9 कोटी लोकांच्या नोकऱ्या संकटात! कोणत्या नोकऱ्या सुरक्षित; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिपोर्ट आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 19:45 IST2025-01-09T19:37:00+5:302025-01-09T19:45:09+5:30

Future of Jobs Report 2025 of World Economic Forum: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा फ्यूचर ऑफ जॉब्स २०२५ हा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या संकटात आहेत आणि कोणत्या नोकरदारांच्या नोकर्‍या सुरक्षित आहेत, याबद्दल भाष्य करण्यात आले आहे.

Future of Jobs Report 2025 News: वेगाने विकसित होत चाललेले तंत्रज्ञान आणि बदल यामुळे आगामी काळ कसा असेल, याबद्दल सतत चर्चा होत आहेत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे काही क्षेत्रातील नोकऱ्या जातील, तर नव्या क्षेत्रात रोजगार निर्मिती होईल, असे म्हटले जाते. याच विषयावर आता वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट २०२५ आला आहे. त्यात या दशकात (२०३०) जागतिक पातळीवर १७० मिलियन म्हणजे १७ कोटी नवीन नोकरीच्या संधी निर्माण होतील, असे म्हटले आहे.

अनेक क्षेत्रात नोकऱ्या घटतील, असा अंदाज या रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आला असून, बदलत्या काळामुळे तब्बल ९२ मिलियन नोकऱ्या कायमच्या संपतील, असेही म्हटले आहे. हे तंत्रज्ञानातील बदल, आर्थिक आणि डेमोग्रॅफिक बदलांमुळे होईल.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक २० ते २५ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होणार आहे. या बैठकीपूर्वी हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. नवनव्या तंत्रज्ञानामुळे २०३० पर्यंत नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. जगभरातील उद्योगांमध्ये आणि सेवाक्षेत्रात हे परिवर्तंन होईल, असे म्हटले आहे.

२०३० पर्यंत ९२ मिलियन नोकऱ्या संपतील, असे म्हटलेले असले, तरी विकसनशील मजूर क्षेत्रातील १०९० मिलियन नोकऱ्यांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. शेतमजूर, मजूर, हलकी वाहनांचे चालक, सॉफ्टवेअर आणि अॅप्लिकेशन डेव्हलपर्स, बिल्डिंग फ्रेमर्स, फिनिशर्स, नर्सिंग प्रोफेशनल्स, वेटर्स, प्रोजेक्ट मॅनेजर, विद्यापीठे आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक या क्षेत्रातील रोजगार कायम राहतील असे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.

या रिपोर्टमध्ये कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या संपतील याबद्दलही नमूद करण्यात आले आहे. यात कॅशिअर्स आणि तिकीट क्लार्क, प्रशासकीय सहायक आणि कार्यकारी सचिव, बिल्डिंग केअरटेकर, क्लीनर आणि हाऊसकीपर, मेटरिअल रिकॉर्डिंग आणि स्टॉक कीपिंग क्लार्क, प्रिंटिंग आणि त्याच्याशी संबंधित मजूर, अकाऊंटिंग, बुक कीपिंग आणि पेरॉल क्लार्क, अकाऊंटंट आणि ऑडिटर, परिवहन वाहन आणि कंडक्टर, सुरक्षा रक्षक, बँक टेलर आणि संबंधित क्लार्क, डेटा एन्ट्री क्लार्क, ग्राहक सूचना आणि ग्राहक सेवेतील कर्मचारी, ग्राफीक डिझायनर, व्यावसायिक सेवेतील नोकऱ्या आणि परीक्षक यांच्या नोकऱ्या संपतील, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

भविष्यात ज्या नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी लोकांना नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील, असेही यात म्हटले गेले आहे. सातत्याने शिक्षक राहणे, कौशल्ये विकसित करणे आणि जुनी कौशल्यात सुधारणा करत राहणे, यावर नोकरदारांना लक्ष्य द्यावे लागेल. येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्य नोकरी टिकण्यात खूप महत्त्वाचे ठरतील, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि बिग डेटा, नेटवर्क आणि सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान साक्षरता, तंत्रज्ञान कौशल्यांसोबत सृर्जनात्मक विचार क्षमता, उत्साह, नव्या गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा आणि शिकण्याचा वेग या गोष्टी पुढच्या काळात लक्षात घेतल्या जातील, असे या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.