1 योजना 3 फायदे! घरात ठेवलेलं सोनं लावा कामाला, कमावून देईल बंपर पैसा; सरकार देतंय 'गॅरंटी'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 08:15 PM2023-12-08T20:15:30+5:302023-12-08T20:26:14+5:30

याच बरोबर, आपले दागिनेही सुरक्षित राहतील, या काळात सोन्याच्या वाढत्या किंमतीचाही फायदा मिळेल, तसेच आपल्याला झालेल्या कमाईवर कुठल्याही प्रकारचा टॅक्सदेखील लागणार नाही.

घरात ठेवलेले सोने विकून अथवा त्यावर गोल्‍ड लोन घेऊनच पैसे कमावता येतात, एवढेच लोकांना माहीत आहे. मात्र, असे नाही. कारण सरकारने एक अशी योजना सुरू केली आहे, ज्यात आपण घरात ठेवलेले सोने कामाला लावून दर महिन्याला पैसे कमावू शकता. याच बरोबर, आपले दागिनेही सुरक्षित राहतील, या काळात सोन्याच्या वाढत्या किंमतीचाही फायदा मिळेल, तसेच आपल्याला झालेल्या कमाईवर कुठल्याही प्रकारचा टॅक्सदेखील लागणार नाही.

या योजनेचे नाव आहे 'गोल्‍ड मोनेटायझेशन स्‍कीम' (Gold Monetisation Scheme). ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत कुणीही व्यक्ती घरात ठेवलेले सोन्याचे दागिने, गोल्ड बार अथवा सोन्याचे कॉइन्स बँकेत जमा करून सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा लाभ घेऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, सोन्याच्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

अशी आहे योजनेची खासियत - गोल्‍ड मॉनेटायझेशन स्‍कीममध्ये सोने जमा करणाऱ्यांना सरकारकडून व्याजाची गॅरंटी मिळते. यावर दरवर्षी व्याज दिले जाते. तसेच सोन्याचा दरही बाजार भावाप्रमाणे वाढत जातो. जर आपण मॅच्‍युरिटीवर आपले सोने काढले तर, आपल्याला सोन्याच्या वाढलेल्या किंमती बरोबरच, दर वर्षी मिळालेले व्याजही मिळते. योजनेच्या कालावधीनुसार, यावर व्याज दिले जाते.

किती मिळते व्याज? - या योजनेत गुंतवणुकीच्या कालावधीप्रमाणे व्याज दिले जाते. ही योजना तीन भागांत विभागलेली आहे. शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट योजनेंतर्गत 1 ते 3 वर्षांसाठी योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. यावर बँक आपल्या पद्धतीने व्याज देते.

मेडियम टर्मसाठी 5 ते 7 वर्षांपर्यंत आपण गोल्‍ड जमा करू शकता. यावर वर्षाला 2.25 टक्के एवढे निश्चित व्याज मिळते. लाँग टर्मच्या योजनेत आपण 12 ते 15 वर्षांसाठी आपले सोने जमा करू शकता. आपल्याला यावर वर्षाला 2.5 टक्के एवढे निश्चित व्याज मिळते.

असा घेऊ शकता योजनेचा लाभ - - सर्वप्रथम बँकेत गोल्‍ड डिपॉझिट अकाउंट ओपन करा आणि KYC पूर्ण करा. - बँकेकडून ग्राहकांसोरच सोन्याच्या शुद्धतेची तपासणी केली जाईल आणि 995 गोल्‍ड फिटनेस सर्टिफिकेट जारी केले जाईल. - यानंतर, बँकेकडून ग्राहकांना त्याच दिवशी अथवा 30 दिवसांच्या आत शॉर्ट टर्म अथवा मीड टर्म डिपॉझिट स्‍कीमचे सर्टिफिकेट दिले जाईल.

- या जमा करण्यात आलेल्या सोन्यावर आपल्याला 30 दिवसांनंतर, व्याज मिळणे सुरू होईल. - किमान 10 ग्रॅम गोल्‍डपासून याची सुरुवात केली जाऊ शकते. तसेच यासाठी कसल्याही प्रकारची कमाल मर्यादा नाही.

मॅच्‍युरिटीवर सोनं मिळणार की पैसा? - या योजनेचा सर्वात मोठी मायनस पॉइंट म्हणजे, मॅच्युरिटीवर ग्राहकांना जमा करण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या बदल्यात रोख रक्कम दिली जाते. मात्र, अल्प मुदतीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना मॅच्युरिटीनंतर, दागिने अथवा पैसे घेण्यासंदर्भात पर्याय मिळतो. तर, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना मॅच्युरिटीवर त्यांच्या सोन्या ऐवजी, त्याच्या मूल्‍या एवढे पैसे दिले जातात.

टैक्‍समध्येही दुहेरी सूट - या योजनेची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमा केलेल्या सोन्यावर कॅपिटल गेन टॅक्स आकारला जाणार नाही. अर्थात सोन्यावर मिळणारे व्याज आणि सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे होणारा नफा हे दोन्ही टॅक्सच्या कक्षेत येणार नाहीत.

अशा प्रकारे या योजनेत अपले सोने जमा करणाऱ्या ग्राहकांना तीन प्रकारचे फायदे मिळतील. एक म्हणजे, संबंधित ग्राहकाची ज्‍वैलरी सुरक्षित रहावी म्हणून लॉकरमध्ये जमा करावी लागणार नाही. दुसरे म्हणजे, यावरील व्याजही पूर्ण मिळेल. तिसरे म्हणजे यावर टॅक्सदेखील लागणार नाही.

(टीप - येथे केवळ योजनेसंदर्भातील सर्वसामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कसल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)