तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 09:22 AM2024-09-21T09:22:01+5:302024-09-21T09:35:38+5:30

Tirupati Laddu Prasadam Controversy News: देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणारा लाडू वादाचा मुद्दा ठरत आहे.

Tirupati Laddu Prasadam Controversy News: देशातील सर्वांत श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणारा लाडू वादाचा मुद्दा ठरत आहे. तिरुमला तिरुपती मंदिरात दिल्या जात असलेल्या लाडू प्रसादात जनावरांची चरबी आणि माशांचे तेल वापरण्यात आल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला. यानंतर आता यावरून देशभरात चर्चांना उधाण आलं आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विद्यमान सत्ताधारी सरकारनं आधीच्या जगनमोहन रेड्डी सरकारला जबाबदार धरलं आहे. या प्रकरणी केंद्रानं हस्तक्षेप करावा, अशी मागणीही होत आहे. दुसरीकडे लाडूविक्रीतून वर्षाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील पवित्र भगवान वेंकटेश्वर मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसाद आपल्या अनोख्या चवीसाठी प्रसिद्ध आहे. हे लाडू मंदिराच्या स्वयंपाकघरात तयार केले जातात. हे पोटू या नावाने ओळखले जातात. या लाडूंची रेसिपी त्याच्या प्रदीर्घ इतिहासात केवळ सहा वेळा बदलण्यात आली आहे. मुळात बेसन आणि गुळाच्या पाकाचा वापर करून ते तयार केले जाते. त्यांची चव वाढवण्यासाठी आणि त्यांचे पोषण वाढविण्यासाठी नंतर बदाम, काजू आणि मनुका सारखे ड्रायफ्रूट्स घातले गेले.

तिरुमलामध्ये दररोज सुमारे ३ लाख लाडू बनवले आणि वितरित केले जातात. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या लाडूंच्या विक्रीतून वर्षाला सुमारे ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळतं. प्रत्येक लाडूचे वजन १७५ ग्रॅम इतकं असते.

तिरुपती मंदिरातील लाडूंचा इतिहास ३०० वर्षांहून अधिक जुना आहे. त्यांची सुरुवात १७१५ मध्ये झाली. २०१४ मध्ये तिरुपतीच्या लाडूला जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) दर्जा देण्यात आला होता. लाडूंचा दर्जा राखण्यासाठी फूड लॅबोरेटोरी आहे. लाडूंमध्ये काजू, साखर, वेलची अशा नेमक्या किती गोष्टी घातल्या जातात, याची प्रत्येक बॅचची बारकाईनं तपासणी केली जाते.

प्राप्त माहितीनुसार, ए. आर. डेअरी फुड्सकडून तिरूपती देवस्थान ३२० रुपये किलो या दराने तूप खरेदी करीत होते. मात्र, तुपात भेसळ आणि बाह्य चरबी असल्याचे आढळल्यानंतर या डेअरीला काळ्या यादीत टाकण्यात आले. त्यानंतर कर्नाटकातून ४७५ रुपये प्रतिकिलो दराने तूपखरेदी होत आहे. ज्यावेळी बाजारात सुमारे ५०० रुपये किलो असा तुपाचा दर होता, त्यावेळी गेल्या सरकारनं भेसळयुक्त, घाणेरडं तूप विकत घेतल्याचा आरोप मुख्यमंत्री नायडू यांनी केला.

उच्च न्यायालयात याचिका : लाडूच्या प्रसादात कथितरीत्या प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्यावरून निर्माण झालेला वाद पाहता, यातील सत्य बाहेर यावे म्हणून वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या तत्काळ हस्तक्षेपासाठी ‘लंच मोशन’ याचिका दाखल केली आहे. यावर २५ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.