रावणाचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे.
"अहो रूपमहो धैर्यमहोत्सवमहो द्युति:। अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता॥" म्हणजे- रावणाला पाहताच हनुमान मंत्रमुग्ध होतो आणि म्हणतो, रूप, सौंदर्य, धैर्य, कांती असलेल्या रावणात अधर्म नसता, तर हा देवलोकाचा स्वामी झाला असता. आदिकवी वाल्मीकींच्या रामायणात अनेक ठिकाणी राक्षसराजा रावणाच्या चरित्राचे वर्णन केले आहे. त्यांनी रावणाचे ऐश्वर्य, यश आणि पराक्रमाची प्रशंसा केली आहे.
तुलसीदास यांनीही रावणाच्या चरित्राचे वर्णन 'राम चरीतमानस'मध्ये केले आहे. रावण जेव्हा अशोक वाटिकेत माता सीतेला भेटायला येतो, तेव्हाच्या प्रसंगाचे वर्ण करताना तुलसीदास लिहितात, "तरु पल्लव महँ रहा लुकाई। करइ बिचार करौं का भाई तेहि अवसर रावनु तहँ आवा। संग नारि बहु किएँ बनावा|" म्हणजे- रावण जेव्हा अशोक वाटिकेत आला, तेव्हा हनुमान झाडांमध्ये लपला होता. सीतेला भेटायला रावण एकटा न येता, अनेक स्त्रीयांना घेऊन आला होता. तुलसीदासांनी अनेक प्रसंगांमध्ये रावणाची प्रशंसा केली आहे.
'आदिपुरुष'च्या टीझरमध्ये रावणाच्या पात्राला अतिशय विचित्र आणि भयंकर दाखवण्यात आले आहे. टीझरमध्ये रावण एका वटवाघुळासारख्या पक्षावर बसलेला दाखवला आहे. पण, प्रत्यक्षात रावण पुष्पक विमानातून प्रवास करायचा. रावणाच्या पुष्पक विमानाबाबत वाल्मिकी लिहितात, 'पुष्पक ढगांप्रमाणे उंच, सोन्याने मढलेला आहे. तसेच, याला याला हंसांद्वारे ओढले जाते. याला अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आले आहे.'
रामायणात वाल्मिकी लिहितात, "तस्य ह्म्यर्स्य मध्यथ्वेश्म चान्यत सुनिर्मितम। बहुनिर्यूह्संयुक्तं ददर्श पवनात्मजः॥" रामचरित मानसमध्येही तुलसीदासांनीही पुष्पक विमानाची चर्चा केली आहे. लंका विजयानंतर श्रीरामाच्या अयोध्या वापसीचे वर्ण करताना तुलसीदास लिहितात, "चलत बिमान कोलाहल होई। जय रघुबीर कहइ सबु कोई। सिंहासन अति उच्च मनोहर। श्री समेत प्रभु बैठे ता पर।"
म्हणजेच, 'विमान उडताना मोठा आवाज होत आहे. लोक श्रीरामाचा जयघोष करत आहेत. विमानात एक उंचा सिंहासन आहे. त्यावर माता सीतेसह प्रभु रामचंद्र विराजमान आहेत.' अशाप्रकारे वाल्मिकी आणि तुलसीदारांच्या रामायणात रावणाचे वर्णन आहे. परंतू, सध्या ओम राउत 'आदिपुरुष'मधील रावणाच्या लूकवरुन टीकेचा धनी झाला आहे. अद्याप यावर चित्रपट निर्मात्यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.