Mutual Fund Investment : वर्षभरात ५१ टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न; 'या' Mutual Fund स्कीमनं १० लाखांचे बनवले १५ लाख By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 10:24 AM 2024-11-12T10:24:33+5:30 2024-11-12T10:34:33+5:30
Mutual Fund Investment : आजकाल अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूकीकडे वळताना दिसताहेत. या म्युच्युअल फंडानं केवळ वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. Mutual Fund Investment : आजकाल अनेक जण भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूकीकडे वळताना दिसताहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही अधिक जोखमीची असली तरी त्यात मिळणारा परतावा अधिक असल्यानं लोक याकडे वळत आहे. गुंतवणूकीचा पारंपारिक प्रकार सोडून गुंतवणूकदार याकडे वळताना दिसताहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये म्युच्युअल फंडात वाढलेली गुंतवणूक याचंच उदाहरण आहे.
म्युच्युअल फंडांवरील सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा विश्वास सातत्यानं वाढत आहे. इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये ४१,८८७ कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली. दर महिन्याच्या आधारावर ही २१.७ टक्क्यांची वाढ आहे. एसआयपीचा ओघ ही सप्टेंबरमध्ये २४,५०९ कोटी रुपयांवरून ऑक्टोबरमध्ये २५,३२३ कोटी रुपयांवर पोहोचला.
म्युच्युअल फंडात तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून मासिक गुंतवणुकीव्यतिरिक्त एकरकमी गुंतवणूक ही करू शकता. आज आम्ही तुम्हाला एका म्युच्युअल फंड योजनेबद्दल सांगणार आहोत ज्याच्या डायरेक्ट प्लॅननं गेल्या १ वर्षात ५१.५६ टक्के परतावा दिलाय.
क्वांट मॅन्युफॅक्चरिंग फंड हा एक सेक्टोरल फंड आहे, ज्याच्या डायरेक्ट प्लॅनमुळे गेल्या १ वर्षात गुंतवणूकदारांना ५१.५६ टक्के परतावा मिळालाय. अशा प्रकारे या योजनेत वर्षभरापूर्वी १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचं मूल्य १५.१५ लाख रुपये झालं आहे.
क्वांट मॅन्युफॅक्चरिंग फंडाची सध्याची एनएव्ही १६.४६ रुपये आहे. आकडेवारीनुसार, या म्युच्युअल फंड योजनेची सध्याची फंड साईज १०९० कोटी रुपये आहे. या फंडाच्या प्रमुख होल्डिंग कंपन्यांमध्ये आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, संवर्धन मदरसन इंटरनॅशनल, ग्रासिम इंडस्ट्रीज आदी बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
क्वांट मॅन्युफॅक्चरिंग फंड ऑगस्ट २०२३ मध्ये लाँच करण्यात आला होता. लाँचिंगनंतर या फंडानं एकूण ५१.३० टक्के परतावा दिला आहे. फंडानं गेल्या ६ महिन्यांत १०.६० टक्के आणि गेल्या १ महिन्यात ५.७० टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.
रिटेल फोलिओंची संख्या १७.२३ कोटींच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचली आहे. एसआयपी खात्यांमध्ये सातत्यान होत असलेली वाढ याला मोठा हातभार लावत होती. एसआयपी खात्यांची संख्या आता १०.१२ कोटींच्या पुढे गेली असल्याची प्रतिक्रिया म्युच्युअल फंड गुंतवणुकीची आकडेवारी शेअर करताना एएमएफआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट चलसानी यांनी दिली.
(टीप : यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)