मूर्तींची ७० तर सुब्रह्मण्यन यांची ९० तासांची डिमांड; कोणत्या देशात कर्मचाऱ्यांना सर्वाधिक कमी काम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:06 IST2025-01-10T15:59:48+5:302025-01-10T16:06:37+5:30
sn subrahmanyan : कामाच्या तासांवरुन देशात सोशल वॉर सुरू झाला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याची सूचना केली होती, पण एल अँड टीचे प्रमुख एसएन सुब्रमण्यन यांनी ९० तास काम करण्याचे समर्थन केलं आहे.

देशातील कार्य-संस्कृती आणि उत्पादकता यावरुन सोशल मीडियावर युद्ध छेडलं गेलंय. कार्पोरेट क्षेत्रातील २ दिग्गज व्यक्तींनी केलेली वक्तव्य याला कारणीभूत ठरली आहेत.
गेल्या वर्षी पहिल्यांना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी एका मुलाखती दरम्यान कामाच्या तासाबद्दल आपलं मत मांडलं होतं. देशातील तरुणांनी आठवड्यात ७० तास करायला हवं असं मूर्ती म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून भरपूर टीका झाली. मात्र, त्यानंतरही ते आपल्या मतावर ठाम राहिले.
हा वाद ताजा असताना लार्सन आणि टुब्रो कंपनीचे चेअरमन एसएन सुब्रह्मण्यन यांनी या वादात उडी घेत आणखी पुढचं वक्तव्य केलं. आठवड्यातून ७० सोडा ९० तास केलं पाहिजे. शिवाय रविवारीही काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. घरी राहून कितीवेळ बायकोचं तोंड पाहणार? असा टोलाही त्यांनी लगावला.
एसएन सुब्रह्मण्यन यांच्या वक्तव्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिपिका पदुकोणपासून अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी सुब्रह्मण्यन यांचा समाचार घेतला.
अशा परिस्थितीत एका युजरने लिहिलंय की तुम्ही जर नेदरलँडमध्ये असता तर स्वतः डोकं आपटून घेण्याशिवाय पर्याय नसता. कारण, तेथे आठवड्यातून केवळ २९ तास काम करण्याची संस्कृती आहे.
या वादात निर्माण होणारा प्रश्न असा आहे की जास्त तास काम केल्याने प्रत्यक्षात उत्पादकता वाढते का? फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड सारख्या विकसित देशांमध्ये आठवड्यात कामाचे तास अनुक्रमे ३६, ३८ आणि २९ तास आहेत. तरीही त्यांची उत्पादकता खूप जास्त आहे.
जगातील विविध देशांमध्ये सरासरी आठवड्याच्या तासांमध्ये लक्षणीय तफावत आहे. कोलंबियामध्ये कामगारांची सरासरी कामाची वेळ ४७.३ तास आहे, तर मेक्सिकोमध्ये ४६.७ तास आहे. भारतात कामगार आठवड्याला ४८ तास काम करतात. दक्षिण कोरियामध्ये ही वेळ ४२.९ तास आहे, तर जर्मनी आणि स्पेनमध्ये सरासरी ४० तास काम करतात.