१५-१५-१५ हा नियम फॉलो केला तर तुम्ही बनू शकता कोट्यधीश; जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 01:38 PM2022-04-17T13:38:20+5:302022-04-17T13:47:17+5:30

तुम्ही अलीकडेच जॉब ज्वाइन केला आहे अथवा स्वत:चा नवा उद्योगधंदा सुरू केला आहे? तुम्ही चांगले रिटर्न आणि गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर म्युच्युअल फंडाद्वारे गुंतवणूक करून तुम्ही आयुष्यात चांगली कमाई करू शकता.

किरकोळ गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना १५-१५-१५ चा नियम पाळल्यास, ठराविक वेळेत तुम्ही करोडपती होऊ शकता.

१५-१५-१५ नियम समजून घ्या, ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि सीईओ पंकज मठपाल म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने योग्य फंडांमध्ये शिस्तबद्ध रीतीने दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्याला चांगला परतावा मिळू शकतो.

१५-१५-१५ चा नियम स्पष्ट करताना ते म्हणाले की, १५-१५-१५ म्हणजे दर महिन्याला गुंतवायची रक्कम, वेळ आणि व्याजदर याबाबत आहे. समजा एखादी व्यक्ती १५ वर्षांसाठी दरमहा १५,००० रुपये गुंतवल्यास आणि सरासरी वार्षिक १५ टक्के परतावा मिळाल्यास तो करोडपती होऊ शकतो.

मठपाल यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने १५ वर्षे दरमहा १५ हजार रुपये जमा केले तर त्याला एकूण २७ लाख रुपये गुंतवावे लागतील हे अगदी स्पष्ट आहे. परताव्याचा वार्षिक सरासरी दर १५ टक्के असल्यास, त्याला २७ लाखांच्या गुंतवणुकीवर १५ वर्षांत एकूण ७४,५२,९४६ रुपये परतावा मिळू शकेल.

अशा प्रकारे त्याच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य १.०१ कोटी रुपये होईल. मठपाल सांगतात की, १५००० रुपये दरमहा गुंतवणुकीला सुरुवात केल्यानंतर, जर एखाद्या व्यक्तीने वाढत्या उत्पन्नावर गुंतवणुकीची रक्कम वाढवली, तर तो १५ वर्षे पूर्ण होण्याआधीच कोट्यधीश होण्याचे ध्येय गाठू शकतो.

फायनान्शियल प्लॅनर्स सांगतात की, तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केल्यावर तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही १५ ऐवजी २० वर्षांसाठी १५००० रुपये गुंतवत राहिल्यास, तुम्हाला २० वर्षांनंतर १५ टक्के दराने २.२७ कोटी रुपये मिळतील. म्हणजे आणखी पाच वर्षे गुंतवल्यानंतर तुम्हाला मिळणारी रक्कम दुप्पट झाली आहे.

असोसिएशन ऑफ म्यूचुअल फंड्स इन इंडियाने (AMFI) शुक्रवारी आपले आकडे जारी केले. या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात १९७०५ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे. तर जानेवारी महिन्यात हा आकडा १४८८८ कोटी रुपये एवढा होता.

रशिया-युक्रेन युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे फेब्रुवारीच्या अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला बाजारात मोठी अस्थिरता होती. यानंतरही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढली आहे. तसेच, SIP योगदानदेखील मार्च महिन्यात वाढून १२३२८ कोटी रुपयांवर गेली आहे.

हे फेब्रुवारीतील ११४३८ कोटी रुपयांपेक्षा सुमारे ८ टक्के अधिक आहे. मार्च २०२२ मध्ये सर्व श्रेणींमध्ये गुंतवणूक आली आहे. ८ हजार १७० कोटी रुपयांच्या निव्वळ गुंतवणुकीसह मल्टी-कॅप फंड श्रेणीत सर्वाधिक पैसा आला. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये गुंतवणुकीत ४४ टक्के एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे.