भारतात 6 अणुऊर्जा प्रकल्प उभारले जाणार; रशिया मदत करणार, मोदी-पुतिन यांची 9 करारांवर स्वाक्षरी... By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 10:58 AM 2024-07-10T10:58:18+5:30 2024-07-10T11:03:04+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमधील 9 करारांवर स्वाक्षरी झाली. Narendra Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच रशियाचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमधील 9 करारांवर स्वाक्षरी झाली. यात नवीन 6 अणुउर्जा प्रकल्पांचाही समावेश आहे. रशियाच्या मदतीने भारतात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. रशियाची अणुऊर्जा एजन्सी Rosatom प्रकल्प उभारण्यासाठी भारताला मदत करेल. एजन्सीने यापूर्वी कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्लांट (KKNPP) उभारण्यात मदत केली आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात मॉस्को येथे विविध विषयांवर विस्तृत चर्चा झाली. यादरम्यान Rosatom ने भारताला सहा नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यास मदत करण्याची ऑफर दिली. याशिवाय रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडने भारतासोबत फार्मा, जहाजबांधणी आणि शिक्षण क्षेत्राबाबत करार केले. Rosatom ने एका निवेदनात म्हटले की, भारतासोबत अणुउर्जा प्रकल्पाबाबत चर्चा झाली. यानुसार, भारतात रशियन डिझाइनचे 6 हाय पॉवर अणुउर्जा प्रकल्प आणि काही लहान अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, या वर्षी मे महिन्यात रोसाटॉमने भारताला फ्लोटिंग न्यूक्लियर पॉवर प्लांट (FNPP) बांधण्यासाठी आणि ऑपरेट करण्यासाठीचे तंत्रज्ञान देण्याची ऑफर केली आहे. विशेष म्हणजे, पाण्यावर तरंगणारा अणुऊर्जा प्रकल्प असलेला रशिया हा जगातील एकमेव देश आहे. अकादमिक लोमोनोसोव्ह जहाजावर हा अणुप्रकल्प तयार करण्यात आला आहे. रशियातील पेवेकमधील वीजपुरवठा या तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पातून केला जातो. रशियाशिवाय अन्य कोणत्याही देशाला अद्याप तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पाचे तंत्रज्ञान विकसित करता आलेले नाही. या प्रकारच्या प्लांटमधून अगदी दुर्गम भागात किंवा समुद्रात वसलेल्या बेटांनाही अखंडित वीजपुरवठा करता येतो.
रशिया आणि भारताने उत्तरेकडील सागरी मार्गाचा विकास करण्यावरही चर्चा केली. हा सागरी मार्ग रशिया-नॉर्वे सीमेजवळील मुर्मन्स्कपासून पूर्वेकडे अलास्काजवळील बेरिंग सामुद्रधुनीपर्यंत पसरलेला आहे. हा सागरी मार्ग विशेषतः रशियन तेल, कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी महत्त्वाचा आहे. रशियाला 2030 पर्यंत NSR द्वारे 150 दशलक्ष मेट्रिक टन वाहतूक करण्याची आशा आहे.
कुडनकुलम न्यूक्लियर पॉवर प्लांट भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा केंद्र आहे. हा तमिळनाडू राज्यातील तिरुनेलवेली जिल्ह्यातील कुडनकुलम येथे आहे. भारत आणि रशिया यांच्यातील करारानुसार या प्लांटच्या पहिल्या दोन युनिटचे बांधकाम सुमारे दोन दशकांपूर्वी (31 मार्च 2002) सुरू झाले, परंतु स्थानिक मच्छिमारांच्या विरोधामुळे यात विलंब झाला. या अणुऊर्जा प्रकल्पात रशियन बनावटीच्या VVER-1000 अणुभट्ट्या वापरल्या आहेत.
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पातून 6000 मेगावॅट वीज निर्मितीची योजना आहे. रशियन सरकारी कंपनी Atomstroyexport आणि Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) यांच्या सहकार्याने या प्लांटमध्ये सहा VVER-1000 अणुभट्ट्या बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी दोन अणुभट्ट्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि येथून वीजनिर्मितीही केली जाते.