नोकरदारांसाठी मोठी बातमी, 1 एप्रिलपासून कामाच्या तासांमध्ये होणार बदल, पीएफही वाढणार; जाणून घ्या मोदी सरकारचा प्लॅन By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 02:25 PM 2021-03-03T14:25:22+5:30 2021-03-03T14:37:40+5:30
modi government may applicable some changes regarding salary and pf from 1st april : कर्मचार्यांच्या पीएफमध्ये वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे त्यांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून केंद्र सरकार नोकरी करणार्यांसाठी मोठे बदल करू शकते. नोकरी करणाऱ्यांची ग्रॅच्युटी, पीएफ आणि कामाच्या तासांमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात.
अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे की, कर्मचार्यांच्या पीएफमध्ये वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे त्यांची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. याखेरीज कंपन्यांच्या बॅलेंस शीटमध्येही अनेक बदल केले जाऊ शकतात.
का होऊ शकतात बदल? गेल्या वर्षी संसदेत मंजूर झालेल्या कोड ऑन व्हेजेस बिलमुळे हे बदल होऊ शकतात. त्यामुळे येत्या 1 एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे. कोणते बदल होऊ शकतात, ते पाहा....
1) पगारात बदल होऊ शकतो सरकारच्या योजनेनुसार 1 एप्रिलपासून बेसिक पगार (सरकारी नोकऱ्यांमध्ये मूळ पगार आणि महागाई भत्ता) एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. या बदलामुळे नियोक्ता व कामगार दोघांनाही फायदा होईल, असा सरकारचा दावा आहे.
2) पीएफमध्ये होईल वाढ नवीन नियमांनुसार, तुमचा पीएफ वाढेल तर तुमच्या हाताचा पगार कमी होईल. मूळ पगार एकूण पगाराच्या 50 टक्के किंवा त्याहून अधिक व्हायला पाहिजे. या बदलानंतर बहुतेक लोकांच्या पगाराची रचना बदलू शकते. त्यामुळे तुमचा मूळ पगारामध्ये वाढल्यास पीएफ देखील वाढेल, कारण तो आपल्या मूळ पगारावर आधारित आहे.
3) 12 तास काम करण्याचा प्रस्ताव जास्तीत जास्त कामकाजाचे तास वाढवून 12 करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त 15 ते 30 मिनिटांपर्यंत अतिरिक्त काम करण्याला ओव्हरटाईममध्ये समावेश करण्याची तरतूद आहे. सध्या तुम्ही 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ काम केले तर ते ओव्हरटाइममध्ये मोजले जात नाही.
4) 5 तास काम केल्यानंतर अर्धा तासांचा ब्रेक 5 तासांहून अधिक वेळ सतत काम करण्यास बंदी असणार आहे. कर्मचार्यांना 5 तास काम केल्यानंतर अर्ध्या तासाचा ब्रेक दिला पाहिजे, असे सरकारचे म्हणणे आहे.
5) निवृत्तीनंतर होईल फायदा पीएफची रक्कम वाढल्यास सेवानिवृत्तीची रक्कमही वाढेल. सेवानिवृत्तीनंतर लोकांना या रकमेमधून बरीच मदत मिळेल. पीएफ आणि ग्रॅच्युटी वाढल्यास कंपन्यांचा खर्चही वाढेल कारण त्यांनाही कर्मचार्यांना पीएफमध्ये अधिक वाटा द्यावा लागेल.