५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 11:13 IST2025-04-18T10:44:38+5:302025-04-18T11:13:47+5:30
unesco world heritage sites : गुजरातमधील या शहराला युनेस्कोने २०१७ मध्ये भारतातील पहिले जागतिल वारसा शहर असल्याचे घोषित केलं आहे. येथील पर्यटनस्थळे अद्भूत आहेत.

भारताला प्राचीन सिंधू संस्कृती लाभली आहे. येथील वास्तूशैली आणि संस्कृती जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. देशातील अनेक भागात अशी पर्यटनस्थळे आहेत, जी पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यातही काही राज्य याबाबतीत खूपच नशीबवान म्हणावी लागतील. गुजरात हे त्यापैकीच एक आहे. गुजरात सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये ३६.९५ लाखांहून अधिक पर्यटकांनी गुजरातमधील १८ वारसा स्थळांना भेट दिली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, या पर्यटकांमध्ये भारतीय आणि परदेशी दोघांचाही समावेश होता. या १८ स्थळांपैकी, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या ४ पर्यटनस्थळांना १२.८८ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांच्या आगमनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून रोजगार निर्माण झाला, असेही सरकारने म्हटले आहे.
यामध्ये हेरिटेज सिटी (वारसा शहर) अहमदाबादला ७.१५ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. पाटणमधील राणीची बारवला (पायऱ्या असलेली विहीर) ३.६४ लाख पर्यटकांनी भेट दिली. तर कच्छमधील धोलावीराला १.६ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. पंचमहल जिल्ह्यातील चंपानेर ४७,००० पर्यटकांनी पाहिले.
या चारही ठिकाणांना युनेस्कोने त्यांच्या स्थापत्य वैशिष्ट्य, इतिहास, जल व्यवस्थापन आणि कला आणि नगररचना यासारख्या वैशिष्ट्यांसाठी जागतिक वारसा दर्जा दिला आहे. २००४ मध्ये चंपानेर आणि लगतच्या पावागडला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला.
पावागड टेकडीवर असलेले कालिका मातेचे मंदिर हे ८ व्या शतकातील शासक वनराज चावडा यांनी बांधलेल्या 'शक्तीपीठांपैकी' एक आहे. चावडाच्या सैन्यातील सेनापती चंपानेर यांच्या नावावरून चंपानेर हे नाव पडले. रांकी वाव किंवा राणी की वाव उत्तर गुजरातमधील पाटण जिल्ह्यात आहे.
ही ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर ११ व्या शतकाच्या अखेरीस अनहिलवाड पाटणच्या सोलंकी राजवंशातील राजा मूलराज सोलंकी यांचा मुलगा भीमदेव यांची पहिली राणी उदयमती हिने बांधली होती. २०१४ मध्ये, युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. या पायऱ्यांच्या विहिरीचे जमिनीखाली सात मजले आहेत, जे दगडी कोरीवकाम आणि देवी-देवतांच्या मूर्तींनी सजवलेले आहेत.
२०१७ मध्ये, युनेस्कोने साबरमती नदीच्या पूर्वेकडील तीरावर वसलेल्या अहमदाबाद शहराला भारतातील पहिले जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले. कच्छ जिल्ह्यातील हडप्पा काळातील पुरातत्व स्थळ असलेल्या धोलावीराला २०२१ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. असे म्हटले जाते की ते ५,००० वर्ष जुन्या सिंधू संस्कृतीचा एक भाग आहे.
केंद्राच्या 'स्वदेश दर्शन २' योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा आणि इतर सुविधांच्या विकासासाठी ही जागा निवडण्यात आली आहे, तसेच द्वारकेचीही निवड याच योजनेअंतर्गत करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्य सरकारच्या हेरिटेज टुरिझम पॉलिसी २०२०-२५ अंतर्गत गुजरातमधील गावे आणि शहरांमध्ये असलेल्या हेरिटेज इमारती, राजवाडे आणि किल्ले पर्यटन स्थळे म्हणून विकसित केले जात आहेत.