Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 08:27 AM2024-10-21T08:27:07+5:302024-10-21T08:47:37+5:30

Mutual Fund Investment : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहेच. आजकाल अनेकांचा कल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीकडे वाढला आहे

Mutual Fund Investment : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहेच. आजकाल अनेकांचा कल म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीकडे वाढला आहे. शेअर बाजारात जोखीम जरी अधिक असली तरी त्यातून मिळणारा परतावा हा अधिक असतो. त्यामुळे अनेक जण हल्ली याकडे गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहू लागलेत.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी एफडी आणि इतर योजनांपेक्षा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते एफडी किंवा गुंतवणूकीच्या अन्य पर्यायांपेक्षा जास्त परतावा देतात. त्याचबरोबर शेअर बाजारात थेट गुंतवणूक करू इच्छित नसलेले गुंतवणूकदारही म्युच्युअल फंडाकडे वळत आहेत.

असे अनेक म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी वार्षिक आधारावर १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्यापैकीच एक म्हणजे एचडीएफसी बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंड. हा फंड १ फेब्रुवारी १९९४ पासून सुरू झाला. तेव्हापासून कंपनीनं वार्षिक आधारावर १८.६६ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही त्यावेळी महिन्याला ३००० रुपयांची एसआयपी सुरू केली असती तर तुमच्याकडे ५ कोटी रुपयांचा फंड असता.

हा फंड सुरू होऊन ३० वर्षे झाली आहेत. या ३० वर्षांत या म्युच्युअल फंडानं वार्षिक आधारावर १८.६६ टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही ३० वर्षांपूर्वी म्हणजेच दरमहा ३००० रुपयांच्या एसआयपीनं यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असती तर ही गुंतवलेली रक्कम १०.८० लाख झाली असती.

वार्षिक १८.६६ टक्क्यांच्या हिशोबानं या ३० वर्षांत व्याजाद्वारे गुंतवणूकदारांकडे ४.९३ कोटी रुपये जमा झाले असते. अशा प्रकारे तुम्ही या ३० वर्षांत ५ कोटींहून अधिकचा निधी तयार केला असता. हा हाय रिस्क म्युच्युअल फंड आहे. मात्र, तज्ज्ञ यात ३ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात. यामध्ये तुम्ही किमान १०० रुपयांच्या एसआयपीसह गुंतवणूक सुरू करू शकता.

गेल्या वर्षभरापासून या फंडानं जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या वर्षभरात या फंडानं ३३.७९ टक्के परतावा दिलाय. तर, तीन वर्षांत वार्षिक आधारावर मिळणारा परतावा २२.६३ टक्के होता. पाच वर्षांतही वार्षिक आधारावर चांगला परतावा दिला आहे. हा परतावा २१.६२ टक्के इतका होता.

टीप - यामध्ये म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.