६ वर्षात ५ बिझनेस फेल, २ कोटी नुकसान तरीही हार मानली नाही; 'हा' युवक आता काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 09:00 IST2025-02-18T08:52:31+5:302025-02-18T09:00:12+5:30

विक्रम पै नावाचा युवक आज यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपाला आला असला तरी त्याच्या यशाचा मार्ग सोपा नव्हता. यशाच्या शिखरावर पोहचण्यापूर्वी विक्रमनं अनेकदा अपयश पचवलं आहे. विक्रम पै रेफररश नावाच्या ई कॉमर्स रेफरल सेल्स प्लॅटफोर्मचा संस्थापक आणि सीईओ आहे.

हा एक असा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो व्यवसायिकांना त्यांच्या ग्राहकांच्या माध्यमातून नवीन ग्राहक मिळवण्यासाठी मदत करतो. रेफरल मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणजे एखाद्या व्यवसायाचे सध्याचे ग्राहक कंपनीच्या उत्पादनाबद्दल आणि सेवांबाबत दुसऱ्याला सांगतात. कंपनी त्यासाठी या ग्राहकांना प्रोत्साहन देते. ग्राहकांना कमिशन दिले जाते.

बंगळुरूमधील उद्योगक विक्रम पै याने ReferRush नावानं ई कॉमर्स रेफरल सेल्स कंपनी सुरू केली. विक्रम याने त्याच्या मागील व्यवसायात बऱ्यादचा अपयशाचा सामना केला. आर्थिक तंगी आणि आजारपणामुळे निर्माण होणारी आव्हाने पेलून अखेर रेफररश नावाचा उद्योग उभा केला.

६ वर्षात ५ व्यवसाय अयशस्वी ठरले, जवळपास २ कोटींचे नुकसान सहन करावे लागले. ६ वर्ष सातत्याने अपयश पचवणाऱ्या विक्रम पै याने कधीही हार मानली नाही. एक वेळ अशीही आली जेव्हा त्याच्याकडे फक्त ४ हजार शिल्लक होते. त्यामुळे त्याला सहव्यवस्थापकाला वेतनही देता येत नव्हते.

एलन मस्कसारखं बनायचा हा प्रयत्न करतोय असा टोमणा काहींनी विक्रमला मारला. विक्रमच्या शरीरानेही त्याला साथ दिली नाही. त्याच्या शरीराचा काही भाग लकवाग्रस्त झाला होता. मित्रांनीही संकटकाळात मदत केली नाही या सर्व संकटावर मात करून विक्रमने पुन्हा जिद्दीने उभं राहण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.

विक्रमने अलीकडेच सोशल मीडियात त्याची कहाणी शेअर केली. सर्वात कठीण काळात त्यांच्याकडे ४ हजार उरले होते. कर्मचाऱ्यांना पगारही देता येत नव्हता. मित्रांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली होती. माझा स्वत:वरचा आत्मविश्वासही मी गमावून बसलो होतो. माझ्याकडे खायला होते आणि राहण्यासाठी घर होते, बस्स, मला तेवढेच हवे होते असं विक्रमने सांगितले.

अखेर नशीबाने विक्रमच्या मेहनतीला साथ दिली. विक्रमच्या रेफररश कंपनीला निखील कामत याच्या कंपनीने इनिशिएटिव्ह फंडिंगसाठी निवडले. २४०० कंपन्यांमधून विक्रमच्या कंपनीची निवड अनुदानासाठी झाली. ReferRush पहिले १ लाख कमावण्यासाठी ४ महिन्याचा कालावधी लागला परंतु आता कंपनी दरदिवशी १.५ लाख कमाई करत आहे.

ReferRush ही एक रेफरल मार्केटिंग कंपनी आहे. ही ई कॉमर्स ब्रँड्सना त्यांच्या ग्राहकांकडून रेफरल मिळवण्यासाठी मदत करते. एक दिवस असा येईल जेव्हा प्रत्येक ई कॉमर्स ब्रँड ReferRush चा वापर करेल असा विश्वास विक्रम पै याने व्यक्त केला.

सुरुवातीचे ५ वर्ष शिकण्यात गेले असं विक्रम सांगतो. विक्रमची कहाणी अशा युवकांसाठी प्रेरणादायी आहे जे अपयश आलं म्हणून खचून जातात. मेहनतीत सातत्य ठेवले आणि आत्मविश्वास असेल तर काहीही शक्य आहे

विक्रम पै ची यशोगाथा संघर्ष, धैर्य आणि आत्मविश्वास याचं जिवंत उदाहरण आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यातून काहीतरी धडा घेऊन पुढे वाटचाल करायची ही शिकवण विक्रमच्या यशाकडे पाहून मिळते. जर तुमच्या मुलभूत गरजा पूर्ण असतील तर तुम्ही तुमचे स्वप्न साकार करू शकता असं विक्रमने सांगितले.