१७ वेळा अपयश, पण हार मानली नाही; हजारो लोकांना दिली नोकरी, उभी केली ४० हजार कोटींची कंपनी By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:29 AM 2024-01-22T09:29:49+5:30 2024-01-22T09:39:29+5:30
जर तुमच्या मनात काही मोठं करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर यश हे तुम्हाला मिळतंच. याचंच उदाहरण म्हणजे अंकुश सचदेवा. जर तुमच्या मनात काही मोठं करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर यश हे तुम्हाला मिळतंच. याचंच उदाहरण म्हणजे अंकुश सचदेवा. अंकुश यांनी आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर काम करायला सुरुवात केली आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली. पण, त्यांना नोकरीत रस नसल्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी एकामागून एक १७ आयडियाजवर काम केलं, परंतु त्यांच्या हाती अपयश आलं.
अंकुश सचदेवा यांनी आपलं काम सुरू करण्यासाठी १७ स्टार्टअपमध्ये हात आजमावला. एकापाठोपाठ सर्वांमध्येच त्यांना अपयश आलं. पण अंकुश यांनी हार मानली नाही.
अखेर १८ व्यांदा त्यानं आपल्या दोन मित्रांसह असं काही केलं की आज हजारो कोटींची कंपनी स्थापन झाली. त्यांचा व्यवसाय अमेरिका आणि युरोपसह जगातील सर्व देशांमध्ये पसरला आहे आणि त्यांचे लाखो युझर्सही आहेत.
१८ व्या प्रयत्नात अंकुश सचदेवा यांनी त्याच्या दोन आयआयटीच्या मित्रांचीही मदत घेतली. फरीद अहसान आणि भानू सिंग यांच्यासोबत त्यांनी शेअरचॅट अॅप (Sharechat App) तयार केलं. या तिघांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर काही युजर्स शोधले ज्यांना काहीतरी नवा अनुभव घ्यायचा होता.
यानंतर, जानेवारी २०१५ मध्ये, शेअरचॅटची मूळ कंपनी मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेडची (Mohalla Tech Pvt Ltd) स्थापना झाली. यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये शेअरचॅट लॉन्च करण्यात आलं. सुरुवातीला हे हिंदी, मराठी, मल्याळम आणि तेलगू भाषांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.
ShareChat चे मुख्यालय बंगळुरू येथे आहे, परंतु या कंपनीनं आपला व्यवसाय अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांमध्ये पसरवला आहे. आज या अॅपचे कोट्यवधी युझर्स आहेत आणि कंपनीने जवळपास १००० लोकांना थेट नोकऱ्याही दिल्या आहेत. शेअरचॅटनं जून २०२२ मध्ये फंडिंग मिळवलं. त्यावेळी कंपनीची व्हॅल्यू ५ अब्ज डॉलर्स (४० हजार कोटी रुपये) पेक्षा जास्त असल्याचा अंदाज होता.
अंकुश सचदेवा यांनी २०१५ मध्ये आयआयटी कानपूरमधून पदवी मिळवली. यापूर्वी त्यांनी समरविले स्कूलमधून बारावी उत्तीर्ण केली होती. अंकुश यांनी मे ते जुलै २०१४ या कालावधीत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्न म्हणून काम केलं. अंकुश सध्या शेअरचॅटमध्ये सीईओ म्हणून काम करत आहे. कंपनीचे मूल्यांकनही आता ५० हजार कोटींच्या पुढे गेले आहे.